बुधवार, २५ एप्रिल, २०१२

कोयना लेक टॅपिंगचा दुसरा यशस्वी प्रयोग
कोयनेच्या पाचव्या टप्यासाठी पाठपुरावा
                          -मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
        सातारा दि. 25 :- कोयना लेक टॅपिंग हे अभियांत्रिकी शास्त्रातील नवल असून या क्रांतीकारी प्रकल्पानंतर कोयना जलविद्युत केंद्राचा पंप स्टोअरेजचा 5 वा टप्पाही आपल्याला पूर्ण करायचा आहे, यासाठी लागणारी पर्यावरण विभागाची मान्यता मिळविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे बोलताना सांगितले.
        कोयना जलविद्युत प्रकल्प टप्पा 4 अंतर्गत विस्तारीत अधिजल भुयारात लेक टॅपिंंग प्रक्रियेद्वारे पाणी सोडण्याचा शुभारंभ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला, त्याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. समारंभास जिल्ह्याचे पालकमंत्री रामराजे नाईक-निंबाळकर, जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे, जलसंपदा राज्यमंत्री राजेंद्र मुळक, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह जिल्ह्यातील आमदार मान्यवर उपस्थित होते.

        कोयना लेक टॅपिंग हा प्रकल्प महाराष्ट्राच्या दृष्टीने भाग्यविधाता आणि महत्वाकांक्षी प्रकल्प असून आशिया खंडातील कोयना लेक टॅपिंग हा दुसरा प्रकल्प असून पुर्णत: भारतीय तंत्रज्ञानी उभा केलेला हा ऐतिहासिक प्रकल्प आज राष्ट्राला समर्पित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे अतिरिक्त वीजनिमिर्ती करण्याबरोबरच ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ प्रकल्पाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना पाणी उपलब्ध करुन देणे सोईचे झाल्याचेही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलताना सांगितले.
        कोयना लेक टँपिंगमुळे दुष्काळी भागातील जनतेला पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी देण्याबरोबरच उद्योगासाठीही पाणी देणे शक्य असल्याचे सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कृष्णा पाणी वाटप लवादाकडून महाराष्ट्राला वीजनिर्मितीसाठी 25 टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध होऊ शकेल, यामुळे वीजनिर्मितीला आणि सिंचनाला पाणी उपलब्ध होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोयना प्रकल्पातून वीज निर्मिती करुन कोकणात जाणाऱ्या 67 टीएमसी पाण्याचा पुर्नवापर करता येईल का?  याबाबत  अभ्यास करुन आवश्यक उपाययोजना करण्यास राज्य शासनाचे प्राधान्य राहील, असेही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
        कोयना परिसरात भूकंपाचे वारंवार धक्के होत असून भूकंप शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी तसेच भूकंपाची भविष्यवाणी करण्यासाठी हजारमाची येथे 300 कोटी रुपये खर्चाचा विश्वविद्यालय प्रकल्प हाती घेण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितले. हा प्रकल्प देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील एक महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याचेही ते म्हणाले.
        कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न लवकरच निकाली काढला जाईल, असे स्पष्ट करुन मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, प्रकल्पग्रस्तांंच्या पुनर्वसनाबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून यासंदर्भात पुणे विभागीय आयुक्तांनी पुढील आठवडयात विशेष बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा असे आदेशही त्यांनी यावेळी दिले. याबरोबरच व्याघ्र प्रकल्प बफर झोनमधील 15 गावे वगळण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून केंद्राकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी असून त्याचा पाठपुरावा करुन हा प्रश्नही मार्गी लावला जाईल असेही मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले.
        संगमनगर येथे अतिवृष्टी आणि पुरामुळे निर्माण होणारी पुर परिस्थिती विचारात घेऊन संगमनगर येथे 9 कोटी रुपये खर्चाचा नवीन पुल बांधण्याच्या प्रस्तावास शासनाकडून मान्यता दिली जाईल तसेच हुंबरळी पर्यटन क्षेत्राचा पर्यटन विभागामार्फत विकास केला जाईल तसेच या परिसरात मुलांचे वसतीगृह निर्माण करुन त्यामध्ये भूकंपग्रस्ताच्या मुलांना प्राधान्याने प्रवेश देण्याची कार्यवाही केली जाईल असे मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले.

        राज्याच्या काही जिल्ह्यामध्ये भीषण टंचाई परिस्थिती निर्माण झाली असून टंचाईग्रस्तांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी उपसा सिंचन योजनांतून शासनामार्फत पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दिले जात आहे. यापुढील काळात दुष्काळावर मात करण्यासाठी पाण्याचा थेंब थेंब अडविणे आणि जमिनीत मुरविणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले. कोयना लेक टॅपिंग हे अवघड काम भारतीय तंत्रज्ञांनी कमी खर्चात, अथक प्रयत्नातून यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल प्रक्रियेतील सहभागी  अभियंत्यांचे  मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.  हा लेक टॅपिंग प्रकल्प महाराष्ट्राला एक वरदान असल्याचेही मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले.

येत्या डिसेंबर अखेर राज्य वीज भारनियमनमुक्त ... उपमुख्यमंत्री अजित पवार

        लेक टॅपिंगबरेाबरच  राज्यात अन्य ठिकाणी वीज निर्मितीचे  प्रकल्प कार्यान्वित होत असून येत्या डिसेंबर अखेर राज्य वीज भारनियमनमुक्त होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी बेालताना व्यक्त केला. ते म्हणाले, राज्यात वीज निर्मितीच्या उपलब्ध असणा-या  अन्य साईट आहेत. त्यामध्ये वीज निर्मितीचे प्रकल्प हाती घेण्यास शासनाचे प्राधान्य राहील.
        कोयनेतील लेक टॅपिंग प्रकल्प अभियंत्यांनी केवळ 100 दिवसात पूर्ण करुन नवा इतिहास नोंदविला असल्याचे स्पष्ट करुन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, लेक टॅपिंग मुळे उपलब्ध होणारे अतिरिक्त पाणी सातारा, सांगली, सोलापूर जिल्हयातील दुष्काळी भागाला देण्यास प्राधान्य राहील. या प्रकल्पामुळे दुष्काळी जनतेला पाणी देण्याबरोबरच वीज निर्मितीला चालना मिळणार असल्याचे ते म्हणाले.  हा प्रकल्प स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षात होत असल्याने यास अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.
        राज्यात वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून abcdef  असे वर्गीकरण करण्यात आले असून abc वर्गीकरणात येणाऱ्या जिल्हयांना भारनियमन होणार नाही, तर def वर्गीकरणात येणाऱ्या जिल्हयांना भारनियमन लागू राहील, def वर्गीकरणात येणाऱ्या जिल्हयांनी वीज गळती रोखून आपले जिल्हे भरनियमनमुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
        कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या कामास राज्य शासनाने प्राधान्य दिले असून धरणग्रस्तांना महाराष्ट्र शासन वाऱ्यांवर सोडणार नाही, अशी ग्वाही देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी 22 कोटीचा निधी उपलब्ध करुन देऊन धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न येत्या डिसेंबरअखेर मार्गी लावला जाईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
        कोयना धराणातून 4 टप्प्याद्वारे 1960 मेगावॅट वीज निर्मिती होत असून या आजच्या ऐतिहासिक   लेक टँपिंगमुळे आणखीन अतिरिक्त वीज निर्माण करणे शक्य होणार आहे. तसेच दुष्काळी भागातील जनतेला पाणी देणेही सोईचे होणार असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, कोयना धरणातील हे दुसरे लेक टॅपिंग यशस्वी झाले असून महाराष्ट्राच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे. या लेक टॅपिंगच्या यशस्वीतेसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या अभियंत्यांचा शासनामार्फत यथोचित सत्कार करुन त्यांना आगाऊ वेतनवाढ देण्याचा जलसंपदा विभागाने प्रस्ताव आणावा अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
                    
लेक टॅप : मन थक्क
        आशिया खंडातील दुसऱ्या कोयना लेक टॅपिंगसाठी मुख्यमंत्री महोदयांनी कोयना लेक टॅपिंगच्या शुभारंभ करण्यासाठी कळ दाबताच गडगडाट होत जमीन हादरली आणि पुढच्या काही सेंकदातच शिवसागर जलाशयातील पाण्याने उसळी मारली. ते अंगावर रोमांच्च उभे करणारे दृष्य पाहून मान्यवरांसह  सर्वच उपस्थितांच्या डोळयाचे पारणे फिटले. टाळयांचा कडकडात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत त्यांनी आपली भावना उर्त्स्फूतपणे व्यक्त केली. सकाळी 10.57 मिनिटांनी झालेल्या या लेक टॅपिंगमुळे भारतीय तंत्रज्ञांनी अथक परिश्रमातून केलेल्या कामगिरीस उपस्थितांची वाहवा मिळाली.   लेक टॅपिंगचे दृश्य टिपण्यासाठी विविध प्रसारमाध्यमांचे आणि वृत्तपत्रांच्या कॅमेऱ्याबरेाबरच, अधिकारी आणि गावकऱ्यांनाही  छायाचित्रे टिपण्याचा मोह आवरला नाही. कोयनेच्या अथांग शिवसागर जलाशयांमधील लेक टॅपिंगचा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी पैलतिरावरही लोकांनी गर्दी केली होती

        याप्रसंगी पालकमंत्री रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, राज्याच्या विकासात कोयनेचे फार मोठे योगदान आहे. आजचा लेक टॅपिंग हा एक ऐतिहासिक क्षण असून महाराष्ट्राच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे. याबरोबरच कोयना धरणग्रस्तांचे प्रलंबित असणारे प्रश्न मार्गी लावणे गरजेचे असून यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.
        याप्रसंगी जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे म्हणाले, कोयनेच्या लेक टॅपिंगमुळे अभियांत्रिकी क्षेत्रातील मानाचा तुरा महाराष्ट्राच्या शीरपेचात रोवला गेला आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यासह अन्य नेत्यांच्या द्ष्ट्या नेतृत्वामूळे महाराष्ट्राच्या प्रगतीला हातभार लागला आहे. दिवसेंदिवस वाढणारी पाण्याची गरज आणि वीजेची मागणी लक्षात घेऊन जलाशयाचे साठे वाढविण्याचे काम हाती घेणे गरजचे आहे,  या कामास प्राधान्य दिले असल्याचे ते म्हणाले.
        कोयना धरणातून वीज निर्मितीद्वारे 67 टीएमसी पाणी वाया जात असून त्याचा विनियोग सिंचनासाठी पिण्यासाठी करण्याबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे असल्याचे सांगून जलसंपदा सुनिल तटकरे म्हणाले, कोयनेच्या उभारणी संदर्भातील कागदपत्रांचे जतन करणे गरजचे आहे. या सर्व उभारणीचे डॉकुमेंटेशन करण्याचे काम पाटबंधारे विभागाने हाती घ्यावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.  कोयनेचे लेक टॅपिंग हा महत्वाकांक्षी प्रकल्प पाटबंधारे विभागातील अभियंत्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि कठोर प्ररिश्रमातून यशस्वी केल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
      
  प्रारंभी कोयना जलविद्युत प्रकल्पाचे मुख्य अभियंता दीपक मोडक यांनी कोयना धरण प्रकल्प तसेच लेक टॅपिंग या संदर्भातील प्रगतीचा आढावा घेतला. समारंभास  आमदार शिवेंद्रसिह राजे भासले, आमदार मकरंद पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार विक्रमसिंह पाटणकर, आमदार बाळासाहेब पाटील, माजी सभापती शंकरराव जगताप, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ पाटील, लाभ क्षेत्र विकास सचिव देवेंद्र शिर्के, पुणे विभागीय आुयक्त प्रभाकर देशमुख, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक तुकाराम चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन, मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम देशपांडे, पोलीस अधीक्षक  के.एम.एम.प्रसन्ना, अधिक्षक अभियंता टी एम मुंडे, अधीक्षक अभियंता नागेंद्र शिंदे, प्रांताधिकारी स्वाती देशमुख, तहसिलदार प्रल्हाद हिरामणी  यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, जिल्हा परिषद विषय समित्यांचे सभापती, वरिष्ठ अधिकारी, अभियंते आणि नागरिक उपस्थित होते.
                                                0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा