विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालणारे
अच्युत महाराज हे आधुनिक विचारांचे संत
-मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
अमरावती, दि. 8 : रंजल्या गांजल्यांच्या चेहऱ्यावरील सुखाच्या
हास्याचे दोन क्षण हेच माझे जीवन, असे सांगणारे आणि त्याप्रमाणे कृती करणारे अच्युत
महाराज हे आधुनिक विचारांचे संत होते. विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालत त्यांनी
भरीव सामाजिक कार्य केले, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वैदर्भीय
संत अच्युत महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
संत अच्युत महाराज यांचे शुक्रवारी निधन झाले.
त्यांच्या लक्षावधी अनुयायांचे सांत्वन करताना दिलेल्या शोकसंदेशात श्री. चव्हाण म्हणतात
की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांचे सान्निध्य अच्युत महाराजांच्या
आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. बुवाबाजी आणि अंधश्रद्धेने पोखरलेला समाज पाहुन त्यांनी
आपले आयुष्य विज्ञाननिष्ठ समाजाच्या उभारणीसाठी व्यतीत करण्याचा निर्धार केला. सानेगुरुजींच्या
विचारांचा आणि तपोवनचे पद्मश्री शिवाजीराव पटवर्धन यांच्या कार्याचा मोठा प्रभाव त्यांच्यावर
होता. श्रीमद् भागवताची तर्कशुद्ध मांडणी करुन त्यांनी ती हजारो प्रवचनांच्या माध्यमातून
लोकांपर्यत पोचविली. गीतेचे तत्वज्ञान अतिशय सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोचवुन त्यांनी
गीताचार्य ही उपाधी मिळविली. जातपात, धर्म-पंथ, कर्मकांडाची बंधने झुगारुन द्या आणि
मानवतेची कास धरा, अशी शिकवण त्यांनी दिली. अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल, सानेगुरुजी
मानव सेवा संघ, शिवभवन, मानव प्रतिष्ठान, विद्यार्थी सेवा फंड, महिला सेवा फंड अशा
अनेक संस्थांची निर्मिती करुन त्यांनी आपल्या विचारांना कृतीची जोड दिली. त्यांच्या
निर्वाणाने समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या विचारवंत संताला आपण मुकलो आहोत,
असे श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.
00000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा