शनिवार, ७ डिसेंबर, २०१३

विनय आपटे यांच्या निधनामुळे रसिक
विनयशील कलावंताला अंतरले : मुख्यमंत्री
 मुंबई, दि. 7 : दूरचित्रवाहिनी, मराठी आणि हिंदी चित्रपट, रंगभूमी अशा सर्व क्षेत्रांमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते विनय आपटे यांच्या निधनामुळे रसिक एका विनयशील आणि प्रतिभावंत कलावंताला अंतरले आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.
श्री. चव्हाण यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, श्री. आपटे यांनी दूरचित्रवाहिनी, नाटक आणि सिनेमा या तीनही माध्यमांमध्ये अतिशय समर्थपणे काम केले. या तिन्ही माध्यमांच्या ताकदीची त्यांना अचुक जाण होती. त्यांनी अनेक नाटके आणि टीव्ही मालिकांचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती. 'आभाळमाया' ही त्यांनी दिग्दर्शित केलेली मालिका घराघरात प्रचंड लोकप्रिय झाली होती. अत्यंत समजूतदार आणि संयत अभिनयासाठी ते ओळखले जायचे. अमाप लोकप्रियता आणि अभिनयाची देणगी लाभूनही श्री. आपटे यांनी यश कधीही डोक्यात जाऊ दिले नाही. सोज्वळ आणि विनयशील व्यक्तिमत्व हा त्यांचा मोठा गुण होता. त्यांच्या निधनामुळे प्रत्येक मराठी रसिक हळहळला आहे, असे श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.
-------------


विरोधी पक्षनेत्यांसोबतच्या मुख्यमंत्र्यांच्या
उद्याच्या बैठकीत अल्पोपहार व चहापान नाही
डॉ. नेल्सन मंडेला यांच्या निधनानिमित्त दुखवट्यामुळे निर्णय
मुंबई, दि. 7 : विधीमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्या रविवार, 8 डिसेंबर, 2013 रोजी सायंकाळी 5.00 वाजता “रामगिरी” या नागपुर येथील शासकीय निवासस्थानी मंत्रीमंडळाचे सदस्य, दोन्ही सभागृहाचे मा. विरोधी पक्ष नेते,  विधान मंडळातील सर्व गटनेते इत्यादींसमवेत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला यांच्या निधनानिमित्तच्या दुखवट्यामुळे यावेळी अल्पोपहार व चहापान होणार नाही. डॉ. नेल्सन मंडेला यांच्या निधनाबद्दल केंद्र शासनाने 5 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
-------------


मंगळवार, ३ डिसेंबर, २०१३

हिवाळी अधिवेशनात जादूटोणा विरोधी कायदा मंजूर करणार - मुख्यमंत्री
           मुंबई, दि. 3: जादूटोणा विरोधी कायदा राज्यात लागू करण्यासाठी राज्य शासनाने अध्यादेश जारी केला आहे.   हा  कायदा नागपूर हिवाळी अधिवेशनात मंजूर करुन  या अध्‍यादेशाचे  रुपांतर कायद्यात करण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे सांगितले.
           यशवंतराव प्रतिष्ठान  कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम, मुंबई व महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मलून समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जादूटोणा विरोधी अध्यादेशावर परिसंवाद यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. या प्रसंगी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे , माजी न्यायमूती चंद्रशेखर धर्माधिकारी, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, म.बा.पवार, तसेच ॲङ निलेश पावसकर, मुक्ता दाभोळकर, विविध संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
           मुख्यमंत्री पुढे म्हणाले की,  जादूटोणा विरोधी कायदा करण्यासाठी मंत्री मंडळाने या कायद्याच्या मसुद्याला मान्यता दिली हा पहिला टप्पा ठरला. त्यानंतर  हा कायदा लागू होण्यासाठी शासनाने अध्यादेश जारी केला असून राज्यात या कायद्या अंतर्गत काही ठिकाणी गुन्हे सुध्दा दाखल करण्यात आलेले आहेत. या अध्यादेशाचे  रुपांतर कायद्यात करण्यासाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये विविध संघटना, राजकीय पक्ष यांच्याशी विचार विनिमय करण्यात येत आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात या अध्यादेशाचे रुपांतर कायद्यात करण्यास शासन कटिबध्द असल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी  दक्षता अधिकारी नेमण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. हा कायदा पारित केल्यामुळे विकसनशील देशामध्ये एक आदर्श निर्माण होईल. इतर राज्यात आणि देशात या कायद्याची अंमलबजावणी करणे सोपे होईल. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची मानसिकता सुध्दा महत्वाची आहे. समाजात विज्ञानाधिष्टीत दृष्टीकोन निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
          यावेळी बोलताना माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी म्हणाले की, कुठलाही कायदा हा समाज परिवर्तनाचा मार्ग मोकळा करतो. लोकशाहीत परिवर्तन हवे असेल तर आपल्याला कायद्याचे राज्य हवे आहे. नवपरिवर्तन समाज निर्माण करायचा असेल तर शोषणाच्या मार्गाच्या मुळाशी जाऊन विचार करुन शोषणाविरुध्द लढाई केली पाहिजे असे सांगून अंधश्रध्देला महिला मोठ्या प्रमाणात बळी पडतात. विश्वास, श्रध्दा आणि अंधश्रध्दा यातील फरक ओळखला पाहिजे.सामाजिक गुन्हे आणि व्यक्तीगत गुन्हे यामध्ये फरक केला पाहिजे. समाजातील हे प्रश्न सोडविण्यासाठी सामाजिक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

                                                       * * * * *