दुष्काळी भागातील समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध
चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविणार
- मुख्यमंत्री
सांगली, दि. 6 : दुष्काळी
भागातील जनतेच्या
पाठिशी राज्य शासन ठामपणे उभे असून, दुष्काळाचा सामना करण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही. दुष्काळी
भागातील समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे
प्रतिपादन मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
जत तालुक्यातील माडग्याळ
व उमदी परिसरातील दुष्काळी
परिस्थितीची पाहणी करताना मुख्यमंत्री
श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतिक पाटील, पालकमंत्री
डॉ. पतंगराव कदम, गृहमंत्री
आर. आर. पाटील, ग्रामविकास
मंत्री जयंत पाटील, जतचे आमदार प्रकाश शेंडगे उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, दुष्काळी
भागातील चारा आणि पिण्याच्या
पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रशासनाने अधिक सतर्कतेने काम करणे आवश्यक आहे. आवश्यक असतील तेथे चारा डेपो सुरु करुन गरज भासल्यास
चारा छावणी सुरु करण्याचे
आदेश त्यांनी जिल्हा प्रशासनाला
दिले. तसेच या भागातील कोणाचीही वीज तोडू नये, तोडली असेल तर ती जोडण्यात यावी अशा सूचना त्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच सांगली जिल्ह्यात 10 हजार हेक्टरवर
वैरण विकास कार्यक्रम राबविण्यात
येत असून त्यामुळे हिरवा चारा उपलब्ध होईल. टंचाई परिस्थिती नियंत्रणात
आणण्यासाठी तहसीलदारांना सर्व अधिकार दिले असून जिल्हा प्रशासनाने
याची योग्य ती खबरदारी घ्यावी असे सांगून दुष्काळ निवारण कार्यक्रमात
कुचराई करणाऱ्यांची
गय केली जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
या भागात मागेल त्याला काम देण्याबरोबरच यतनाळ तलावात पाणी आणण्यासाठी कर्नाटक सरकारशी बोलून हा प्रश्न तातडीने मार्गी लावू. म्हैसाळ, ताकारी, टेंभू आणि आरफळ योजना मार्गी लावण्यासाठी
शासन प्रयत्नशील
असून राज्य सरकार आपला 10 टक्के निधी खर्च करण्यात कमी पडणार नाही. परंतु केंद्र सरकारकडून यासाठी मिळणारा 90 टक्के निधी तातडीने मिळविणे आवश्यक असल्याचे
त्यांनी स्पष्ट केले. म्हैसाळ योजनेत समाविष्ट
नसलेल्या आठ गावांचा समावेश या योजनेत करण्यात येईल. केंद्र सरकारकडून दुष्काळी
भागाला भरीव निधी मिळण्यासाठी
पाठपुरावा सुरु असून लवकरच हा निधी प्राप्त होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दुष्काळी
भागातील शेततळ्यांना
प्लॅस्टिक कागद लावण्याचा आणि सिमेंट बंधारे बांधण्याचा कार्यक्रम
लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय कोळसा राज्यमंत्री
प्रतिक पाटील म्हणाले, केंद्र सरकारकडून दुष्काळी
भागाला भरीव निधी मिळण्यासाठी
प्रयत्न करु. म्हैसाळसह इतर योजना मार्गी लावून जत तालुक्याचा पाण्याचा
प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जत तालुक्याचे
विभाजन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री डॉ. कदम म्हणाले, शासनाच्या
सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचविणे
आवश्यक असून प्रशासनाने अधिक कार्यक्षमतेने काम करणे गरजेचे आहे. पिण्याचा
पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न सोडविण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. मुलांची परीक्षा फी माफ करणे, शेतसारा वसूलीस स्थगिती, शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत न करणे, मागेल त्याला काम देणे, सहकारी संस्थांकडील
कर्जाची पुनर्रचना
करणे अशा सवलती दुष्काळी
भागाला मिळणे आवश्यक असल्याचे
त्यांनी स्पष्ट केले.
गृहमंत्री आर. आर. पाटील म्हणाले, पिण्याच्या पाण्याचे
टँकर वाढविणे गरजेचे असून या भागात चांगले कर्मचारी
आणि अधिकाऱ्यांची नेमणूक करणे आवश्यक आहे. या भागातील पशुधन वाचविणे म्हणजेच दुष्काळाला समर्थपणे
तोंड देणे होय असेही ते म्हणाले. दुष्काळी
भागातील परिस्थितीचा
आढावा घेण्यासाठी
आणि दिलेली मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहचते का याची शहानिशा करण्यासाठी
जिल्हाधिकारी कार्यालयात
उपजिल्हाधिकारी दर्जाचा संपर्क अधिकारी नेमणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामविकास मंत्री जयंत पाटील म्हणाले, म्हैसाळ योजना मार्गी लावणे अशी सर्वांची
मागणी आहे. त्यामुळे
ही योजना लवकरात लवकर पूर्णत्वास नेणे गरजेचे आहे. दुष्काळी
भागातील परिस्थिती
नियंत्रणात आणण्यासाठी
10 : 90 मधील योजना अनुशेषामधून
वगळण्यात याव्यात आणि त्यांना अतिजलद अनुदान उपलब्ध करुन द्यावे. सर्वांनी मिळून दुष्काळाचा सामना करु असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार प्रकाश शेंडगे व जिल्हा परिषदेचे
उपाध्यक्ष बसवराज पाटील यांनी जत तालुक्यातील
शेतकऱ्यांच्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.
तसेच शेतकऱ्यांचे
प्रतिनिधी म्हणून कृष्णदेव गायकवाड, पी. एम. पाटील, चन्नाप्पा
होर्ती यांनी समस्या मांडल्या.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी माडग्याळ, सोन्याळ फाटा चारा डेपोची पाहणी केली तसेच माडग्याळ
येथील बंधाऱ्याचे
भूमिपूजन त्यांच्या
हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी माजी आमदार उमाजीराव सनमडीकर, विश्वजित कदम, विजयसिंह डफळे, जिल्हाधिकारी श्याम वर्धने, प्रांताधिकारी दत्तात्रय कवितके, तहसीलदार वर्षा शिंगण-पाटील, गट विकास अधिकारी अरुणा इटाई, तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा