बुधवार, ३ एप्रिल, २०१३

मुख्यमंत्री सहाय्यता दुष्काळ निधीत
आतापर्यंत 55 कोटी रुपये जमा - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 3 एप्रिल : मुख्यमंत्री सहाय्यता निधी (दुष्काळ) या निधीत आतापर्यंत 55 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. 
चालू वर्षी राज्यातील काही भागात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे.  या दुष्काळाला तोंड देण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.  शासनाच्या या प्रयत्नाबरोबरच विविध संस्था, स्वयंसेवी संघटना आणि दानशूर व्यक्तीकडूनही मुख्यमंत्री सहाय्यता निधीलाही उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या निधीत सिध्दीविनायक ट्रस्टतर्फे 25 कोटी रुपये, महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग महामंडळाकडून एक कोटी रुपये, स्टेट बँक ऑफ इंडियाकडून दोन कोटी रुपये, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून एक कोटी रुपये, बँक ऑफ महाराष्ट्रकडून 2 कोटी 51 लाख रुपये, अभ्युदय को-ऑपरेटीव्ह बँकेकडून एक कोटी रुपये, दत्त सहकारी साखर कारखाना, शिरोळ (जि.कोल्हापूर) यांच्याकडून एक कोटी 20 लाख रुपये, किसनवीर सहकारी साखर कारखान्याकडून (जि.सातारा) 51 लाख रुपये तसेच इतर संस्था व दानशूर व्यक्तींकडून धनादेश प्राप्त झाल्याची माहिती मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिली.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी (दुष्काळ) या निधीस मदत करु इच्छिणाऱ्यांना अडचण येऊ नये म्हणून देणगीदारांना थेट बँकेमध्ये किंवा संबंधीत जिल्हाधिकारी कार्यालयात धनादेश जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
बँकेत थेट भरणा
देणगीदार थेट स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत स्वत: आपला धनादेश किंवा ड्राफ्ट जमा करु शकतात.  हे धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी (दुष्काळ 2013) / Chief Minister Relief Fund (Drought 2013) स्टेट बँक ऑफ इंडिया, फोर्ट शाखा खाते क्र. S.B.32860305777 या खात्यात जमा करावेत. ही रक्कम जमा केल्यानंतर देणगीदारांनी पत्राद्वारे लेखाधिकारी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई-32 यांना बँकेच्या पावतीच्या प्रतिसह कळवावे, ज्यायोगे त्यांना पावती पाठविणे सोपे जाईल.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी मुख्यमंत्री निधी कक्ष यांच्याशी 022-22026948 अथवा    022-22022940 या दूरध्वनी क्रमांकावर सुट्टीचे दिवस सोडून कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे मदत व पुनर्वसन विभागाने कळविले आहे. तसेच ही सर्व माहिती विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयातील सूचना फलकावर लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
0000000

सोमवार, १ एप्रिल, २०१३

 गाव अभिलेख्यांच्या
डिजिटायझेशनसाठी संग्रामसॉफ्ट उपयुक्त - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 1 : ग्रामपंचायतींचा दैनंदिन कारभार  पारदर्शक होण्यासाठी आणि गाव पातळीवरील अभिलेख्यांचे डिजिटायझेशन करण्यासाठी "संग्राम सॉफ्ट" ही संगणकीय प्रणाली अतिशय उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
            आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संग्राम सॉफ्ट या संगणकीय प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील, मुख्यसचिव जयंत कुमार बांठिया, ग्रामविकास विभागाचे प्रधानसचिव एस.एस. संधु यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
            ई-पंचायत कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील सर्व पंचायतराज संस्थांच्या कारभारात एकसुत्रता आणि पारदर्शकता आणली जात आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून गावपातळीवरील माहितीचे उत्तम आणि अचूक संकलन होईल. याचा विविध शासकीय विभागांना उपयोग होणार असून या माहितीच्या आधारे योजनांचे परिपूर्ण नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी या दोन्ही गोष्टी शक्य होणार आहेत.
            ग्रामविकास विभागाने संग्राम सॉ्फट या संगणकीय प्रणालीच्या वापरातून गावात नवी क्रांती घडवून आणणारा उपक्रम सुरु केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ग्रामविकास मंत्री श्री. पाटील यांचे अभिनंदन केले तसेच राज्याच्या ई -गर्व्हनन्सच्या वाटचालीत हा अतिशय महत्वाकांक्षी टप्पा असल्याचेही स्पष्ट केले.
            यावेळी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनी संग्राम सॉफ्टच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या सुविधांची सविस्तर माहिती घेतली.
            अशा प्रकारचा उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याची माहिती देऊन  ग्रामविकास मंत्री जयंत पाटील म्हणाले की, संग्रामच्या अंमलबजावणीमुळे गावांची डिजिटायझेशनकडे वाटचाल सुरु झाली आहे. या संगणकीय प्रणालीमुळे  ग्रामपंचायतींचे कामकाज ऑनलाईन होतांना ते गतिमान आणि पारदर्शक झाले आहे. ग्रामपंचायतींकडून देण्यात येणारे विविध प्रकारचे अभिलेख (नमुना क्र. 1 ते 27 ), दाखले, प्रमाणपत्र हे या संणकीय प्रणालीमुळे डिजिटाईजड् स्वरूपात देता येतील. तसेच ग्रामसभेच्या नोटीसा, इतिवृत्ते, मासिक अहवाल, विविध स्तरावरून अपेक्षित असलेले इतर दस्तऐवज यांचाही या संगणकीय प्रणालीत समावेश करण्यात आल्याने प्रशासनाचा तसेच गावकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचतील. 1 एप्रिल 2013 पासून सर्व ग्रामपंचायतींना याचा वापर अनिवार्य करण्यात आला असून या माध्यमातून सुक्ष्म नियोजनासाठी आवश्यक असलेली माहिती उपलब्ध होईल आणि ती सतत अद्ययावत होत राहील.
            राज्यातील सर्व पंचायतराज संस्थांच्या कारभारात एकसुत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी ई -पंचायत कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जात असून या प्रकल्पांतर्गत पंचायतराज संस्थांच्या कारभाराशी निगडित  अशा 11 संगणकीय प्रणाल्या भारत सरकारच्या पंचायतराज मंत्रालयामार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ई-पंचायत कार्यक्रमात महाराष्ट्र हे देशात पाहिले राज्य ठरले असून गतवर्षी राज्याला यासाठी प्रथम क्रमांकांचा पुरस्कार मिळाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील यांनी तर प्रास्ताविक  विभागाचे सचिव एस.एस. संधु यांनी केले.
000