बुधवार, २६ सप्टेंबर, २०१२


कुपेकरांच्या निधनाने सर्वसामान्यांकरिता
झटणाऱ्या शालिन नेत्याला मुकलो : मुख्यमंत्री

मुंबई, दि. 26 : ज्येष्ठ नेते, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांचे संपूर्ण आयुष्य सर्वसामान्यांसाठी झटण्यात गेले. त्यांच्या निधनामुळे सहकार, शेती, ग्रामीण भागातील प्रश्नांची चांगली जाण असणाऱ्या सुसंस्कृत आणि शालिन नेत्याला महाराष्ट्र मुकला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.
        श्री. कृष्णराव रखमाजीराव देसाई उर्फ बाबासाहेब कुपेकर यांच्या आकस्मिक निधनाबद्दल शोकसंदेशात श्री. चव्हाण म्हणतात की, बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व खानदानी आणि विलोभनीय होते. ज्या ज्या पदावर त्यांनी काम केले, त्या पदाची प्रतिष्ठा त्यांनी आपल्या शालिनतेने वाढविली. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यांतील कानडेवाडी (कुपे) या आपल्या गावाचे सरपंच आणि सेवा संस्थेचे अध्यक्ष म्हणुन त्यांनी आपली राजकीय कारकिर्द 1965 साली सुरु केली. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे चारवेळा सदस्य म्हणून निवडुन आलेल्या कुपेकरांनी कृषि सभापती म्हणुन उल्लेखनीय कामगिरी केली.
        व्यवसायाने शेतकरी असलेले श्री. कुपेकर यांना शेतकरी असल्याबद्दल अभिमान होता. आधुनिक पद्धतीने शेती  यासाठी ते सतत आग्रही असत. ते एक चोखंदळ वाचकही होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे भव्य स्मारक त्यांनी कानडेवाडी येथे उभारले. आपल्या परिसराचा पर्यटनविषयक विकास व्हावा म्हणुन त्यांनी गडहिंग्लजचा सामानगड, चंदगडचा पारगड, रवळनाथ मंदिर, आजरा रामतीर्थ  यांचा जाणीवपूर्वक विकास केला. चंदगडच्या दौलत सहकारी साखर कारखाना उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान होते. 1995, 2000 आणि 2005 साली ते गडहिंग्लज मतदारसंघातून विधानसभेवर निवडुन आले. 2005 साली विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. या पदावर काम करताना त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाची छाप पाडली आणि या व्यासपीठाचा उपयोग सर्वसामान्यांसाठी केला. त्यांच्या निधनामुळे राज्य एका अभ्यासु, संवेदनशील नेतृत्वाला मुकले आहे. 
0000000000000000000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा