पोलिसांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी कसोशीने
प्रयत्न
- मुख्यमंत्री
मुंबई, दि. 28 : आझाद मैदान येथे झालेल्या
हिंसाचारावेळी आंदोलकांनी पोलिस आणि विशेषत: महिला पोलिसांवर केलेल्या हल्ल्याचा
प्रकार निंदनीय आणि चिंताजनक आहे. पोलिस कर्मचारी आणि महिला पोलिसांचे नितीधैर्य
उंचावण्यासाठी राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करीत असून दोषींना कठोर शिक्षा
होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी
आज राष्ट्रीय महिला आयोगाला दिले.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा ममता
शर्मा यांनी आज मुख्यमंत्री चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्याशी या घटनेबाबत चर्चा
केली. यावेळी आयोगाच्या सदस्य निर्मला सामंत प्रभावळकर, सदस्य पी. के. चौधरी,
अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अमिताभ राजन, गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त
हिमांशू रॉय आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, निदर्शकांनी बंदोबस्तासाठी
आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर केलेल्या हल्ल्याची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. या
संपूर्ण घटनेचे तपशिलवार चित्रीकरण पोलिसांना उपलब्ध झाले असून त्याआधारे दोषींची
ओळख पटविण्यात येत आहे. या निदर्शनावेळी 15 हजार लोक जमतील असा अंदाज होता,
त्यानुसारच पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलिसांच्या भरतीमध्ये 30 टक्के
महिलांना भरती करण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. महिला पोलिसांनाही पुरूष पोलिस
शिपायांप्रमाणेच प्रशिक्षण दिले जाते. मात्र पोलिसांवर हल्ला होण्याची घटना
अनपेक्षित होती. याप्रकरणी आतापर्यंत 53 जणांना अटक करण्यात आली आहे. अमर जवान
स्मृती स्मारकाची विटंबना करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली असून दुसऱ्याची ओळख पटली
आहे. त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल. या सर्व आरोपींवर लवकरात लवकर आरोपपत्र
दाखल करण्याचा प्रयत्न गुन्हे शाखा करीत आहे, अशी माहिती श्री. चव्हाण यांनी दिली.
महिला पोलिसांचा विनयभंग करणाऱ्या
निदर्शकांवर कठोरात कठोर कारवाई होईल, याची दक्षता राज्य सरकारने घ्यावी, असे
मागणी श्रीमती शर्मा यांनी केली. ज्या ठिकाणी मोठा जमाव जमण्याची शक्यता आहे, अशा
ठिकाणी सर्वच पोलिसांना शरीर संरक्षक कवच उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही त्यांनी
केली. दंगेखोरांनी हल्ला करूनही मुंबई पोलिस दलातील महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी
पळून न जाता धैर्याने परिस्थितीचा सामना केला. याबद्दल त्यांनी महिला पोलिसांना
शाबासकी दिली. मात्र त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी शासनाने जाणीवपूर्वक प्रयत्न
करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा