बुधवार, १४ डिसेंबर, २०११

राष्ट्रकुल संसदीय अभ्यासवर्गाचे उद्‌घाटन


 
  राष्ट्रकुल संसदीय अभ्यासवर्गाचे उद्‌घाटन
परिपक्व राजकीय नेतृत्वांमुळे लोकशाही मजबूत-मुख्यमंत्री
    नागपूर, दि. 14 : देशात संसदीय लोकशाही स्वीकारल्यानंतर तिच्या यशाबद्दल अनेकांना शंका होती. पण परिपक्व राजकीय नेतृत्वांची परंपरा लाभल्यामुळे आपल्या देशात मजबूत लोकशाही निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
     विधान परिषद सभागृहात आयोजित राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या 41 व्या अभ्यासवर्गाचे उद्‌घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
     मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, भारतीय लोकशाहीने प्रगल्भ राजकारणाचा आदर्श घालून दिला आहे. देशात ज्यावेळी लोकशाही शासन पद्धती स्वीकारण्यात आली त्यावेळी अनेकांना या पद्धतीच्या यशस्वितेबद्दल शंका होती. काहींना तर अराजक माजण्याची भीती वाटत होती. परंतु काळाच्या कसोटीवर ही पद्धत अत्यंत यशस्वी ठरली. समाजाच्या सर्व घटकांमध्ये अगदी तळागाळापर्यंत रुजली. तिचा पाया भक्कम झाला. देशाला परिपक्व राजकीय नेतृत्वांची परंपरा लाभल्यामुळे हे शक्य झाले.
     राज्यकर्त्यांकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पण निव्वळ लोकप्रिय निर्णय न घेता व्यापक जनहिताचा विचार करुन प्रसंगी कटू निर्णय घेणेही गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
     आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, दर्जेदार समाजरचना निर्माण करायची असेल तर जबाबदार लोकप्रतिनिधींची आवश्यकता आहे. राजकारणी लोकांबद्दल समाजात अनेक चुकीचे समज आहेत. तरुणांनी मोठ्या प्रमाणात राजकारणात सहभागी होऊन लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
     यावेळी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधक असे दोन्ही पक्ष तेवढेच महत्त्वाचे आहेत. व्यवस्थेतील त्रुटी दाखवून देत लोकशाही अधिक बळकट करण्याचे काम विरोधी पक्षाच्या माध्यमातून होत असते.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेचे पदाधिकारी उल्हास पवार यांनी केले. विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी आभार मानले. यावेळी राज्य मंत्रिमंडळाचे तसेच विधिमंडळाचे सदस्य, विविध विद्यापीठांतील विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 0 0 0 0


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा