इंदू मिलच्या
जागेबाबत 6 डिसेंबरपूर्वी घोषणा : आनंद शर्मा
डॉ.
बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक
बांधण्यासाठी
प्राधिकरण स्थापणार :मुख्यमंत्री
नवी दिल्ली, 4 डिसेंबर : इंदू
मिलच्या जागेवर होणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक म्हणजे
राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या दृष्टीने अस्मितेचा प्रश्न आहे. ही जागा
हस्तांतरित होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. ती हस्तांतरित झाल्यानंतर
प्राधिकरण स्थापन करुन आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक उभारण्यात येईल, असे
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे सागितले.
श्री.
चव्हाण यांनी आज उच्चस्तरीय शिष्टमंडळासोबत श्री. शर्मा यांची भेट घेतली. त्यावेळी
त्यांनी बैठकीत ही माहिती दिली. केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री आनंद शर्मा यांच्या
सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले. भारतरत्न
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी प्रस्तावित इंदू मिलची जागा महाराष्ट्र
शासनाकडे लवकरच हस्तांतरीत करण्यात येईल, तथापि, 6 डिसेंबरपूर्वी अधिकृत घोषणा
केली जाईल, असे आश्वासन श्री. शर्मा
यांनी शिष्टमंडळाला दिले.
गतवर्षी
सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीत आले होते. त्यांच्याबरोबर बैठक झाली. त्यानंतर
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेतली. त्यांनी त्यावेळी तत्वत: मान्यता दिली
होती, असे स्पष्ट करुन श्री. शर्मा म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य
स्मारक व्हावे, ही सर्वांची इच्छा आहे. देशासाठीचे त्यांचे योगदान अनन्यसाधारण
आहे. या जागेच्या हस्तांतरणापूर्वी सर्व कायदेशीर बाबी पडताळून पाहण्यासाठी
केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्र्यांच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात
आली. महाराष्ट्राचे मुख्य सचिव व अन्य अधिकारी या समितीचे सदस्य आहेत. त्यांनी
विविधस्तरावर बैठका घेतल्या. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वेळोवेळी
पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग, श्रीमती सोनिया गांधी व स्वत: माझी भेट घेऊन सतत
पाठपुरावा केला, असे ते म्हणाले.
ते पुढे
म्हणाले, ही जमीन सर्वप्रथम खाजगी मालकीची होती, त्यानंतर 1974 च्या दरम्यान ही
जागा राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या ताब्यात आली, या जमिनीचा वापर
उद्योगासाठी करता येईल, अशी अट होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालून
राज्य सरकार स्तरावरचे नियम शिथील केले. त्यानंतर केंद्रस्तरावरच्या तांत्रीक
बाबीविषयी तोडगा कसा काढावा, असा प्रश्न होता. परंतु एक-एक करत जवळपास सर्व तांत्रिक
प्रश्न सोडविण्यात यश मिळाले आहे.
यासंबंधी
पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग व श्रीमती सोनिया गांधी यांच्याशी देखील वेळोवेळी चर्चा
केली; त्यांनी सुद्धा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक
व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. आता कुठलीही अडचण येणार नाही, असे स्पष्ट
करुन ते म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापूर्वी म्हणजे 6
डिसेंबर पूर्वी या जागेबाबत घोषणा होईल, असे त्यांनी आश्वासन दिले.
या शिष्टमंडळात
केंद्रीय मंत्री मिलींद देवरा, केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील, खा. विलास
मुत्तेमवार, खा. एकनाथ गायकवाड, खा. माणिकराव गावित, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष
माणिकराव ठाकरे, खा. दत्ता मेघे, खा. भालचंद्र मुणगेकर, खा. विजय दर्डा, खा. भास्करराव
पाटील खतगांवकर, खा. अविनाश पांडे, खा. प्रिया दत्त, खा. जयवंत आवळे, खा. सुरेश
टावरे, खा. हुसेन दलवाई, खा. बळीराम जाधव, खा. मारोतराव कोवासे आदींचा समावेश
होता.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा