केंद्रीय राष्ट्रीय अन्न प्रक्रिया
अभियानाची राज्यात
अंमलबजावणी करण्याचा मंत्रिमंडळाचा
निर्णय
मुंबई,
दि. 26 डिसेंबर : केंद्रीय राष्ट्रीय अन्न प्रक्रिया अभियान या नव्या केंद्र
पुरस्कृत योजनेची अंमलबजावणी राज्यात चालू वर्षापासून करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने
घेतला. या योजनेसाठी केंद्र शासनाचा 75 टक्के आणि राज्य शासनाचा 25 टक्के हिस्सा
असणार आहे. केंद्र शासनाने राज्याला सन 2012-13 साठी 22 कोटी रुपये नियतव्यय मंजूर
केला असून, त्यातील 5.50 कोटी रुपये एवढा राज्य शासनाचा हिस्सा देण्यासही
मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
केंद्रीय
अन्न प्रक्रिया मंत्रालयाने 12 व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत ही नवीन योजना सुरु
केली आहे. या योजनेची राज्यात सन 2012-13 पासून अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र
कृषी उद्योग विकास महामंडळाला नोडल एजन्सी म्हणून नेमण्यात आले आहे. असंघटीत
क्षेत्रात काम करणाऱ्या अन्न प्रक्रिया उद्योगाला पतपुरवठा करणे, तंत्रज्ञान
हस्तांतरण, कौशल्य विकास व मार्गदर्शन करुन उद्योगांची क्षमता वाढविणे, या
क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वयंसहाय्यता बचत गटांना छोटया किंवा मध्यम
उद्योगांचा दर्जा प्राप्त करण्यास मदत करणे, कुशल मनुष्यबळ वाढविणे, या उद्योगाची
प्रक्रिया व साठवणूकीची क्षमता वाढविणे आदी उद्देश या योजनेमागे आहेत.
या
अभियानाच्या अंमलबजावणीसाठी मंजूर केलेल्या योजनांचा प्रगतीचे संनियत्रण
करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली अंतरविभागीय समिती स्थापन करण्याचा
निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. अशा प्रकारच्या जिल्हास्तरीय समित्याही स्थापन
करण्यात येणार आहेत.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा