सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१२


शांतता आणि सद्‌भावपूर्ण वातावरणात

 बकरी ईद साजरी करावी
                   - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 15 : मुस्लिम बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आणि पवित्र समजली जाणारी बकरी ईद सर्वांनी शांतता आणि सद्‌भावपूर्ण वातावरणात साजरी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.
श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली येथील सह्याद्री अतिथीगृहात आज याबाबत उच्चस्तरीय बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री आर. आर. पाटील, अल्पसंख्याक विकास मंत्री मोहम्मद आरिफ (नसीम) खान, पशुसंवर्धन मंत्री मधुकरराव चव्हाण, राज्यमंत्री गुलाबराव देवकर, खासदार हुसेन दलवाई, आमदार बाबा सिद्दीकी, आमदार अमीन पटेल, मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजितकुमार जैन, पोलीस महासंचालक संजीव दयाळ, मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह, मुंबई महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे, अतिरिक्त आयुक्त श्रीमती मनीषा म्हैसकर, परिवहन आयुक्त व्ही. एन. मोरे, विविध कॅटल आणि बीफ व्यापारी संघटनांचे पदाधिकारी मोहम्मद अली कुरैशी, अतिक कुरैशी, आशिक कुरैशी आदी उपस्थित होते. 
मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले मुंबईतील देवनार कत्तलखान्यात बकरी ईदमधील कुर्बानीसाठी तात्पुरती वाढीव सोय केली जाते. त्याठिकाणी निवारा-शेड, पाणी, स्वच्छतागृहे आदी सर्व आवश्यक सोयी-सुविधा तातडीने देण्यात याव्यात. या कत्तलखान्यात कायमस्वरुपी निवारा-शेड बांधण्याचे काम महापालिकेमार्फत सुरु असून त्याचे काम पुढील पावसाळ्याच्या आत पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी यावेळी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. देवनार कत्तलखान्याचे नुतनीकरण करण्याचा प्रस्ताव राज्य शासनामार्फत केंद्र शासनाच्या अन्न प्रक्रिया विभागाकडे पाठविण्यात आला असून तो मंजूर होण्यासाठी आपण स्वतः जातीने प्रयत्न करु, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कोल्हापूर येथील बंद कत्तलखाना बकरी ईदसाठी तातडीने खुला करण्यात यावा. शिवाय इतर कालावधीत तो का बंद ठेवण्यात आला आहे याबाबत मुख्य सचिवांनी  जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती  घेऊन प्रश्न सोडवावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
गृहमंत्री श्री. पाटील म्हणाले बकरी ईद काळात होणारी जनावरांची वाहतूक, कुर्बानी आदींसंदर्भात किंवा कायदा-सुव्यवस्था विषयक काही समस्या उद्‌भवल्यास त्याचे तातडीने निराकरण होण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयात एक पूर्णवेळ अधिकारी नेमण्यात येईल. शिवाय तक्रारींचे तातडीने निराकरण केले जाईल. या काळात कायदा हातात न घेता सर्वांनी शांततापूर्ण वातावरणात ईद साजरी करावी. पोलीस विभागामार्फत यासाठी संपूर्ण सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 
अल्पसंख्याक विकास मंत्री श्री. खान म्हणाले मुंबईसह राज्याच्या विविध भागात बकरी ईद काळात जनावरांची वाहतुक करणारे व्यापारी, कुर्बानी देऊ इच्छिणारे भाविक आदींना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. पोलीस विभाग, परिवहन विभाग, पशुसंवर्धन विभाग आदी संबंधीत विभागांनी अशा समस्या उद्‌भवल्यास त्यांचे तातडीने निराकरण करणे गरजेचे आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात होणारी कुर्बानी पाहता बकरी ईद काळात इथे अधिकचे तात्पुरते कत्तलखाने उभे करणे गरजेचे आहेत, असे त्यांनी सांगितले.
00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा