बुधवार, ८ फेब्रुवारी, २०१२

आठ मतदान केंद्रांवर फेरमतदान
जिल्हा परिषद, पंचायत समिती क्षेत्रातील
निवडणूक आचारसंहिता शिथिल

मुंबई, दि. 8 : राज्यातील 27 जिल्हा परिषदा व 305 पंचायत समितीच्या क्षेत्रातील निवडणूक आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे. तसेच आठ मतदान केंद्रांवर 12 फेब्रुवारी 2012 रोजी फेरमतदान घेण्याचाही निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून मतमोजणी संपेपर्यंत लागू असते. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या मतदानाची प्रक्रिया संपली असली तरी मतमोजणी 17 फेब्रुवारी 2012 रोजी होणार आहे. त्यामुळे मतदान आणि मतमोजणीतील बराच कालावधी लक्षात घेऊन आणि विकास कामांमध्ये अडथळा येऊ नये यासाठी संबंधित जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रातील आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या चार तालुक्यात 12 फेब्रुवारी 2012 रोजी मतदान असल्यामुळे तेथे मतदान प्रक्रिया संपेपर्यंत आचारसंहिता लागू राहील; तसेच महानगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता मात्र 17 फेब्रुवारी 2012 पर्यंत लागू राहील, असेही त्यांनी प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.
आठ ठिकाणी 12 फेब्रुवारीला फेरमतदान  
बीड जिल्ह्यातील होळ (ता. केज) येथील मतदान केंद्र क्रमांक 45/20, परभणी जिल्ह्यातील सोस (ता. जिंतूर) येथील मतदान केंद्र क्रमांक 4/19 , सांगली जिल्ह्यातील अनुक्रमे खानापूर (ता. खानापूर) येथील मतदान केंद्र क्रमांक 85, वाळवा (ता. वाळवा) येथील मतदान केंद्र क्रमांक, दिघंची (ता. आटपाडी) येथील मतदान केंद्र क्रमांक 27, नाशिक जिल्ह्यातील पांगरी बु. (ता. सिन्नर) येथील मतदान केंद्र क्रमांक 71/18, कोल्हापूर जिल्ह्यातील हसुर खु. (ता. कागल) येथील मतदान केंद्र क्रमांक 34/68/37 आणि जालना जिल्ह्यातील पोखरी केंधळी (ता. मंठा) येथील मतदान केंद्र क्रमांक 31/28 या आठ मतदान केंद्रांवर 12 फेब्रुवारी 2012 रोजी फेरमतदान घेण्यात येणार आहे. या सर्व मतदान केंद्रांवर मतदान यंत्रातील तांत्रिक बिघाडामुळे फेरमतदानाचा निर्णय घेण्यात आला आहे. फेरमतदान होत असलेल्या संबंधित गट आणि गणात मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आचारसंहिता कायम राहील, असेही श्रीमती सत्यनारायण यांनी म्हटले आहे.
सरासरी 66.90टक्के मतदान
राज्यातील 27 जिल्हा परिषदा आणि 305 पंचायत समित्यांसाठी काल  (ता. 7) एकूण सरासरी 66.90 टक्के मतदान झाले. सर्वाधिक 75.24 टक्के मतदान कोल्हापूर जिल्हात, तर सर्वात कमी 58.24 टक्के मतदान ठाणे जिल्ह्यात झाले. जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी अशी: ठाणे- 58.24, रायगड-69.9, रत्नागिरी- 63.52, सिंधुदुर्ग- 67.17, नाशिक- 64.23, जळगाव- 63.7, अहमदनगर- 65.9,  पुणे- 65.6, सातारा-67.26, सांगली- 70.11, सोलापूर- 65.28, कोल्हापूर- 75.24, औरंगाबाद-67.77, जालना- 70.06, परभणी- 71.15, हिंगोली- 72.27, बीड- 66.67, नांदेड- 64.18, उस्मानाबाद- 64.23, लातूर- 65.29,  अमरावती-65.4, बुलढाणा- 69.22,  यवतमाळ-64.55, नागपूर- 62.87, वर्धा- 69.17, चंद्रपूर- 71.5, गडचिरोली- 67, आणि एकूण सरासरी- 66.90

0-0-0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा