मंगळवार, १३ डिसेंबर, २०११




जेएनएनयुआरएमयोजनेसाठी महाराष्ट्राला पाच राष्ट्रीय पुरस्कार
मलकापूर नगरपंचायतसह अमरावतीला राष्ट्रीय जल पुरस्कार

नवी दिल्ली दि 13 डिसेंबर : जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी नवीनीकरण विकास मिशन (जेएनएनयुआरएम) योजनेसाठी सन 2010 वर्षाकरिता महाराष्ट्राला एकूण 5 पुरस्कार मिळाले आहेत. पिंपरी चिंचवड व  नवी मुंबई या महानगरपालिकेचा यामध्ये समावेश आहे. तर आज याच कार्यक्रमामध्ये नगरविकास विभागातर्फे प्रतिष्ठीत राष्ट्रीय जल पुरस्कार देण्यात आले. यामध्ये सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगर पंचायत व अमरावती  महानगरपालिकेचा समावेश आहे.
     सर्वाधिक नागरिकरण असणाऱ्या महाराष्ट्राने या योजनेमध्ये काही उल्लेखनीय उपक्रम राबविले आहेत. त्यासाठी विविध गटात मंगळवारी नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात पुरस्कार प्रदान करण्यात आले. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, नगर विकास मंत्री कमलनाथ, गृहनिर्माण नागरी गरीबी निर्मूलन मंत्री कुमारी सेलजा, राज्यमंत्री सौगात रॉय, योजना आयोगाचे उपाध्यक्ष मोन्टेकसिंग अहलुवालीया आदी मान्यवरांनी हे पुरस्कार प्रदान  केले.
     नगरविकास व गृहनिर्माण नागरी गरीबी निर्मूलन मंत्रालयातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जेएनएनयुआरएमच्या दुसऱ्या टप्याला सुरूवात करण्यापूर्वी पहिल्या  टप्यातील यशापयशाची समीक्षा आजच्या बैठकीत करण्यात आली. या बैठकीत  महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व राज्याचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी केले.
     पिंपरी चिंचवड महानगर पालिकेला आजच्या शानदान सोहळयात तीन विविध गटात पुरस्कार प्रदान करण्यात आले. या योजनेतंर्गत देशभरातील सर्वात सुंदर शहर, सांडपाणी आणि पाणीपुरवठयात सुधारणा करणारे शहर, आणि गरीबांसाठी यशस्वी योजना राबविणारे शहर तीन योजनांसाठी हे पुरस्कार मिळाले. राज्याचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, पिंपरी चिंचवडचे महापौर योगेश बहल, आयुक्त आशिष शर्मा यांनी हे पुरस्कार स्वीकारले. तर नवी मुंबई महानगरपालिकेला दोन गटात पुरस्कार मिळाला. यामध्ये उत्कृष्ट प्रशासन आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या पुरस्काराचा समावेश आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर  सागर नाईक आणि आयुक्त भाष्कर वानखडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

     आजच राष्ट्रीय नागरी जल पुरस्कारही वितरीत करण्यात आले. यामध्ये संपूर्ण भारतात आपल्या अभिनव तंत्रज्ञानाने यशस्वी पाणी पुरवठा करणाऱ्या मलकापूर (तालुका कराड जि. सातारा) नगरपंचायतला पहिला पुरस्कार बहाल करण्यात आला. मिटरव्दारे चोवीस तास पाणीपुरवठयाची स्वंयचलित यंत्रणा साकारणारी ही भारतातील पहिली नागरी वस्ती आहे. जीवन प्राधीकरणाचे सदस्य सचिव राधेश्याम मोपुलवार, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे आणि नगर पंचायतचे मुख्यअधिकारी हेमंत निकम यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रपरिषदेत मलकापूर येथे राबविलेल्या प्रकल्पाची सविस्तर माहिती  उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली या पत्रपरीषदेत मुख्यअधिकारी हेमंत निकम, शाखा अभियंता उत्तम बागडे यांनी दिली.
     दुसरा राष्ट्रीय पाणी पुरवठा उपविजेता पुरस्कार अमरावती महानगर पालिकेला मिळाला आहे. अमरावतीचे महापौर किशोर शेळके आणि आयुक्त नवीन सोना यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा