मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०११

खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती


पदक प्राप्त 12 खेळाडूंना शासनसेवेत थेट नियुक्ती
देण्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आदेश
           मुंबई, दि.4 : विविध क्रीडा स्पर्धांमध्ये पदके प्राप्त करून राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या 8 खेळाडूंना गट 'अ' वर्गात व 4 खेळाडूंना गट 'ब' वर्गात शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे दिले.
शासन सेवेत नियुक्तीसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना थेट नियुक्ती देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
          ऑलिम्पिक, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये पदक प्राप्त खेळाडूंना गट 'अ' व आशियाई चॅम्पियन, ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन आणि युथ ऑलिम्पिक पदक प्राप्त खेळाडूंना गट 'ब' वर्गात नियुक्ती देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
          राज्याचे आणि पर्यायाने देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना उदरनिर्वाहाची खात्री मिळाल्यास ते खेळातील प्राविण्य वाढविण्याकडे लक्ष देतील म्हणून त्यांना शासकीय आणि इतर नोकऱ्यांमध्ये आरक्षण ठेवण्याची मागणी सातत्याने होत होती. त्यादृष्टीने अत्युच्च गुणवत्ताप्राप्त खेळाडूंसाठी नोकऱ्यांमध्ये आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील गट अ, ब, क आणि ड संवर्गातील नामनिर्देशनाने भरण्यात येणाऱ्या पदांपैकी 5 टक्के पदे विशेष कामगिरी बजावणाऱ्या स्त्री आणि पुरुष खेळाडूंसाठी आरक्षित असावीत असा निर्णय घेण्यात आला.
          पंकज शिरसाट (कबड्डी) अहमदनगर, धनंजय महाडिक (हॉकी) ठाणे, नवनाथ फरताडे (नेमबाजी) पुणे, नरसिंग यादव (कुस्ती) मुंबई, नितीन घुले (कबड्डी) पुणे, श्रीमती स्नेहल साळुंखे (कबड्डी) मुंबई, वीरधवल खाडे (जलतरण) कोल्हापूर, कु.दिपीका जोसेफ (कबड्डी) पुणे या 8 खेळाडूंना गट 'अ' वर्गात तसेच कु. दिपाली कुलकर्णी (पॉवर लिफ्टींग) ठाणे, सुहास खामकर (बॉडीबिल्डींग) कोल्हापूर, संदीप आवारी (पॉवर लिफ्टींग) ठाणे, सतीश पाताडे (पॉवर लिफ्टींग) मुंबई या चार खेळाडूंना गट 'ब' वर्गात नियुक्ती देण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
          या बैठकीला उप मुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, क्रीडा मंत्री पद्माकर वळवी व  क्रीडा व युवक कल्याण विभागाचे प्रधान सचिव संजीव कुमार उपस्थित होते.
0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा