मंगळवार, २५ डिसेंबर, २०१२



शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणार
     -- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

कोल्हापूर दि. 25 : शाहू महाराजांच्या विचाराचा आणि कार्याचा प्रसार त्यांच्या स्मारकातून व्हावा, यासाठी शाहू मिलच्या जागेवर त्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
कोल्हापूर येथील शाहू मिलच्या जागा पाहणी प्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी  कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, कामगार मंत्री हसन मुश्रीफ, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, महापौर जयश्री सोनवणे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मंडलिक उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची महती तसेच त्यांच्या सामाजिक सुधारणेच्या कार्याची जगाला माहिती व्हावी, म्हणून शाहू मिलच्या 27 एकर जागेत त्यांचे भव्य-दिव्य असे स्मारक उभारण्यात येणार आहे. शाहू महाराजांनी घातलेल्या सामाजिक सुधारणेचा पाया या स्मारकातून भावी पिढीला प्रेरणा देईल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. स्मारक उभारणीबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून या समितीमध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांचा समावेश करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, या युगपुरुषाने सामाजिक समतेसाठी केलेले कार्य भावी पिढीला मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरण्यासाठी शाहू मिलच्या ऐतिहासिक जागेवर त्यांचे स्मारक उभारण्याची कल्पना पुढे आली. या कल्पनेला राज्य शासनाने मूर्त रुप देऊन स्मारक उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. शंभर वर्षापुर्वी स्थानिक लोकांना रोजगार निर्माण व्हावा, यासाठी या मिलची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे या जागेवर स्मारक उभारण्यापूर्वी सध्या असलेल्या मिलचे, जागेचे, वास्तुचे चित्रीकरण, व्हिडिओ रेकॉर्डिंग करुन ठेवण्यात येणार असून याबाबतचे एक पुस्तकही तयार करुन या वास्तुचा ऐतिहासिक वारसा जतन केला जाईल. आंतरराष्ट्रीय वास्तुविषारदांंच्या मार्गदर्शनानुसार या मिलमधील कांही वास्तू जतन करण्यासारख्या असल्यास त्याबाबतही योग्यतो निर्णय घेण्यात येणार आहे. ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी स्मारक होत असल्याने या ठिकाणच्या जागेचा कोणत्याही प्रकारे व्यापारीकरणासाठी वापर होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
शाहू महाराजांनी त्याकाळी सुरु केलेले सामाजिक आरक्षण, सक्तीचे शिक्षण, सामाजिक समता यासारख्या त्यांच्या विचारांची-कार्याची ओळख साऱ्या देशाला, जगाला व्हावी, यासाठी जागतिक दर्जाच्या समाजशास्त्रज्ञांचा परिसंवाद आयोजित करण्यात येणार असल्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शाहू मिलची जागा शाहू स्मारकासाठी उपलब्ध करुन दिल्याबद्दल पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्रीमहोदय व राज्य शासनाचे आभार मानले. ते म्हणाले, राज्य शासनाने शाहू महाराजांच्या स्मारक उभारणीबाबत गठीत केलेल्या समितीचा शासन निर्णय होऊन लवकरच समितीची बैठक घेण्यात येणार आहे. शाहू स्मारक उभारण्याबाबत लवकरच शाहूप्रेमींचा मेळावा घेण्यात येणार असून स्मारकासाठी शाहूप्रेमींच्या सूचनांचा स्मारक आराखड्यात समावेश करण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांचीही स्मारके लवकरात लवकर व्हावीत, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
राज्य शासनाने शाहू मिलची जागा ऐतिहासिक स्मारकासाठी उपलब्ध करुन दिल्याबद्दल कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्रीमहोदय व राज्य शासनाचे आभार मानले. छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांचीही स्मारके लवकरात लवकर व्हावीत, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष कलाप्पाण्णा आवाडे, आमदार के. पी. पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, जिल्हाधिकारी राजाराम माने, महापालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण, पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव, अप्पर जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज, निवासी उपजिल्हाधिकारी, संजय पवार, मान्यवर नागरिक, शाहूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000


सोमवार, २४ डिसेंबर, २०१२



प्रेम आणि शांततामय सहजीवनाचा संदेश देणारा
नाताळचा सण उत्साहाने साजरा करा : मुख्यमंत्री

मुंबई, दि. 24 : जगभरात साजरा होणारा नाताळचा सण हा प्रेम आणि शांततामय सहजीवनाचा संदेश देणारा आहे. आजच्या परिस्थितीत या सणाचे महत्व खुप मोठे आहे. त्यामुळे हा सण सर्वांनी उत्साहाने साजरा करावा आणि प्रेम व शांततेचा संदेश जगभर पोचवावा, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ख्रिस्ती बांधवांना दिल्या आहेत.
श्री. चव्हाण आपल्या संदेशात म्हणतात की, प्रभु येशु ख्रिस्ताचा जन्मदिवस जगभरातील ख्रिस्ती बांधव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. प्रभु येशु हा जगाचे तारण करण्यासाठी आला असुन तो सर्वांचा उद्धारकर्ता आहे, अशी ख्रिस्ती बांधवांची श्रद्धा आहे. हा सण सर्व मानवजातीला जवळ आणणारा आहे. आजच्या अतिशय धावपळीच्या, स्पर्धेच्या आणि एकमेकांवर वर्चस्व गाजविण्याच्या काळात प्रभु येशु ख्रिस्ताचा संदेश सर्वांसाठीच उपयोगी ठरणारा आहे.
00000000
       



                महाराष्‍ट्रातील जिल्‍हा प्रशासन कामकाज पेपरलेस करणार   
                      सिंधुदुर्गातील पर्यटन एमआयडीसी उभारणार  
                                                       : मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण,
 सिंधुदुर्गनगरी दि.24:  देशातील पहिला साक्षर, लोकसंख्‍या  स्थिर असलेला व पर्यटन म्‍हणून ओळखला जाणारा सिंधुदुर्ग जिल्‍हा आज देशातील पहिला ई ऑफीस प्रणाली जिल्‍हा म्‍हणून घोषित झाला आहे.यापुढे  पहिल्‍या टप्प्‍यात  महाराष्‍ट्रातील प्रत्‍येक जिल्‍हाधिकारी व दुस-या टप्प्‍यात  जिल्‍हा परिषदा यांचे संपुर्ण कामकाज पेपरलेस करण्‍यात येईल अशी घोषणा मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण यांनी सिंधुदुर्गनगरी येथे केली. जिल्‍हयातील पर्यटनाला चालना देण्‍यासाठी पालकमंत्री ना.नारायण राणे यांच्‍या संकल्‍पनेतील पर्यटन एमआडीसीचे मुख्‍यमंत्र्यांनी स्‍वागत करून त्‍याचीही मुहूर्तमेढ करण्‍यात येईल हे स्‍पष्‍ट केले.
     येथील  जिल्‍हाधिकारी कार्यालयात ई ऑफीस प्रणाली उदघाटन प्रसंगी मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण बोलत होते. यावेळी उदयोग,बंदरे, रोजगार व स्‍वयंरोजगार मंत्री तथा पालकमंत्री ना.नारायण राणे, महसूल व खार जमीन मंत्री ना. बाळासाहेब थोरात, खासदार डॉ. निलेश राणे, जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा सौ.निकिता परब, आमदार सुभाष चव्‍हाण, मुख्‍य सचिव जयंतकुमार बांठिया, महसूल अप्‍पर सचिव स्‍वाधीन क्षत्रीय, माहिती तंत्रज्ञान सचिव व मिशन डायरेक्‍टर ई ऑफीस प्रणाली राजेश अगरवाल, महाराष्‍ट्र ईऑफीस प्रणालीचे नोडल ऑफीसर डॉ.संतोष भोगले, राज्‍य विज्ञान व सुचना अधिकारी माईज हुसेन अली, मुंबई जिल्‍हाधिकारी चंद्रशेखर ओक, रत्‍नागिरी जिल्‍हाधिकारी राजेश जाधव, ठाणे जिल्‍हाधिकारी पी.वेलारासू, मुंबईउपनगर जिल्‍हाधिकारी संजय देशमुख्‍, जिल्‍हाधिकारी विरेंद्र सिंह,मुख्‍य कार्यकारी अधिकारी जिल्‍हा परिषद सिंधुदुर्ग ई.रविंद्रन उपस्थित होते.
   मुख्‍यमंत्री म्‍हणाले,पर्यटनाने समृध्‍द असा हा जिल्‍हा आता माहिती तंत्रज्ञानात देखील आघाडीवर राहणार असून आजपासून हा जिल्‍हा महाराष्‍ट्रातील पहिला ई –ऑफीस प्रणाली राबविणारा जिल्‍हा म्‍हणून ओळखला जाणार आहे.माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग प्रशासनात करून या जिल्‍हयाने खूप महत्‍वाचे पाऊल टाकले आहे. सिंधुदुर्ग जिल्‍हयात पर्यटनाला पूरक असे उदयोग उभारण्‍यासाठी शासन प्रयत्‍नशील आहे.जिल्‍हयात ज्ञानावरआधारित उदयोग उभारले तर पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याची काळजी घेवून आयटी पार्क, जलक्रीडा उदयोग उभारण्‍यासाठी शासन प्रयत्‍नशील आहे.
                             पर्यटन एमआयडीसी
           सिंधुदुर्ग पर्यटनाने समृध्‍द असा जिल्‍हा आहे या जिल्‍हयात पर्यावरणाला कोणतीही हानी न पाहोचवता  ज्ञानावर आधारित उदयोगांची उभारणी केली जाईल पालकमंत्री ना.नारायण राणे यांच्‍या संकल्‍पनेतील पर्यटन एमआयडीसीचे मी स्‍वागत करतो असे मत मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण  यांनी व्‍यक्‍त केले. .
मुख्‍यमंत्री म्‍हणाले, सिंधुदुर्ग जिल्‍हयातील पर्यटनाला गती देण्‍यासाठी पर्यटन एमआयडीसी उभारण्‍याचा उदयोगमंत्री ना.नारायण राणे यांचा विचार आहे. ही अतिशय चांगली अशी संकल्‍पना आहे.पर्यटन हा जगात सर्वात वेगाने वाढणारा उदयोग आहे.असे समजले जाते.देशातील एकमेव असलेल्‍या सिंधुदुर्ग या पर्यटन जिल्‍हयात ही पर्यटन एमआयडीसी उभारणीसाठी प्रयत्‍न केले जातील.माधव गाडगीळ समितीच्‍या अहवालातील जाचक अटीमुळे कोकणातील विकासाला अडसर निर्माण झाला आहे. त्‍यामुळे या अहवालातील काही बाबी शिथिल करण्‍यासाठी केंद्राकडे याबाबतचा अहवाल पाठविला आहे असेही मुख्‍यमंत्री यांनी स्‍पष्‍ट केले.
                 ई ऑफीस प्रणाली इतर जिल्‍हयांसाठी मार्गदर्शक ठरेल
 ई ऑफीस प्रणालीच्‍या माध्‍यमातून सामान्‍य जनतेस शासनाच्‍या सर्व सेवा माफक दरात, प्रभावी, पारदर्शक रित्‍या व जलदरितीने देणे शक्‍य होणार आहे असे मत महसूल व खार जमीन मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी व्‍यक्‍त केले. पर्यटनाने समृध्‍द अशा जिल्‍हयात असा महत्‍वकांक्षी प्रकल्‍प सुरू झाल्‍यामुळे राज्‍यात इतर जिल्‍हयांना तो निश्‍चीतच मार्गदर्शक ठरणार आहे.कामामध्‍ये सहजता, पारदर्शकता, बिनचुकपणा वाढण्‍यास यामुळे मदत होणार असल्‍याचे मतही महसूल मंत्र्यांनी  व्‍यक्‍त केले.
                  ई ऑफीसमुळे लोकाभिमुख्‍ प्रशासन होण्‍यास मदत होणार
   सिंधुदुर्ग जिल्‍हाधिकारी कार्यालयाने ई ऑफीस प्रणालीच्‍या माध्‍यमातून राज्‍याला एक मार्गदर्शक पथ निर्माण केला आहे.यामुळे लोकाभिमुख प्रशासन निर्माण होण्‍यास मदत होणार आहे. या यशाचे सातत्‍य टिकविणे ही  प्रशासनाची जबाबदारी आहे असे मत उदयोग,बंदरे, रोजगार व स्‍वयंरोजगार मंत्री तथा पालकमंत्री ना.नारायण राणे यांनी व्‍यक्‍त केले.ई ऑफीसच्‍या माध्‍यमातून सिंधुदुर्ग जिल्‍हा महसूल प्रशासनाने उल्‍लेखनीय काम केलेले आहे या यशाचे सातत्‍य टिक‍वा, जनतेचे समाधान करा असे आवाहन त्‍यांनी यावेळी केले.
           व्हिडीओ कॉन्‍फरन्‍सींगच्‍या माध्‍यमातून सर्व सचिव, जिल्‍हाधिकारी, जिल्‍हा परिषदांचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांनी हा कार्यक्रम सोहळा पाहिला.यावेळी सिंधुदुर्ग जिल्‍हाधिकारी कार्यालयातर्फे कॉफी टेबल बुक व पर्यटन पुस्‍तीकेचे प्रकाशन मुख्‍यमंत्री यांच्‍या हस्‍ते  करण्‍यात आले.
        जिल्‍हाधिकारी विरेंद्र सिंह यांनी कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक केले यामध्‍ये ई ऑफीस प्रणाली राबविताना जिल्‍हाधिकारी कार्यालयाने केलेल्‍या कामांचे सादरीकरण त्‍यांनी यावेळी केले. महसूल अधिकारी  कर्मचा-यांचा यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. सुत्रसंचालन उपजिल्‍हाधिकारी अरविंद वळंजू व प्रफुल्‍ल वालावलकर यांनी केले. आभार जिल्‍हाधिकारी विरेंद्रसिंह यांनी मानले.
                                           *********