मंगळवार, १० डिसेंबर, २०१३

लोकशाहीला अधिक सुदृढ बनविण्यासाठी तरुणांनी
राजकीय, सामाजिक प्रक्रियेत सहभागी व्हावे - मुख्यमंत्री
नागपूर, दि. 10 : प्रसिद्धीची बदलती माध्यमे, बदलता काळ आणि बदलत्या तंत्रज्ञानानुसार देशातील राजकीय आणि सामाजिक समीकरणेसुद्धा बदलत आहेत. त्यामुळे युवा पिढीने आता काठावर बसून चर्चा करण्यापेक्षा आपल्या लोकशाहीला अधिक सुदृढ बनविण्याच्या दृष्टीने राजकीय आणि सामाजिक प्रक्रियेत सहभागी व्हायला हवे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे व्यक्त केली. 
राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्यावतीने विधानभवनात 43 व्या संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यासवर्गाचा आज मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील, विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे आदी मान्यवर उपस्थित होते. यासाठी अभ्यासवर्गासाठी राज्यातील 11 विद्यापीठातील राज्यशास्त्र, लोकप्रशासन आदी विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेणारे 84 विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, देशात नुकत्याच झालेल्या निवडणुकांमधून विविध निष्कर्ष पुढे येत आहेत. दिल्लीमध्ये एका संघटनेने निवडणुकीच्या प्रक्रियेत भाग घेऊन बदल घडविण्याची तर दुसऱ्या संघटनेने आंदोलनाच्या माध्यमातून बदल घडविण्याची भूमिका घेतली. लोकशाही प्रक्रियेतील हे दोन्ही नवीन पर्याय आज पुढे आले आहेत.
प्रसारमाध्यमाच्या स्वरुपातही व्यापक बदल होत असून पुर्वीच्या सभा, शक्तीप्रदर्शने अशा जनजागृतीच्या माध्यमांची जागा आता सोशल मीडीयासारख्या अत्याधुनिक प्रसारमाध्यमांनी घेतली आहे. बदलाची प्रक्रिया गतीमान झाली असली तरी केवळ बदलासाठी बदल न करता तो बदल आपली लोकशाही अधिक सदृढ बनविण्याच्या दृष्टीने आणि आपल्या राष्ट्राला अधिक बलशाली बनविण्याच्या दृष्टीने व्हायला हवा, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
1991 नंतर आपण आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारले. त्याचे फलस्वरुप म्हणून आज आपण जागतिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहोत. देशापुढे आज विविध समस्या असल्या तरी रोजगार हमी योजना, ग्रामविकास, शिक्षण, आरोग्य आदींसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्याची आपली क्षमता निर्माण झाली आहे. त्यामुळे गोरगरिबांपर्यंत विकास प्रक्रिया पोहोचवून सामाजिक न्याय साधण्यात आपण यशस्वी झालो आहोत. 1950 मध्ये असलेला आपला 3.5 टक्क्यांचा विकासदर 9 टक्क्यांपर्यंत नेण्यात आपण यशस्वी झालो. उदारीकरणाच्या धोरणानंतर देशात नामवंत उद्योजकांची संख्या कित्येक पटींनी वाढली.  त्यामुळे गुंतवणूक, रोजगार निर्मिती अशा अनेक संधी आपण साधू शकलो. लोकांचे दरडोई उत्पन्न वाढले असून त्यांची क्रयशक्तीही वाढली आहे. लोकशाही माध्यमातून स्वीकारलेल्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणाचे हे यश आहे, असे ते म्हणाले. 
उर्जा सुरक्षिततेचे मोठे आव्हान आज आपल्यासमोर उभे असून सुमारे 85 टक्के इंधनाची आपल्याला आयात करावी लागते. यासाठी आपले मोठे परकीय चलन खर्च होते. त्यामुळे संशोधनाच्या माध्यमातून नवे उर्जा स्त्रोत शोधण्याची आपल्याला गरज आहे. महाराष्ट्रापुढे कोरडवाहू शेतीला शाश्वत पाणीपुरवठा देण्याचे मोठे आव्हान आहे. दुष्काळाची परिस्थिती पुन्हा येऊ नये यासाठी आपल्याला प्राधान्याने काम करावे लागेल. वाढते नागरीकरण, राज्याचा समतोल विकास, औद्योगिक विकास, शिक्षणाची गुणवत्ता आदींबाबतीतही आपल्याला प्राधान्याने कार्य करावे लागेल.  गॅस, इंधन, कोळसा यासारख्या नैसर्गिक संपदेची कमतरता असल्यामुळे बौद्धीक संपदेवरच आपल्याला वाटचाल करावी लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. 
                                                                                                                                              विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत केले. अभ्यासवर्गाच्या आयोजनामागील भूमिका त्यांनी विषद केली. श्री. देशमुख म्हणाले की, विधिमंडळ हे जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारे महत्वाचे स्थान आहे. विधिमंडळाच्या कामकाजाची भावी पिढीला माहिती होण्याच्या दृष्टीने राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेमार्फत दरवर्षी संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन केले जाते. या वर्गातून प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी भावी काळात राजकीय आणि सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून गोरगरिबांच्या कल्याणासाठी कार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांच्या पक्षांतर विरोधी कायदा-उद्देश आणि वास्तव तसेच ‘Role and functions of upper house’ या दोन पुस्तकांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
दरम्यान, या अभ्यासवर्गात उद्या बुधवार दि. 11 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मंत्रिमंडळाची कार्यपद्धती या विषयावर तर सकाळी 9.30 वाजता ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांचे अर्थसंकल्पाची प्रक्रिया या विषयावर व्याख्यान होईल.
00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा