आमदार निलेश पारवेकर अनंतात विलीन
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील
सदस्यांची श्रध्दांजली
यवतमाळ, दि. 28 : यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे
आमदार निलेश पारवेकर यांच्यावर त्यांच्या मुळगावी घाटंजी तालुक्यातील पारवा येथे
अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री
अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री व राज्यमंत्र्यांनी त्यांना
श्रध्दांजली वाहिली.
काल
आमदार निलेश पारवेकर यांचे अपघाती निधन झाले होते. आज सकाळी त्यांच्या यवतमाळ
येथील निवासस्थानी हजारो चाहत्यांनी त्यांचे अंतीम दर्शन घेतले. त्यानंतर दुपारी
त्यांचे पार्थीव त्यांच्या मूळ गावी घाटंजी तालुक्यातील पारवा येथे नेण्यात आले.
पारवा येथे अंतीम संस्कारप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थित होते.
यावेळी आपल्या शोकसंवेदना
व्यक्त करतांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आमदार पारवेकर यांचे निधन
स्वप्नातही खरी न वाटणारी घटना आहे, अशा शब्दात आपल्या दु:खद भावना व्यक्त केल्या.
निलेश पारवेकर उमदे, होतकरु, मनमिळावू व अजातशत्रू व्यक्तिमत्व होते. अगदी लहान
वयात त्यांना राष्ट्रीय जबाबदारी मिळाली, ती त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे पार पाडून
आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली. ते जिल्ह्याच्या विकासासाठी आग्रहाने भुमिका
मांडत. विविध प्रश्नांची सोडवणूक करतांना सर्वांना सोबत घेत. इतर पक्षांच्या
नेत्यांशीही त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे चांगले संबंध होते, असे यावेळी आपल्या
भावना व्यक्त करतांना मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले. सर्वांना दु:खात लोटून ते
निघून गेले आहे. परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना दु:ख सहन करण्याची ताकद देईल,
अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
यावेळी आपल्या भावना व्यक्त
करतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिशय चांगले संघटन कैशल्य असणारे युवा नेतृत्व
हरविण्याच्या शब्दात दु:ख व्यक्त केले. जिल्ह्याने निलेश पारवेकर यांना संधी दिली
आणि त्यानंतर ते कधीच मागे हटले नाही. विकासाच्या प्रश्नांवर ते सातत्याने
आपल्याशी चर्चा करायचे. आपल्या चांगल्या स्वभावामुळे त्यांनी अनेक सहकारी निर्माण
केले. उत्कृष्ट संघटन कैशल्य असणारे ते व्यक्तिमत्व होते, असे आपल्या भावना व्यक्त
करतांना उपमुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह
कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री
डॉ.नितीन राऊत, सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, अन्न व औषध प्रशासन मंत्री
मनोहर नाईक, सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, महिला व बालविकास मंत्री
प्रा.वर्षा गायकवाड, विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, राज्यमंत्री रणजित कांबळे,
राजेंद्र मुळक, कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ.एन.पी.हिराणी, खा.विलास
मुत्तेमवार, खा.भावना गवळी, खा. सुभाष वानखडे, खा.हंसहार अहीर, आ. माणिकराव ठाकरे,
आ.गिरीष बापट, आ.विजय विड्डेट्टीवार आ.रावसाहेब शेखावत, आ.वामनराव कासावार, आ.विजय
खडसे, आ. संजय राठोड, आ. संदिप बाजोरीया, आ.रवी राणा, आ.प्रणिती शिंदे, आ.यशोमती
ठाकूर, आ.राजीव सातव, आ.विरेंद्र जगताप, आ. अनिल बोंडे, आ. वसंत खोटरे, जिल्हा
परिषद अध्यक्ष प्रविण देशमुख, अमरावती जि.प.च्या अध्यक्षा सुरेखा ठाकरे, अमरावतीच्या महापौर वंदना कंगाले, माजी मंत्री
राजाभाऊ ठाकरे, संजय देशमुख, माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, नरेश पुगलीया, हरिभाऊ
राठोड, सुबोध मोहिते, माजी आमदार किर्ती गांधी, उत्तमराव इंगळे, संदिप धुर्वे,
विजय चोंढीकर, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, जिल्हाधिकारी संजय देशमुख,
मुख्य वनसंरक्षक दिनेश त्यागी, यांच्यासह राज्यभऱ्यातून आलेले आमदार, लोकप्रतिनिधी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा