साखर उद्योगासमोरील प्रश्नांबाबत त्वरेने
तोडगा काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
डॉ. सी. रंगराजन
समितीची मुंबईत बैठक
मुंबई,
दि. 14 : साखर निर्यातीबाबतचे अनिश्चित धोरण, ऊसाला किफायतदार भाव (एफआरपी), लेव्ही
आदी प्रश्नांबाबत त्वरेने निर्णय घेण्याचे व त्यादृष्टीने शिफारशी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केले. केंद्र सरकारने साखर उद्योगाविषयी नेमलेल्या उच्चस्तरीय
तज्ज्ञ समितीने आज मुंबईला भेट दिली. समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. सी. रंगराजन
यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी
कृषिमंत्री राधाकृष्ण विखेपाटील, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, महसुलमंत्री बाळासाहेब
थोरात, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री
मधुकर चव्हाण, सहकार राज्यमंत्री प्रकाश सोळंके, वित्त व नियोजन राज्यमंत्री राजेंद्र
मुळक, राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील, मुख्य सचिव जयंत कुमार
बांठिया, वित्त विभागाचे प्रधान सचिव सुधीर श्रीवास्तव, नियोजन विभागाचे प्रधान सचिव
के. पी बक्षी, सहकार सचिव राजगोपाल देवरा, सहकार
आयुक्त मधुकर चौधरी उपस्थित
होते.
साखरेच्या
किंमतीतील चढ-उतार लक्षात घेता सहकार क्षेत्रातील या महत्वपूर्ण उद्योगाचे
अस्तित्व अबाधित रहावे, साखर कारखान्यांचे
आधुनिकीकरण व साखर उद्योगाचे उदारीकरण व्हावे या दृष्टीकोनातून डॉ. रंगराजन
समितीने आपल्या शिफारशी सादर कराव्यात,
असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले.
साखर उद्योग
नियंत्रणमुक्त असावा, साखर उत्पादकांना रास्त व वाजवी किंमतीत साखर विकता यावी आणि
ग्राहकांना रास्त दरात साखर उपलब्ध व्हावी, साखर उद्योगातून होणारी सह वीज निर्मिती,
साखरेच्या आयात-निर्यातीचे धोरण स्थिर असावे, साखरेचे ज्यूट बँगमधून पॅकेजींग रद्द
व्हावे, इथेनॉल किंमत, लेव्ही साखर दर, साखर कारखान्यामधील 25 किलोमिटर अंतर याबाबींचा
अभ्यास करण्यासाठी डॉ. सी. रंगराजन समिती गठीत करण्यात आली आहे.
राज्यात
एकूण 170 साखर कारखाने असून 119 सहकारी तर 51 खाजगी कारखाने आहेत. 45 लाख ऊस
उत्पादक कुटुंबे असून या उद्योगातून 35 हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. या
उद्योगात 10 लाख कामगार कार्यरत आहेत आणि
राज्यास 1533 कोटी रुपयांचा महसून उपलब्ध होतो. तसेच 650 मेगावॅट वीज
निर्मिती होते अशी माहिती या सादरीकरणाद्वारे देण्यात आली.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा