महाराष्ट्रातील जिल्हा प्रशासन कामकाज
पेपरलेस करणार
सिंधुदुर्गातील पर्यटन एमआयडीसी
उभारणार
: मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण,
सिंधुदुर्गनगरी
दि.24: देशातील
पहिला साक्षर, लोकसंख्या स्थिर असलेला
व पर्यटन म्हणून ओळखला जाणारा सिंधुदुर्ग जिल्हा आज देशातील पहिला ई ऑफीस
प्रणाली जिल्हा म्हणून घोषित झाला आहे.यापुढे
पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील
प्रत्येक जिल्हाधिकारी व दुस-या टप्प्यात
जिल्हा परिषदा यांचे संपुर्ण कामकाज पेपरलेस करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांनी सिंधुदुर्गनगरी येथे केली. जिल्हयातील पर्यटनाला चालना
देण्यासाठी पालकमंत्री ना.नारायण राणे यांच्या संकल्पनेतील पर्यटन एमआडीसीचे
मुख्यमंत्र्यांनी स्वागत करून त्याचीही मुहूर्तमेढ करण्यात येईल हे स्पष्ट
केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ई ऑफीस प्रणाली उदघाटन
प्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी उदयोग,बंदरे, रोजगार व स्वयंरोजगार मंत्री तथा पालकमंत्री
ना.नारायण राणे, महसूल व खार जमीन मंत्री ना. बाळासाहेब
थोरात, खासदार डॉ. निलेश राणे, जिल्हा
परिषद अध्यक्षा सौ.निकिता परब, आमदार सुभाष चव्हाण, मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया, महसूल अप्पर सचिव
स्वाधीन क्षत्रीय, माहिती तंत्रज्ञान सचिव व मिशन डायरेक्टर
ई ऑफीस प्रणाली राजेश अगरवाल, महाराष्ट्र ईऑफीस प्रणालीचे
नोडल ऑफीसर डॉ.संतोष भोगले, राज्य विज्ञान व सुचना अधिकारी माईज
हुसेन अली, मुंबई जिल्हाधिकारी चंद्रशेखर ओक, रत्नागिरी जिल्हाधिकारी राजेश जाधव, ठाणे जिल्हाधिकारी
पी.वेलारासू, मुंबईउपनगर जिल्हाधिकारी संजय देशमुख्, जिल्हाधिकारी विरेंद्र सिंह,मुख्य कार्यकारी
अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग ई.रविंद्रन उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले,पर्यटनाने समृध्द असा हा जिल्हा आता माहिती तंत्रज्ञानात देखील आघाडीवर
राहणार असून आजपासून हा जिल्हा महाराष्ट्रातील पहिला ई –ऑफीस प्रणाली राबविणारा जिल्हा
म्हणून ओळखला जाणार आहे.माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग प्रशासनात करून या जिल्हयाने
खूप महत्वाचे पाऊल टाकले आहे. सिंधुदुर्ग जिल्हयात पर्यटनाला पूरक असे उदयोग
उभारण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.जिल्हयात ज्ञानावरआधारित उदयोग उभारले तर
पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याची काळजी घेवून आयटी पार्क, जलक्रीडा उदयोग उभारण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
पर्यटन एमआयडीसी
सिंधुदुर्ग
पर्यटनाने समृध्द असा जिल्हा आहे या जिल्हयात पर्यावरणाला कोणतीही हानी न
पाहोचवता ज्ञानावर आधारित उदयोगांची
उभारणी केली जाईल पालकमंत्री ना.नारायण राणे यांच्या संकल्पनेतील पर्यटन
एमआयडीसीचे मी स्वागत करतो असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. .
मुख्यमंत्री
म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हयातील पर्यटनाला गती देण्यासाठी
पर्यटन एमआयडीसी उभारण्याचा उदयोगमंत्री ना.नारायण राणे यांचा विचार आहे. ही
अतिशय चांगली अशी संकल्पना आहे.पर्यटन हा जगात सर्वात वेगाने वाढणारा उदयोग आहे.असे
समजले जाते.देशातील एकमेव असलेल्या सिंधुदुर्ग या पर्यटन जिल्हयात ही पर्यटन
एमआयडीसी उभारणीसाठी प्रयत्न केले जातील.माधव गाडगीळ समितीच्या अहवालातील जाचक
अटीमुळे कोकणातील विकासाला अडसर निर्माण झाला आहे. त्यामुळे या अहवालातील काही
बाबी शिथिल करण्यासाठी केंद्राकडे याबाबतचा अहवाल पाठविला आहे असेही मुख्यमंत्री
यांनी स्पष्ट केले.
ई ऑफीस प्रणाली इतर जिल्हयांसाठी मार्गदर्शक ठरेल
ई ऑफीस प्रणालीच्या
माध्यमातून सामान्य जनतेस शासनाच्या सर्व सेवा माफक दरात, प्रभावी,
पारदर्शक रित्या व जलदरितीने देणे शक्य होणार आहे असे मत महसूल
व खार जमीन मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. पर्यटनाने समृध्द
अशा जिल्हयात असा महत्वकांक्षी प्रकल्प सुरू झाल्यामुळे राज्यात इतर जिल्हयांना
तो निश्चीतच मार्गदर्शक ठरणार आहे.कामामध्ये सहजता, पारदर्शकता, बिनचुकपणा वाढण्यास यामुळे मदत होणार
असल्याचे मतही महसूल मंत्र्यांनी व्यक्त
केले.
ई ऑफीसमुळे लोकाभिमुख् प्रशासन होण्यास मदत
होणार
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाने ई ऑफीस
प्रणालीच्या माध्यमातून राज्याला एक मार्गदर्शक पथ निर्माण केला आहे.यामुळे लोकाभिमुख
प्रशासन निर्माण होण्यास मदत होणार आहे. या यशाचे सातत्य टिकविणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे असे मत उदयोग,बंदरे, रोजगार व स्वयंरोजगार मंत्री तथा पालकमंत्री
ना.नारायण राणे यांनी व्यक्त केले.ई ऑफीसच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा
महसूल प्रशासनाने उल्लेखनीय काम केलेले आहे या यशाचे सातत्य टिकवा, जनतेचे समाधान करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून सर्व
सचिव, जिल्हाधिकारी, जिल्हा
परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हा कार्यक्रम सोहळा पाहिला.यावेळी
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कॉफी टेबल बुक व पर्यटन पुस्तीकेचे
प्रकाशन मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात
आले.
जिल्हाधिकारी विरेंद्र सिंह यांनी
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले यामध्ये ई ऑफीस प्रणाली राबविताना जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या कामांचे सादरीकरण त्यांनी यावेळी केले. महसूल
अधिकारी कर्मचा-यांचा यांचा मान्यवरांच्या
हस्ते सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन उपजिल्हाधिकारी
अरविंद वळंजू व प्रफुल्ल वालावलकर यांनी केले. आभार जिल्हाधिकारी विरेंद्रसिंह
यांनी मानले.
*********
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा