गुरुवार, ८ सप्टेंबर, २०११


मिहान प्रकल्पात जमीन दिलेल्या कंपन्यांना बांधकाम करण्यास एक वर्षाची मुदतवाढ
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचा निर्णय
नागपूर येथील मिहान प्रकल्पांतर्गत जमीन दिलेल्या कंपन्यांना बांधकाम करण्यास एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज 8 सप्टेंबरला  महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
कंपनीचे अध्यक्ष मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली 34 व्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस कंपनीचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक यु.पी.एस मदान, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्षत्रपती शिवाजी, सामान्य प्रशासन विभागाचे (नागरी विमान चालन)  सचिव नंदकुमार जंत्रे, विशेष कार्य अधिकारी एस.शहजाद हुसेन, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे, नागपूर सुधार प्रन्यास चे अध्यक्ष प्रवीण दराडे आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
     प्रकल्पांतर्गत जमीन देण्यात आलेल्या कंपन्यांनी त्यांचे बांधकाम 3 वर्षात पूर्ण करणे आवश्यक होते परंतू अद्याप काही कामे बाकी असून त्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी या कंपन्यांनी विनंती केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला.
     जळगाव विमानतळाच्या विकासासाठी सल्लागार नेमण्यास संचालक मंडळाने मंजूरी दिली. जळगाव विमानतळाच्या विकासाचे नियोजन, आराखडा आणि विकास यासंदर्भात सल्लागार आपला अहवाल कंपनीला देतील. तसेच कराड विमानतळाचा विस्तार करण्यासंदर्भात कराड येथे स्वतंत्र बैठक आयोजित करावी   या बैठकीस स्थानिक लोकप्रतिनिधींना बोलावण्यात यावे असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
     बैठकीत कंपनीच्या 31 मार्च 2011 रोजी संपलेल्या  अंदाजपत्रक आणि आर्थिक ताळेबंदास मान्यता देण्यात आली. या आर्थिक वर्षात कंपनीला कर वगळता 2.27 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असून करासह ही रक्कम 4 कोटी 85 लाख इतकी आहे.
000000000000
    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा