राज्य निवडणूक आयोग
महाराष्ट्र
पहिला माळा, नवीन प्रशासकीय भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई- 400 032.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
(प्रसिद्धिपत्रक) दि. 13 फेब्रुवारी 2012
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-2012
महिला उमेदवारांसाठी केवळ
अडीच हजार रुपये अनामत रक्कम
मुंबई, दि. 13 : महानगरपालिका निवडणुकीतील महिला उमेदवारांना नियमाप्रमाणे केवळ अडीच हजार रुपयेच अनामत रक्कम म्हणून जमा करणे आवश्यक असते, असे स्पष्टिकरण राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केले आहे.
महानगरपालिका निवडणुकीसाठी महिला उमेदवारांना केवळ अडीच हजार रुपयेच अनामत रक्कम भरणे आवश्यक असताना काही ठिकाणी पाच हजार रुपये अनामत रक्कम म्हणून घेण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे हे स्पष्टिकरण करण्यात आले आहे. त्यानुसार ज्या महिला उमेदवारांकडून पाच हजार रुपये अनामत रक्कम घेण्यात आली आहे त्यांना अडीच हजार रुपये तात्काळ परत करण्यात यावेत; तसेच यापुढे होणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये नियमातील तरतुदीनुसारच अनामत रक्कम घेतली जाईल, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्याबाबत सर्व महानगरपालिका आयुक्तांना कळविण्यात आले असल्याचे राज्य निवडणूक आयुक्तांनी नमूद केले आहे.
महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर जाहीर प्रचार करता येत नाही; परंतु घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर बंदी नाही. त्याचबरोबर प्रचार समाप्तीनंतर किंवा मतदानाच्या दिवशी केवळ वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध करण्यासही हरकत नसल्याचे राज्य निवडणूक आयुक्त यांनी स्पष्ट केले आहे.
0-0-0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा