पत्रकार कल्याण निधीत तीन कोटीची वाढ-मुख्यमंत्री
मुंबई दि. २८ : पत्रकारांच्या
कल्याणासाठी सुरु करण्यात आलेल्या शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या
रकमेत तीन कोटी रुपयांनी वाढ करून ही रक्कम पाच कोटी रुपये करण्याची घोषणा
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा पुढारीकार डॉ.ग.गो. जाधव पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना देण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमास मुंबई मराठी पत्रकार
संघाचे अध्यक्ष देविदास मटाले, पुढारी वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक योगेश जाधव,
संघाचे कार्यवाह प्रभाकर राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री
पुढे म्हणाले की, पत्रकारिता ही सदैव सामाजिक हितासाठीच असली पाहिजे. निव्वळ नकारात्मक
बातम्यांना स्थान न देता विकासाला पूरक वृत्तांकन झाल्यास
समाजात सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होईल. राज्य शासनाने
जनकल्याणासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. प्रशासनात पारदर्शकता आली आहे.
माहितीचा अधिकार कायदा महत्वाची भूमिका बजावत आहे. आजही इतर राज्यापेक्षा
महाराष्ट्र विविध क्षेत्रात आघाडीवर आहे. हौसिंग रेग्युलेटिंग सुरु करणारे
महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कुमार
केतकर यांचा गौरव करून मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांना प्राप्त झालेला हा
पुरस्कार म्हणजे पत्रकारितेचा सन्मान आहे. श्री. केतकर यांनी नेहमीच प्रवाहाच्या
विरुद्ध जाऊन आपले मत मांडले आहे. केतकर आज ज्येष्ठ विचारवंताची भूमिका
बजावत असून जनमत तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
सत्काराला उत्तर देताना कुमार केतकर म्हणाले की, पत्रकारांनी केवळ वाईट घडामोडीचे वृत्त न देता अधिकाधिक चांगल्या आणि विकासशील घडामोडींचे वार्तांकन करावे.फक्त नकारात्मक लिहून आपण समाजात असंतोष वाढवण्याचे काम करतो आहोत. हे प्रमाण वाढले तर आपले स्वातंत्र्य धोक्यात येईल.
भारतात जेवढे स्वातंत्र्य आहे तेवढे जगात कुठेच नाही. पत्रकारांनी समाजाकडे अधिक
प्रगल्भ नजरेने पहिले पाहिजे.
यावेळी
पत्रकार देवेंद्र गावंडे यांचाही पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
प्रारंभी संघाचे अध्यक्ष देविदास मटाले यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन विजयकुमार बांदल यांनी केले. यावेळी पत्रकार मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा