मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१२


                                                
औद्योगिकरणाचा फायदा स्थानिकांनाही व्हावा
मुख्यमंत्री चव्हाण - फोक्सवॅगन कंपनीच्या अकादमीचे उदघाटन
पुणे, दि. 16  औद्योगिकरणामुळे रोजगार निर्मिती होते. त्यामुळे स्थानिक लोकांनाही त्याचा फायदा होणे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केले.
फोक्सवॅगन कंपनीच्या अकादमीचे मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते आज उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार विलास लांडे, आमदार दिलीप मोहिते, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जोहान चाको,  फोक्सवॅगन कंपनीचे संचालक फ्रेड कापलर, गॅरी डोरीझास व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, फोक्सवॅगन कंपनीने येथे उभारलेली ही अकादमी कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची ठरेल. फोक्सवॅगन कंपनीने सुरू केलेली अकादमी पुणे आणि महाराष्ट्रातील औद्योगिक विकासात महत्वाची भूमिका बजावेल. स्थानिक युवकांना रोजगारांची संधी मिळतील असे व्यावसायिक अभ्यासक्रमही फोक्सवॅगनच्या  अकादमीत राबविले जावेत.
मुख्यमंत्री म्हणाले, कंपनीने आपल्या प्रकल्पांसाठी महाराष्ट्राची निवड केली आहे, ही बाब राज्याच्या दृष्टीने महत्वाची आहे. त्याचबरोबर कंपनीनेही भविष्यातील प्रकल्पही राज्यातच स्थापन करावेत. त्यासाठी कंपनीला राज्य शासनाकडून सर्व ती मदत दिली जाईल. कंपनीने मोटारींच्या उत्पादन प्रकल्पाबरोबरच डिझाईन आणि नवीन संशोधन करणारे प्रकल्पही पुण्यातच सुरू करावेत. त्यासाठी त्यांना अतिशय कुशल मनुष्यबळ तर सहजी उपलब्ध होईल त्याचबरोबर नव्या युगातील नवनव्या संशोधनासाठी उत्तम कल्पनाही उपलब्ध होऊ शकतील.

महाराष्ट्राचा आर्थिक विकासाचा दर सातत्याने चांगला आहे. महाराष्ट्र लोकसंख्या आणि क्षेत्रफळ या दोन्ही बाबतीत युरोपातील काही राष्ट्रांपेक्षाही मोठा आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात बाजारपेठ आहे. येथील लोकांची क्रयशक्ती वाढत असल्यामुळे महाराष्ट्रात व्यवसायासाठी मोठी संधी आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, पुण्याचे जिल्हाधिकारी विकास देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कवडे आदी उपस्थित होते.
 0 0 0 0 0 0 0 0 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा