शनिवार, ७ डिसेंबर, २०१३

विरोधी पक्षनेत्यांसोबतच्या मुख्यमंत्र्यांच्या
उद्याच्या बैठकीत अल्पोपहार व चहापान नाही
डॉ. नेल्सन मंडेला यांच्या निधनानिमित्त दुखवट्यामुळे निर्णय
मुंबई, दि. 7 : विधीमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्या रविवार, 8 डिसेंबर, 2013 रोजी सायंकाळी 5.00 वाजता रामगिरी या नागपुर येथील शासकीय निवासस्थानी मंत्रीमंडळाचे सदस्य, दोन्ही सभागृहाचे मा. विरोधी पक्ष नेते,  विधान मंडळातील सर्व गटनेते इत्यादींसमवेत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला यांच्या निधनानिमित्तच्या दुखवट्यामुळे यावेळी अल्पोपहार व चहापान होणार नाही. डॉ. नेल्सन मंडेला यांच्या निधनाबद्दल केंद्र शासनाने 5 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
-------------


मंगळवार, ३ डिसेंबर, २०१३

हिवाळी अधिवेशनात जादूटोणा विरोधी कायदा मंजूर करणार - मुख्यमंत्री
           मुंबई, दि. 3: जादूटोणा विरोधी कायदा राज्यात लागू करण्यासाठी राज्य शासनाने अध्यादेश जारी केला आहे.   हा  कायदा नागपूर हिवाळी अधिवेशनात मंजूर करुन  या अध्‍यादेशाचे  रुपांतर कायद्यात करण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे सांगितले.
           यशवंतराव प्रतिष्ठान  कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम, मुंबई महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मलून समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जादूटोणा विरोधी अध्यादेशावर परिसंवाद यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. या प्रसंगी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे , माजी न्यायमूती चंद्रशेखर धर्माधिकारी, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, म.बा.पवार, तसेच ॲङ निलेश पावसकर, मुक्ता दाभोळकर, विविध संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
           मुख्यमंत्री पुढे म्हणाले की,  जादूटोणा विरोधी कायदा करण्यासाठी मंत्री मंडळाने या कायद्याच्या मसुद्याला मान्यता दिली हा पहिला टप्पा ठरला. त्यानंतर  हा कायदा लागू होण्यासाठी शासनाने अध्यादेश जारी केला असून राज्यात या कायद्या अंतर्गत काही ठिकाणी गुन्हे सुध्दा दाखल करण्यात आलेले आहेत. या अध्यादेशाचे  रुपांतर कायद्यात करण्यासाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये विविध संघटना, राजकीय पक्ष यांच्याशी विचार विनिमय करण्यात येत आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात या अध्यादेशाचे रुपांतर कायद्यात करण्यास शासन कटिबध्द असल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी  दक्षता अधिकारी नेमण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. हा कायदा पारित केल्यामुळे विकसनशील देशामध्ये एक आदर्श निर्माण होईल. इतर राज्यात आणि देशात या कायद्याची अंमलबजावणी करणे सोपे होईल. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची मानसिकता सुध्दा महत्वाची आहे. समाजात विज्ञानाधिष्टीत दृष्टीकोन निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
          यावेळी बोलताना माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी म्हणाले की, कुठलाही कायदा हा समाज परिवर्तनाचा मार्ग मोकळा करतो. लोकशाहीत परिवर्तन हवे असेल तर आपल्याला कायद्याचे राज्य हवे आहे. नवपरिवर्तन समाज निर्माण करायचा असेल तर शोषणाच्या मार्गाच्या मुळाशी जाऊन विचार करुन शोषणाविरुध्द लढाई केली पाहिजे असे सांगून अंधश्रध्देला महिला मोठ्या प्रमाणात बळी पडतात. विश्वास, श्रध्दा आणि अंधश्रध्दा यातील फरक ओळखला पाहिजे.सामाजिक गुन्हे आणि व्यक्तीगत गुन्हे यामध्ये फरक केला पाहिजे. समाजातील हे प्रश्न सोडविण्यासाठी सामाजिक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

                                                       * * * * *

रविवार, १ डिसेंबर, २०१३

 
मुख्यमंत्री रविवारी पोचले कामकाजासाठी
मंत्रालयात : नव्या मुख्य सचिवांना दिल्या शुभेच्छा
मुंबई, दि. १ : नवी दिल्ली येथे दोनच दिवसांपूर्वी आपल्या कन्येच्या अतिशय साध्या पद्धतीच्या विवाह समारंभात वधुपित्याच्या भुमिकेत असलेले मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण आज रविवारी दुपारी मुंबईत ‘वर्षा’ निवासस्थानी पोचताच पुन्हा कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्याच्या भुमिकेत गेले आणि रविवारचा दिवस सुट्टीत न घालवता त्यांनी थेट मंत्रालय गाठले. कालच पदाचा कार्यभार स्वीकारलेले नूतन मुख्य सचिव ज. स. सहारिया यांना त्यांनी पुष्पगुच्छ देऊन कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आणि काही म‍हत्वाचे शासकीय कामकाजही केले.
मुख्यमंत्री काल दुपारच्या सुमारास नवी दिल्लीहुन मुंबईत पोचले आणि लगेचच ते ‘वर्षा’ निवासस्थानी असलेल्या कार्यालयात दाखल झाले. काही महत्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या करुन त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर त्यांनी ‘मंत्रालयात निघण्याची तयारी करा’ असा आदेश खासगी सचिवांना दिला. सुरक्षा यंत्रणेला आवश्यक सुचना देताच काही मिनिटांतच मुख्यमंत्र्यांचा वाहनताफा मंत्रालयाच्या दिशेने रवानाही झाला.
      मंत्रालयात पोचताच श्री. चव्हाण आपल्या कार्यालयातील दालनात आले. नूतन मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांनी त्यांची भेट घेतली. श्री. चव्हाण यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. नंतर त्यांनी काही महत्वाचे प्रशासकीय कामकाज पार पाडले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव अजित कुमार जैन,  प्रधान सचिव आशिष कुमार सिंह व अन्य अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रासारख्या प्रगत आणि महत्वाच्या राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या श्री. चव्हाण यांनी साधी राहणी, स्वच्छ प्रतिमा, पारदर्शक प्रशासनाचे उदाहरण सर्वांसमोर ठेवतानाच वैयक्तिक जीवनातही कन्येच्या विवाह समारंभाच्या निमित्ताने एक अनुकरणीय पायंडा पाडला. आजची त्यांची मंत्रालयाची भेट हाही त्यांच्या सतत कार्यमग्न राहण्याच्या कार्यपद्धतीचाच भाग होता.
                                     ०००००