शनिवार, १५ डिसेंबर, २०१२


 कॅन्सर पिडीतांपासून ते बंद गिरण्यातील कामगारांपर्यंत
शिष्टमंडळांची रामगिरीवर गर्दी
प्रशासनाला कार्यवाहीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नागपूर, दि. 15 : साहेब, मी  मध्यमवर्गीय आहे, कसाबसा कॅन्सरच्या उपचाराचा खर्च केला, गरीब पेशंट्सचे काय होत असेल नागपुरात कॅन्सर रुग्णालय व्हावे म्हणून लढा देणाऱ्या एका महिलेने मुख्यमंत्र्यांना डोळ्यात पाणी आणून सांगितले.  तिच्या या सांगण्याने अस्वस्थ झालेल्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना कॅन्सर उपचार केंद्र शासकीय रुग्णालयात कसे सुरु होईल हे पहा, आणि तातडीने हा प्रस्ताव सादर करा अशा सूचना दिल्या.
आपल्याला स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वेतन मिळावे म्हणून सगळी कागदपत्रे दिली पण काहीच कार्यवाही झाली नाही असे म्हणणाऱ्या गयाबाई तळेकर या 60 वर्षाच्या वृध्देला दिलासा देताना मुख्यमंत्र्यांनी तिने सोबत आणलेली कागदाची पुरचुंडी देखिल काळजीपूर्वक पाहिली. 
तुमच्या सगळ्याच मागण्या मान्य होतील असे मी तुम्हाला आश्वासन देऊ शकत नसलो तरी यातील ज्या योग्य मागण्या आहेत, त्या कशा पूर्ण करायाच्या हे तुम्ही माझ्यावर सोडा मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटायला आलेल्या विदर्भ विकलांग संघर्ष समितीच्या सदस्यांना हे स्पष्टपणे सांगितले तेव्हा आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे अशा शब्दात समाधान व्यक्त करून या गरीब अपंगांनी  मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले.
आजच्या शनिवारची रामगिरीवरची सकाळ विविध शिष्टमंडळांच्या आणि आंदोलकांच्या येण्याने गजबजून गेली होती.  रामगिरीवरच्या प्रशस्त हिरवळीवर या शिष्टमंडळांची बसण्याची व्यवस्था केली होती.  प्रत्येक गटापुढे मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी सौरभ राव, नागपूर सुधार प्रन्यासचे चेअरमन प्रविणकुमार दराडे आदी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांना सामोरे जात होते.  मुख्यमंत्र्यांची काही मिनिटे का होईना भेट व्हावी, त्यांनी आपले निवेदन पहावे, आपल्याशी बोलावे या भावना सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. या सर्वांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांनी काळजीपूर्वक ऐकून घेतले आणि ज्या मागण्या मान्य होण्यासारख्या आहेत त्यावर निश्चित कार्यवाही केली जाईल असे स्पष्टपणे देखिल सांगितले.
रामगिरीवर एकंदर 30 शिष्टमंडळे आज भेटली.  त्यात महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या महिला, अखिल भारतीय अनुसुचित तथा परिगणित जाती सेवक समाज, मेहतर समाज, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, नागपूर शहर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष, भूतपूर्व सैनिक कृती समिती, उपासिका संघ, अंगणवाणी कर्मचारी सभा, भारतीय रिपब्लिकन परिषद, अ.भा.समता सैनिक दल, महाराष्ट्र मोफिसिल टेक्स्टाईल अँड अलाईड इंडस्ट्री वर्कर्स, एलाईट्स मुस्लिम ऑफ इंडिया, उपेक्षित दलितवाद सफाई मजदूर, विराज अपंग उथ्थान संस्था, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ,  शासकीय कॅन्सर रुग्णालय आंदोलन कृती समिती, राज्य हातमाग महामंडळ कर्मचारी, पावरलूम बुनकर समाज, छावा मराठा युवा संघटना, राजीव गांधी विचार मोर्चा, नागरी संघर्ष समिती रामटेक अशी विविध शिष्टमंडळे होती.
00000




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा