शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडीयाने
जागतिक पातळीवर भारताचा नावलौकिक वाढवावा
--पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग
मुंबई, दि. 1 : शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडीया ही राष्ट्रध्वजाने सन्मानित अशी विविधांगी कार्य करणारी नामांकित कंपनी असून तिने जागतिक क्षेत्रात उच्च पातळीवर भारताचा नावलौकिक वाढवावा, असे प्रतिपादन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज येथे केले. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडीयाच्या सुवर्णमहोत्सवी सांगता समारंभानिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते.
यावेळी राज्यपाल डॉ. के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय नौकानयन मंत्री जी. के. वासन, राज्यमंत्री मुकुल रॉय, केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा, शिपिंग सचिव के. मोहनलाल, शिपिंग कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. हाजरा, आयएमओचे (इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनचे) महासचिव ई. मित्रोपोउलस आदी मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान पुढे म्हणाले की, गेल्या 50 वर्षांतील शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडीयाची कामगिरी ही भारतीय नौकानयन क्षेत्र व आंतरराष्ट्रीय स्तरावर निश्चितच गौरवास्पद आहे. कंपनी शिपिंग क्षेत्रासाठी विविध सेवा पुरविणारी अग्रेसर कंपनी असून या कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दीर्घ पल्ल्याची कंटेनर सेवा पुरविणारी तसेच एलएनजी वाहतुकीसारख्या अति विशिष्ट क्षेत्रात प्राविण्य मिळविलेली एकमेव भारतीय कंपनी असल्याचा नावलौकिक मिळविला आहे. कंपनीने केलेल्या ऑईल, कोळसा, तेल, गॅस, लोखंड आदींच्या वाहतूक सेवेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल पंतप्रधानांनी यावेळी कंपनी व कर्मचाऱ्यांचे पंतप्रधानांनी विशेष अभिनंदन केले.
देशाच्या आर्थिक विकासात शिपिंग, बंदरे, जहाज बांधणी व जहाज दुरुस्ती ही क्षेत्रे अत्यंत महत्वाची असून या क्षेत्राच्या विकासासाठी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.
नावीक दल, तटरक्षक दल आणि जहाज कंपन्या यांच्यामार्फत देशाची सागरी सुरक्षा योग्य प्रकारे सांभाळली जात असून यापुढेही त्यांनी अधिक दक्ष राहण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडीयाच्या उज्वल भविष्यासाठी त्यांनी याप्रसंगी शुभेच्छा दिल्या. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडीयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि इतर मान्यवर मुंबईत आल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचे मन:पूर्वक स्वागत केले आणि कंपनीच्या सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभासाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, भारताच्या आर्थिक विकासात शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडीयाचे फार मोठे योगदान असून पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी शिपिंग संदर्भात पाहिलेले स्वप्न शिपिंग कॉर्पोरेशनने साकार केले आहे. त्यांनी शिपिंग कॉर्पोरेशनला उज्ज्वल भवितव्यासाठी यावेळी शुभेच्छा दिल्या.
केंद्रीय मंत्री जी. के. वासन यांनी आपल्या भाषणात हा ऐतिहासिक प्रसंग असल्याचे सांगून शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडीयाच्या कार्याचा आढावा घेतला. शिपिंग कॉर्पोरेशन जगात सर्वोत्तम असल्याचेही ते म्हणाले. राज्यमंत्री मुकुल रॉय यांनी स्वागतपर भाषणात कॉर्पोरेशनच्या कार्याचा आढावा घेतला. ई. मित्रोपोउलस यांचेही यावेळी समायोचित भाषण झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी एस. हाजरा यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमास खासदार, आमदार तसेच शिपिंग व विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा