शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१२


मराठवाडा कृषी विद्यापीठास स्व. वसंतराव नाईक यांचे नाव देणार

--- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची घोषणा---


मुंबई, दि. 23: माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षात राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून मराठवाडा कृषी विद्यापीठास स्व. वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केली.
    स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षात प्रस्तावित कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या समितीची बैठक आज सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित करण्यात आली  होती. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.  
    1 जुलै 2012 रोजी स्व. वसंतराव नाईक यांचे  जन्मशताब्दी वर्ष सुरु झाले असून 1 जुलै 2013 रोजी मुंबईत मान्यवरांच्या उपस्थितीत जन्मशताब्दीचा समारोप समारंभ होणार आहे. नागपूर येथे अधिवेशन काळात या समितीची  आणखी एक बैठक आयोजित करणे येणार असून आणखी काही सदस्यांचा या समितीत समावेश केला जाणार आहे.यवतमाळ जिल्हयातील पुसद तालुक्यातील गहुली येथे स्व. वसंतराव नाईक यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असून त्यांच्या जीवनावर आधारित डॉ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला लघुपट राज्यभर प्रदर्शित करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री  यावेळी  म्हणाले.
राज्यातील सहा विभागांमध्ये कृषी मेळावे व कृषी प्रदर्शन यांचे आयोजन करणे,टपाल तिकीट काढणे तसेच  विदर्भ एक्सप्रेसचे " वसंतराव नाईक विदर्भ एक्सप्रेस"  असे नामकरण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयास  प्रस्ताव पाठविणे , विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजातील कार्यकर्त्यांसाठी " वसंतराव नाईक समाज भूषण पुरस्कार" घोषित करणे, या समाजातील मुला, मुलींसाठी वसतीगृह उभारणे, ‘हिरवी क्षितीजे’ या नाईक साहेबांच्या षष्ठयब्दीपूर्तीच्या निमित्ताने प्रकाशित केलेल्या  ग्रंथाची तृतीय आवृत्ती पुनर्मुद्रीत करणे, शालेय अभ्यासक्रमात नाईक यांचे जीवनचरित्र प्रकाशित करणे, त्यांच्या विधीमंडळातील भाषणाच्या ग्रंथाचे प्रकाशन, औरंगाबाद, नागपूर, यवतमाळ या ठिकाणी त्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन या कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत या बैठकीत यावेळी चर्चा करण्यात आली.
स्व. वसंतराव नाईक यांच्या कार्यकौतुकाची ओळख व्हावी म्हणून राज्य शासनातर्फे 'लोकराज्य'  विशेषांक प्रकाशित करण्यात येणार असून त्यांच्या कालखंडातील लोकराज्य मासिकाच्या  प्रती  संशोधनासाठी उपलब्ध करुन देण्यात येतील असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
समितीचे सदस्य अन्न व औषध  प्रशासन मंत्री मनोहर नाईक , पर्यटन मंत्री छगन भुजबळ, वने मंत्री पंतगराव कदम, सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, , रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत, अशासकीय सदस्य, तसेच मुख्य सचिव जयंत बाँठिया, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजित जैन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


घरत/ ललिता/23.11.12

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा