शासन आणि बांधकाम व्यावसायिकांमध्ये
विश्वासाचे नाते निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील
- मुख्यमंत्री
मुंबई, दि.14 सप्टेंबर : शासन आणि बांधकाम व्यावसायिकांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. बांधकाम व्यावसायिकानीही सर्व नियमांचे पालन करून या प्रयत्नांना साथ द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ हौसिंग इंडस्ट्रिच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत श्री.चव्हाण बोलत होते. बैठकीला मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.टी.सी.बेंजामिन, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सुबोध कुमार, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त राहूल अस्थाना, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव गौतम चटर्जी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस.झेंडे, चेंबरचे अध्यक्ष पारस गुंदेचा, विमल शाह, सुनील मंत्री, प्रविण दोशी, मोफतराज मुनोत, प्रविण दोशी, मोहन देशमुख आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
बांधकाम व्यवसायिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, माहिती अधिकाराच्या कायद्यामुळे मंत्री आणि अधिकारी फाईंलीवर निर्णय घेत नाहीत अशी टिका होते. परंतु माहितीच्या अधिकारामुळे पारदर्शकता आलेली असल्यामुळे प्रत्येक निर्णय विचारपूर्वकच घ्यावा लागतो. त्यात वावगे काहीच नाही. नियमानुसार आलेली व सर्व कायद्यांचे पालन केलेली फाईल निर्णयाविना राहणे शक्यच नाही. मात्र तसे नसेल तर ती मंजूर होण्याची अपेक्षा कशी ठेवता येईल? यासाठीच शासन, सर्व कार्यान्वयन यंत्रणा आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यामध्ये निरोगी आणि विश्वासाचे वातावरण निर्माण होण्याची गरज आहे. महाराष्ट्र चेंबर आणि शासन मिळून आपण हे निर्माण करू शकतो.
मुंबईच्या विकासात बांधकाम व्यावसायिकांचे योगदान महत्वाचे आहे असे सांगून श्री.चव्हाण म्हणाले, आम्हालाही गतिमान विकास हवा आहे. मात्र घाई नको आहे. कोणताही निर्णय पूर्वग्रह न ठेवता किंवा झुकते माप न देता व्हावा यासाठी स्वेच्छाधिकार कमी करण्याचे प्रयत्न मी करीत आहे. सर्वांनी आमच्या प्रामाणिक प्रयत्नांना सर्वांनी साथ द्यावी अशी अपेक्षा आहे. मुंबईच्या नवीन विकास नियंत्रण नियमावली संदर्भात श्री.चव्हाण यांनी उपस्थित बांधकाम व्यावसायिकांची मतेही जाणून घेतली.
----------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा