माहिती तंत्रज्ञानाच्या
वापरामुळे इतिहास संशोधनास प्रेरणा मिळेल
-- मुख्यमंत्री
मुंबई, दि. 5 : माहिती तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करीत
शिवरायांचा तसेच महाराष्ट्राचा देदिप्यमान इतिहास 'जिवंत' करावा जेणेकरुन इतिहास
संशोधनाला प्रेरणा मिळून संशोधक वृत्ती वाढीस लागेल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण यांनी आज येथे सांगितले.
राज्याच्या पुराभिलेख संचालनालयाने
संपादित केलेल्या 'छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ पत्रे' या पुस्तकाचे प्रकाशन
करताना ते बोलत होते. इ. स. 1646 ते 1679 या कालावधीतील छत्रपती शिवाजी
महाराजांच्या मोडीतील 28 मूळ पत्रांचे मराठी लिप्यंतर आणि मराठी व इंग्रजीतील
सारांश या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी होते. आमदार मंगलप्रभात लोढा, पुराभिलेख संचालनालयाच्या संचालक
श्रीमती सुप्रभा अग्रवाल आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, शिवाजी
महाराजांची दुर्मिळ पत्रांचे लिप्यंतर करण्यात आल्यामुळे इतिहास संशोधकांनाच नव्हे
तर सर्वसामान्यांना देखील या अभिलेखाचा अर्थ सहजपणे कळून येण्यास मदत होईल. महाराजांची
पत्रे ही पदोपदी प्रेरणा देणारी असून, त्यांच्या राज्यकारभाराची पद्धत तसेच
वेळोवेळी दिलेली आज्ञापत्रे यांचे पत्ररुप वाचन अभ्यासपूर्ण राहील.
ई-बुक्स
किंवा वेबसाईटसचा उपयोग व्हावा
महाराष्ट्राला देदिप्यमान इतिहास लाभला
असून विशेषतः शिवरायांच्या कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेविषयी आजही अतिशय
उत्सुकतेने वाचले जाते. हा सर्व इतिहास संकेतस्थळ, ई- बुक व इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा
वापर करुन ऑनलाईन उपलब्ध केला तर जगभरच्या
संशोधकांना, विद्यार्थी तसेच सर्वसामान्यांना त्याचा उपयोग होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
जुन्या
अभिलेखांचे मायक्रोफिल्मिंगद्वारे जतन करण्याचे
काम संचालनालय करीत असल्याचे
श्री. देवतळे यांनी प्रास्ताविकात सांगितले. श्रीमती
अग्रवाल यांनी संचालनालयाच्या कामाविषयी माहिती दिली. 190 वर्षांपासून हे अभिलेख
जतन करण्याचे काम सुरु असून, सुमारे पंधरा कोटी अभिलेख या ठिकाणी उपलब्ध आहेत.
त्यात पाच कोटी अभिलेख मोडी लिपीतील असून, आशिया खंडातील ही सर्वात मोठी पुराभिलेख
संस्था आहे, असे त्यांनी सांगितले.
'म्यानातून उसळे तलवारीची पात' आणि 'जय जय शिवराय' या गीतांनी कार्यक्रमाची
सुरुवात झाली. हेमंत बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.
0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा