राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाने तयार केली शिक्षण पंढरी योजना
मुंबई, दि. 11 : तंत्रज्ञानाच्या
माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना सहजसोप्या पद्धतीने शिक्षण देणारी प्रणाली
राज्याच्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाने तयार केली असून या आयोगाचे
अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी त्याचे सादरीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
यांच्यासमोर आज मंत्रालयात केले.
या व्यवस्थेमध्ये ‘शिक्षण पंढरी’
या नावाने पंढरपूर जवळील पाच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा अवलंब करून
नियमित अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहे. यासाठीचा मजकूर आकर्षकरित्या आणि
सहजसोप्या पद्धतीने समजण्यासारखा असावा, यासाठी आयआयटी, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ
त्याचप्रमाणे सी-डॅक अशा संस्थांची देखील मदत घेण्यात येत आहे.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की,
अभ्यासक्रमासाठीचा मजकूर हा आकर्षक असण्याबरोबरच त्यात इतर अनेक बाबींचा समावेश
असावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना अद्ययावत माहिती मराठीमध्ये देखील उपलब्ध होऊ
शकेल. या पद्धतीत विषयांची संगणकीय माहिती टॅबलेटमध्ये टाकण्यात येणार आहे, ही
माहिती दिसण्यासाठी ब्रॉडबॅण्ड त्याचप्रमाणे प्री-लोडेड प्रोग्राम्सचा उपयोग
करावा, जेणेकरून ही माहिती ऑफलाईन देखील उपलब्ध होऊ शकेल.
राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान
आयोगाने औषधी वनस्पतींचा कोष तयार केला आहे. त्याचप्रमाणे बायोइंजिनिअरिंग
टेक्नॉलॉजी कमिशनचे केंद्र मुंबई, नागपूर तसेच पुणे येथे सुरू करण्याबाबत आयोगाने
पुढाकार घेतला आहे, याची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली. जागतिक दर्जाची फुड लॅब
उभारावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
गोंडवाना विद्यापीठात कम्युनिटी रेडीओ
गोंडवाना विद्यापीठात कम्युनिटी रेडीओ सेंटर सुरू
करावे, जेणेकरून गोंडी भाषेत विविध मनोरंजनाचे कार्यक्रम, माहितीपर कार्यक्रम सादर
करता येऊ शकतील, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या सेंटरसाठी निधी उपलब्ध करून
देण्याचे सांगितले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा