शनिवार, १९ मे, २०१२


एव्हरेस्ट विजयी गिर्यारोहक युवकांनी
महाराष्ट्राचे नाव उंचावले : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 19 : पृथ्वीवरील सर्वोच्च असे हिमालयातील एव्हरेस्ट शिखर सर करणारे या वर्षीच्या मोहिमेतील पहिले गिर्यारोहक महाराष्ट्रातील आहेत ही सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. या युवकांनी महाराष्ट्राचे नाव आणखी उंचावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या गिर्यारोहक युवकांचे अभिनंदन केले आहे.
        सागरमाथा आणि गिरीप्रेमी या संस्थांचे सहा गिर्यारोहक अनेक अडचणींना सामोरे जात एव्हरेस्ट शिखरावर पोहचले. विशेष म्हणजे संपूर्णपणे नागरी स्वरुपाची असलेल्या या मोहिमेसाठी सर्वात कमी खर्च आला. या वर्षी एव्हरेस्ट सर करणारी ही पहिली भारतीय तुकडी आहे, याचा महाराष्ट्राला तसेच देशाला अभिमान आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
        या मोहिमेमुळे एव्हरेस्टसारखे जगातील उत्तुंग शिखर काबीज करण्याच्या अनेक मोहिमांना प्रोत्साहन मिळेल. त्याचप्रमाणे या गिर्यारोहकांची यशोगाथा आणि त्यांचे अनुभव गिर्यारोहणाला व इतर धाडसी क्रीडाप्रकारांना उत्तम संधी मिळवून देतील, यात मला शंका वाटत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
        1998 मध्ये महाराष्ट्राच्या सुरेंद्र चव्हाण यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले होते.  राज्याच्या गिर्यारोहकांनी चौदा वर्षानंतर परत एकदा हा बहुमान मिळवला आहे.

                                        0000000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा