शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०१४

मुंबईतील वाहतुकीचे पायाभूत सुविधा प्रकल्प कालबद्ध
रितीने पूर्ण करुन नागरिकांना दिलासा द्या : मुख्यमंत्री
मुंबई, दि. ७ : मुंबईतील जटिल वाहतूक समस्येवर उपाय असलेले सर्व पायाभूत सुविधांचे प्रकल्प नियोजनबद्ध रितीने कालबद्ध कार्यक्रम आखून पूर्ण करावेत व नागरिकांना दिलासा द्यावा, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अधिकाऱ्यांना दिले. मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधा प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
राज्यातील प्रलंबित पायाभूत प्रकल्पांबाबत मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रालयात त्यांच्या दालनात आढावा बैठक घेतली. यावेळी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त यु.पी.एस.मदान, सिडकोचे संजय भाटिया, परिवहन विभागाचे प्रधान सचिव शैलेशकुमार शर्मा आदी उपस्थित होते.
यावेळी नरिमन पॉईंट ते मालाड-कांदिवली या कोस्टल रोडविषयी सादरीकरण करण्यात आले. हा कोस्टल रोड पूर्ण झाल्यास नागरिकांना खूपच फायदा होणार आहे. तसेच या प्रकल्पाचा खर्चही कमी असून किनाऱ्याची सुरक्षितताही  जोपासली जाणार आहे. या प्रकल्पासाठी सीआरझेड नोटीफीकेशन 2011 च्या कलम  3(iv) मध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
एमएमआरडीएमार्फत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मेट्रो लाईन-2 व मेट्रोलाईन 3- या प्रकल्पांची सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. यावेळी एमएमआरडीचे श्री.मदान म्हणाले, एमएमआरडीए क्षेत्रामध्ये लोकसंख्येबरोबरच वाहतूकीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शिवडी ते चिरले हा ट्रान्स हार्बर लिंक अत्यंत उपयुक्त ठरेल.
चारकोप-वांद्रे-मानखुर्द ही इलेव्हेटेड मेट्रो प्रकल्प आता चारकोपच्या पुढे दहिसर पर्यंत विस्तारित केल्याचे यावेळी सांगण्यात आले. जवळपास 16 लाख प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.
मेट्रो ३ हा कुलाबा ते वांद्रे असा हा पूर्णत: भुयारी मार्ग असलेला प्रकल्प असणार आहे. 32.5 कि.मी. लांबीच्या या प्रकल्पामध्ये 27 स्टेशन्स असणार आहेत. तसेच जवळपास 14 लाख नागरिकांना याद्वारे प्रवाशाचा लाभ घेता येणार आहे. नरिमन पॉईंट, कफ परेड, काळबादेवी तसेच विमानतळे अशी ठिकाणीही या प्रकल्पाची स्टेशने असून वाहतूक खेाळंबा, प्रदूषण रोखणे, वेळ वाचविणे यादृष्टीने फायदेशीर ठरणार आहे.
एम.एस.आर.डी.सी. द्वारे मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावरील जलवाहतूक प्रकल्प (प्रवासी व रो.रो.सेवा) फेरी व्हार्फ (भाऊचा धक्का) ते नेरुळ व मांडवा याबरोबरच पश्चिम किनाऱ्यावरील प्रवासी जलवाहतूक प्रकल्प (नरिमन पॉईंट-वांद्रे-जुहू-मार्वे- वर्सोवा-बोरीवली) या दोन्ही प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी माहिती देनाना परिवहन विभागाचे प्र.सचिव शैलेशकुमार शर्मा यांनी मुंबईच्या सर्व किनाऱ्यावरील जलवाहतूक प्रकल्प हा रु. 568 कोटींचा असून लोकांसाठी लाभदायक ठरणार असल्याचे सांगितले.       
सिडकोचे संजय भाटिया यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या सद्य:स्थितीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. या प्रकल्पासाठी 75% जमीन संपादित झाली असून उर्वरित जमीनीसाठी कार्यवाही सुरु असल्याचे श्री. भाटिया यांनी सांगितले.
राज्यात जे प्रलंबित पायाभूत प्रकल्प आहेत ते तातडीने कार्यान्वित व्हावेत, करुन शासनाकडे सादर करावेत. हे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कोणत्याही प्रकारचा विलंब केला जाणार नाही. संबंधित यंत्रणेनेही याबाबत योग्य ती तत्परता दाखवावी अशी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

·        पश्चिम किनारी मार्ग : नरिमन पॉईंट ते मालाड-कांदिवली लिंक रोड, अंदाजित खर्च रु. १२ हजार कोटी, ३४.५५ किमी. लांबी. ( बोगदे – १०.४० किमी, पूल – १.९३ किमी, स्टिल्टवरील रस्ते – २.४५ किमी, भरावावरील रस्ते – ९.४८ किमी, उन्नत मार्ग – १.२७ किमी, कांदळवनावरुन जाणारा मार्ग – ९ किमी). महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र नियमन प्राधिकरणाने मान्यता दिली व प्रस्ताव केंद्रीय वन व पर्यावरण विभागाकडे पाठविला आहे.
·        मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल): शिवडी ते चिर्ले (रायगड), अंतर २२ किमीचचा सागरी सेतू, अंदाजित खर्च ११,३७० कोटी रु., टोल रोड, सीआरझेडसह सर्व मान्यता प्राप्त. जपानच्या ‘जायका’ कडुन कर्जाची उभारणी करणार. प्रकल्प उभारणीचा कालावधी पाच वर्षे.
·         मेट्रो टप्पा २ (सुधारित) : मानखुर्द ते चारकोप हा टप्पा दहिसरपर्यात वाढवला., अंतर ३२ किमी, ३६ स्थानके, ओवळे व घाटकोपर येथे कारडेपो, सविस्तर प्रकल्प अहवाल तयार, अंदाजित खर्च १९,११९  कोटी रु. मेट्रो १, मोनो आणि उपनगरी वाहतुकीशी समन्वय.
·        मेट्रो टप्पा ३ : कुलाबा-बांद्रे-सीप्झ, अंतर ३२ किमी, पूर्णत: भूमिगत, २७ स्थानके. अंदाजित खर्च २३,१३६ कोटी.
·        पश्चिम किनारी जलवाहतूक प्रकल्प :  नरिमन पॉईंट ते बोरिवली,  ४५ किमी., बांद्रे, जुहू,  वर्सोवा, मार्वे येथे थांबे. धक्का व अन्य पायाभूत सुविधांची उभारणी, बोटसेवा खासगी,  अंदाजित खर्च १५५७ कोटी रु.,  निविदापूर्व कामे पुर्ण, आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त, कॅटामरान व हूवरक्राफ्टद्वारे प्रवासी वाहतूक.
·        पूर्व किनारी जलवाहतूक प्रकल्प :  भाऊचा धक्का ते मांडवा आणि भाऊचा धक्का ते  नेरुळ,  आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त,  धक्का व अन्य पायाभूत सुविधांची उभारणी, बोटसेवा खासगी,  अंदाजित खर्च ५६८ कोटी रु., टप्प्याटप्प्याने उभारणी.
·        नवी मुंबई ओतराराष्ट्रीय विमानतळ : देशातील सर्वात मोठा आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचा ग्रीनफिल्ड विमानतळ, १८ गावांचे पुनर्वसन, सर्वात मोठे पुनर्वसन पॅकेज, अंदाजित खर्च १४,५७३ कोटी रुपये. आवश्यक सर्व परवार्नया प्राप्त.

                                     ०००००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा