(छायाचित्र केवळ संदर्भासाठी जोडले आहे. वृत्तातील घटनेशी संबंधित नाही)
मेट्रो,
मोनोरेल प्रकल्पाच्या कामांवरील दुर्घटना;
कंत्राटदारांकडून दंड वसूलीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई, दि. 1 नोव्हेंबर : एमएमआरडीएची मुंबईत विविध कामे सुरु असून, या कामादरम्यान होणाऱ्या
अपघातांमुळे जे नुकसान होते त्याबद्दल कंत्राटदारांवर कारवाई करण्याच्या आणि
त्यांच्याकडून दंड वसूल करण्याच्या सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी
दिल्या होत्या, त्यानुसार प्राधिकरणाने अशा कंत्राटदारांकडून दंड वसूल करण्यास
सुरुवात केली आहे.
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरु
असतांना एअरपोर्ट रोड स्टेशन येथे जिन्याच्या बीमचे काँक्रीटीकरण सुरु असतांना तो कोसळून
11 जण जखमी झाले, तर 1 जण मृत्यूमुखी पडला. याप्रकरणी कंत्राटदाराला 10 लाख रुपये दंड
करण्यात आला आहे तर जे.पी.रोड जवळील पूलाचे काम सुरु असतांना गर्डर कोसळून 1
कामगार मृत्यूमुखी पडला. या कामगाराच्या कुटुंबियांना योग्य ती नुकसान भरपाई
देण्यात आली असून कंत्राटदारास 10 लाख रुपये दंड करण्यात आला. अशाच प्रकारे असल्फा
येथे 2 शाळकरी मुलांचा खड्डयातील पाण्यात पडून मृत्यू झाल्यानंतर मृतांच्या
वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्यात आले त्याचप्रमाणे कंत्राटदारास 10 लाख रुपये
दंड करण्यात आला. मरोळ येथे रिइन्फोर्समेंट केज वाहून नेत असतांना एक कामगार
किरकोळ जखमी झाला होता. जे.बी.नगर येथे एक रिग रिक्षावर कोलमडल्यामुळे एका
प्रवाशाचा मृत्यू झाला होता, अंधेरी (पूर्व) येथे मेट्रो स्टेशनजवळील पोर्टा केबीनमध्ये
सुपरवायझरचा इलेक्ट्रीक शॉकने झालेला मृत्यू अशा सर्व प्रकरणांमध्ये प्रत्येकी 5
लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
मोनोरेल प्रकल्पाच्या वडाळा येथील कॉस्टींग यार्डमध्ये
झालेला एक ट्रक अपघात, मोनो-रेल डेपो इमारतीत काँक्रीट खांबाचे शटर डोक्यात पडून झालेला अपघात यामध्ये
दोन कामगार मृत्यूमुखी पडले होते त्यांच्या कुटुंबियांना योग्य ती नुकसान भरपाई
देण्यात आली असून या कंत्राटदाराकडून सुरक्षा बाबींवर 31.5 लाख रुपये दंड वसूल
करण्यात आला आहे त्याचप्रमाणे मैसूर कॉलनीजवळ बीम कोसळून झालेल्या अपघातामध्ये 5
लाख रुपये इतका दंड घेण्यात आला आहे.
लालबाग येथील उड्डाणपूलाच्या गर्डरचा स्लॅब कोसळून
अपघात झाला होता त्या कंत्राटदारास 25 लाख रुपये व सल्लागारास 5 लाख रुपये दंड
आकारण्यात आला आहे. लालबाग पूलाजवळ काँक्रीटचा एक फूट लांबीचा तुकडा अचानक पडला,
त्यामध्ये जिवीतहानी झाली नाही मात्र कंत्राटदारास प्राधिकरणाचे नवीन काम न
देण्यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
00000
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा