शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१३

जगज्जेतेपद कायम राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या
विश्वनाथन आनंदला शुभेच्छा
मुंबई, दि. 9 : आजपासून चेन्नई येथे सुरु झालेल्या जागतिक बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या जगज्जेता विश्वनाथन आनंद याला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. क्रीडारसिकांमध्ये प्रंचड उत्सुकता असलेली ही जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आजपासून सुरु झाली असून जगज्जेता आनंदची लढत जागतिक क्रमवारीत प्रथम असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन याच्याशी होत आहे.
          मुख्यमंत्री आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, या स्पर्धेत आनंद आपला जगज्जेतेपदाचा मुकुट कायम राखील, याची मला खात्री आहे. अवघ्या 22 वर्षांच्या कार्लसनकडुन जोरदार टक्कर मिळणार असली तरी आनंदचा अनुभव या स्पर्धेत निर्णायक ठरेल. या स्पर्धेमुळे 1972 मध्ये झालेल्या फिशर-स्पास्की यांच्यातील लढतीच्या माझ्या आठवणी जागृत झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. या अजिंक्यपद स्पर्धेमुळे भारतामध्ये बुद्धीबळ खेळाला प्रोत्साहन व चालना मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
000000
CM Chavan wishes Vishwanathan Anand
for his success In World Chess Championship

Mumbai, Nov. 9 : Chief Minister Prithviraj Chavan has given best wishes to World Chess Champion Vishwanathan  Anand  for success in the World Chess Championship against the challenger, current World no. 1 Magnus Carlsen of Norway. The first game of this much awaited world championship started today at Chennai.
        
  Mr. Chavan said, I am confident that Anand will retain his crown. Though Anand faces a strong challenge from the 22-year-old Norwegian Carslen, his experience would be a decisive factor in the championship. The excitement of the world championship clash reminds me of the famous Fischer-Spassky clash in 1972. I am sure the match will give boost to chess in India, Mr. Chavan added.

00000

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०१३

बेंबळा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी विशेष पॅकेज देणार -पृथ्वीराज चव्हाण


यवतमाळ दि. 8 : पुनर्वसनाअभावी अपूर्ण राहिलेल्या सिंचन प्रकल्पांना अर्थसहाय्य करण्याचे शासनाचे धोरण असून बेंबळा पाटबंधारे प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याच्यादृष्टीने पुनर्वसनासाठी विशेष पॅकेज देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
थाळेगाव येथील बेंबळा प्रकल्प परिसरात आयोजित चौथ्या सिंचन परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, आ.माणिकराव ठाकरे, आ.वामनराव कासावार, आ.विजय खडसे, आ.संजय राठोड, आ.नंदिनी पारवेकर, आ.विरेद्र जगताप, आ.वसंतराव खोटरे, माजी खासदार हरिभाऊ राठोड, सदाशिवराव ठाकरे, माजी आमदार विजयाताई धोटे, विभागीय आयुक्त डी.आर.बन्सोड, मुख्य कार्यकारी अधिकारी नवलकिशोर राम, अप्पर जिल्हाधिकारी इंद्रसेन तिटकारे, पंचायत समिती सभापती प्रतिभा कडू आदी या प्रसंगी उपस्थित होते.  
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात अपूर्ण सिंचन प्रकल्प, नवीन होणारे प्रकल्प, विजेचा प्रश्न, शेतमालाला मिळणारा भाव, विदर्भातील अनुशेष, समतोल विकास, गावाचा विकास आराखडा, डॉ.विजय केळकर समितीचा अहवाल, मानव विकास निर्देशांक आदींचा उहापोह केला.
विधान सभेचे उपाध्यक्ष आ. वसंत पुरके यांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेली ही सिंचन परिषद खरोखरच कौतुकास्पद असल्याचे सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले,  अपूर्ण राहिलेले सिंचन प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठीच अर्थसहाय्याचे धोरण स्विकारण्यात आले आहे. गोसीखुर्द प्रकल्पाला एकरकमी बाराशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर बेंबळा प्रकल्पाचा पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी एकरकमी पॅकेज देण्यात येईल. बेंबळा प्रकल्पाच्या कालव्याची कामे तसेच विविध प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी मुंबईला विशेष बैठक आयोजित करुन ठोस निर्णय घेतले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विविध कारणांमुळे अनेक प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित राहिलेले आहे. या प्रकल्पांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रश्न आहे. अशा प्रकल्पांचे तीन भाग करुन या प्रकल्पांना गती देण्यात येईल. ज्या प्रकल्पांना मंजुरी मिळालेली आहे, अशा प्रकल्पाची कामे लगेच सुरु करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  
राज्यात मोठ्या प्रमाणात सिंचन प्रकल्प हाती घेण्यात आले. त्या प्रकल्पांना वेळेत निधी उपलब्ध होवू शकला नाही. त्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्याने प्रकल्पांच्या किंमती वाढल्या. त्यामुळे आधी अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे प्रयत्न राहणार आहे. 600 हेक्टर पेक्षा कमी क्षमतेच्या प्रकल्पांना खास बाब म्हणून मंजुरी द्यावी, अशी विंनती राज्यपालांना केली असल्याचे त्यांनी सांगितले. बेंबळा प्रकल्पासह अशा अन्य प्रकल्पातील पाणी प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यत पोहचण्याबरोबरच पुनर्वसनामुळे अडलेली प्रकल्पाची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
विदर्भातील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी डॉ.विजय केळकर समिती नेमण्यात आली होती. या समितीने नुकताच आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालाचा नियोजनाची दिशा ठरवतांना उपयोग होणार आहे. विदर्भात गेल्या दोन वर्षात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वारंवार होणाऱ्या या नुकसानीपासून दिलासा देण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे पूररेषेखालील सर्व नागरिकांचे पुनर्वसन, आवश्यक तेथे पूर संरक्षक भिंतीचे बांधकाम व अपुर्ण राहिलेल्या सिंचन प्रकल्पांना पूर्ण करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. विदर्भाचा अनुशेष घटनात्मक पध्दतीने भरुन काढणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी दहा कोटी रुपये उपलब्ध करुन देण्याचे जाहीर केले. राज्यात विजेचा प्रश्न आहे. परंतु ज्या ठिकाणी वीज बिलाचा भरणा चांगला आहे. तेथे भारनियमन केल्या जाणार नाही. अलिकडे वीज कंपनी अडचणीत आहे. त्यामुळे ग्राहकांनीही विजेचा नियमित भरणा करणे आवश्यक आहे. नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांची स्थिती वाईट आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना त्यांच्या विज देयकाचा भरणा करण्यासाठी हप्ते पाडून दिल्या जाणार आहे. राज्याच्या विज परिस्थितीचा आढावा घेण्यासाठीच आठ मंत्र्यांची एक समितीही नेमन्यात आली आहे. राज्यात हवामानावर आधारीत मजबूत पीक विमा योजना आणणे आवश्यक आहे. त्या दृष्टीनेही प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
यावेळी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांचेही भाषण झाले. पाणी वापराबाबत जनजागृती होणे आवश्यक असल्याचे सांगून कमी पाण्याचा जास्तीत जास्त वापर होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. विधानसभा उपाध्यक्ष प्रा.वसंत पुरके यांनी प्रास्ताविक भाषणात जलसंपत्तीचा पहिला मालक शेतकरी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना प्राधान्याने पाणी मिळाले पाहिजे, असे सांगितले. पारंपारिक पिकांसोबतच शेतकऱ्यांनी ऊस, डाळींब, फळे, पालेभाज्या आदी पिकांकडे वळले पाहिजे. शेतकऱ्यांनी प्रकल्पांतील पाण्याचा शेत उत्पादन वाढविण्यासाठी उपयोग करावा, असे सांगून शेतकऱ्यांच्या समस्यांवर चिंतन करण्यासाठी सिंचन परिषदेचे आयोजन असल्याचे ते म्हणाले. आ.माणिकराव ठाकरे यांनी राज्यात सिंचन व्यवस्था मजबूत करण्यासोबतच अनुशेष भरुन काढण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.

बेंबळा प्रकल्पाच्या परिसरात आयोजित या सिंचन परिषदेनिमित्त कृषि प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले होते. गेल्या 35 वर्षांपासून सतत जनजागृतीपर कार्यक्रमांचे सादरीकरण करणारे किर्तनकार सत्यपाल महाराज तसेच काही प्रगतीशील शेतकऱ्यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. उद्घाटनानंतर विविध विषयांवर तज्ञ मान्यवरांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शनिवार, २ नोव्हेंबर, २०१३

 मुख्यमंत्र्यांच्या  शुभेच्छा
वंचितांच्या आयुष्यात प्रकाशाची पहाट
उगविण्याचा निर्धार करुया : मुख्यमंत्री
 मुंबई, दि. 2: दिवाळी हा सण प्रकाशाचे महत्व सांगणारा आहे. यासाठी ज्यांच्या आयुष्यात अद्याप अंधार आहे, अशा वंचितांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा आपण सर्वांनी करुया, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षा, समृद्धी आणि राज्याच्या समतोल विकासासाठी आपण कटीबद्ध राहणार असल्याची ग्वाहीही श्री. चव्हाण यांनी राज्यातील जनतेला दिवाळीचा संदेश देताना दिली आहे.
          दिवाळीच्या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री  म्हणतात की, दिपावलीचा सण हा आनंद आणि चैतन्य घेऊन येतो, नव्या कामांची सुरुवात करुन आपल्या आयुष्याला तसेच समाजाला देखील एक चांगले वळण देण्यासाठी हा सण आपल्याला प्रेरित करतो. आज आपले राज्य सर्व आव्हानांना ताकदीने सामोरे जात आहे. आपल्यासमोरील लक्ष्य आहे ते राज्याला अधिक  वैभवशाली बनविण्याचे. या सगळ्या वाटचालीत समाजातील दुर्बल आणि मागासलेल्या घटकांच्या आयुष्यातील अंधार दूर करुन त्यांचे आयुष्य प्रकाशमान करायचे आहे. दिवाळी हा सण सुख आणि आनंद वाटण्याचा आहे. यात जाती धर्माला स्थान नाही. बंधुभावाचा  आणि सौहार्दाचा संदेश मनाशी बाळगून आपण पुढील  वाटचाल केल्यास खऱ्या अर्थाने विकास साधू अशी मला खात्री वाटते.
          राज्याने उद्योगात चांगली आघाडी घेतली असून भविष्यात देखील ती टिकून राहील. अनेक रोजगार यातून निर्माण होतील. शेतीला भरभराटीचे दिवस आणण्यासाठी आम्ही उचललेल्या पावलांमुळे बळीराजाचे भविष्य देखील उज्वल होणार आहे. प्रकाशाचे प्रतिक असणाऱ्या ऊर्जेच्या उत्पादनातील अडथळे दूर सारुन लवकरच आपले राज्य पूर्णपणे प्रकाशमान होण्याकडे आपली वाटचाल सुरु आहे. अमंगलाचा मुकाबला करीत मंगलमय पर्वाची सुरुवात करणारी ही दिवाळी सर्वांना आनंदाची जावो, असेही मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात.
------०------