अल्पसंख्याकांना सहभागी केल्याशिवाय
राष्ट्राचा सर्वांगीण
विकास अशक्य : उपराष्ट्रपती
मुंबई, दि. 29 : देशाच्या विकास प्रक्रियेत
अल्पसंख्याक समाजाला पूर्णत: सहभागी करुन घेतल्याशिवाय आपले राष्ट्र आधुनिक आणि विकसीत राष्ट्र म्हणून
पुढे येऊ शकणार नाही, असे ठाम प्रतिपादन उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी
आज येथे केले. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अल्पसंख्याकांचा सामाजिक, राजकीय आणि
आर्थिक विकास करणे अत्यावश्यक आहे, असे ते म्हणाले.
मौलाना आझाद विचार मंचच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या कलीना कॅम्पसमध्ये
दोन दिवसांची मुस्लिम शैक्षणिक परिषद आयोजित करण्यात आली आहे. उपराष्ट्रपती श्री.
अन्सारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज या परिषदेचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी
ते बोलत होते. यावेळी राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,
केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री के. रहमान खान, राज्याचे अल्पसंख्याक विकास
मंत्री मोहम्मद आरिफ (नसीम) खान, मौलाना आझाद विचार मंचचे अध्यक्ष खासदार हुसेन
दलवाई, सच्चर समितीचे सदस्य सचिव अबू सालेह शरीफ, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.
राजन वेळुकर, मौलाना आझाद विचार मंचचे उपाध्यक्ष गुलाम पेशईमाम यांच्यासह
राज्यभरातून आलेले कार्यकर्ते, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ, अभ्यासक उपस्थित होते.
श्री. अन्सारी पुढे म्हणाले 2001 च्या जनगणनेनुसार देशातील साक्षरतेचा दर
64.8 असताना अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील साक्षरतेचा दर मात्र 59.1 टक्के इतका
आहे. मुस्लिम समाजात उच्च शिक्षीतांचे प्रमाण फक्त 4 टक्के इतके आहे. मुस्लिम
विद्यार्थ्यांचे शाळेतून गळती होण्याचे प्रमाण खूप जास्त असून याबाबत वेगवेगळ्या
अभ्यास अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मुस्लिम समाजातील शैक्षणिक
अनास्थेचा परिणाम त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासावर होत असून समाजातील ही
अनास्था दूर होणे गरजेचे आहे. यासाठी शासन अल्पसंख्याक विकास मंत्रालयामार्फत
व्यापक प्रयत्न करत असून आता मुस्लिम समाजानेही शिक्षणविषयक अनास्था झटकून मूळ
प्रवाहात सहभागी होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
समाजाच्या विकास प्रक्रियेत महिलांचे शिक्षण अत्यंत महत्वाचे ठरते. त्यामुळे
मुस्लिम समाजानेही आता मुलींच्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत करावे, असे त्यांनी
सांगितले.
अल्पसंख्याकांच्या
योजनांसाठी निधीची कमतरता नाही - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, राष्ट्राच्या
सर्वांगीण विकासासाठी सर्वसमावेशक विकास होणे गरजेचे असते. त्याचाच भाग म्हणून
अल्पसंख्याकांच्या विकासासाठी राज्यात व्यापक प्रयत्न केले जात आहेत. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय आणि पॉलिटेक्निकमध्ये दुसऱ्या
पाळीतील वर्ग, विविध शिष्यवृत्ती योजना, कर्ज योजना, स्पर्धा परीक्षा पूर्व
प्रशिक्षण योजना, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजना, अल्पसंख्याक शिक्षण संस्थांना
अनुदान अशा विविध योजनांच्या माध्यमातून अल्पसंख्याकांचे सक्षमीकरण करण्यासाठी
प्रयत्न केले जात आहेत. यापुढील काळातही अल्पसंख्याकांच्या विकासासाठी भरीव
प्रयत्न केले जातील. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार
नाही, असे ते म्हणाले.
वक्फ बोर्डाच्या सक्षमीकरणासाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात आली असून
वक्फ बोर्डाच्या निधीचा मुस्लिम समाजाच्या शिक्षणासाठी उपयोग करण्याचा विचार केला
जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.
एकही मुस्लिम विद्यार्थी
शाळाबाह्य नको - के. रहमान खान
केंद्रीय मंत्री के. रहमान खान म्हणाले मुस्लिम समाजातील एकही विद्यार्थी
शाळाबाह्य राहणार नाही यासाठी शासन आणि समाज दोघांनी मिळून व्यापक प्रयत्न करणे
गरजेचे आहेत. राष्ट्राच्या विकास प्रक्रियेत मुस्लिमांनीही मोठे योगदान देणे
अपेक्षीत असून अशा परिषदांमुळे ही प्रक्रिया गतिमान होईल. अल्पसंख्याकांच्या विकासासाठी केंद्र शासनामार्फत यापुढील काळातही
विविध योजना राबविल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
एमपीएससीसाठी
अल्पसंख्याकांना प्रशिक्षण देऊ - नसीम खान
राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री
श्री. नसीम खान म्हणाले शासनाच्या सेवेत मुस्लिमांचे प्रमाण अत्यल्प झाले असून ते
वाढविण्यासाठी शासनामार्फत व्यापक प्रयत्न केले जात आहेत. राज्य शासनामार्फत
राबविल्या जात असलेल्या आयएएस-आयपीएस पूर्व प्रशिक्षण योजनेला चांगले यश मिळाले
असून यंदा राज्यातील 2 मुस्लिम तरुणांनी युपीएससी परीक्षेत यश मिळविले आहे. पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजनेलाही चांगले यश मिळत
आहे. आता अशा प्रशिक्षणांची व्याप्ती वाढवून एमपीएससी, अभियांत्रिकी व वैद्यकीय
प्रवेश परिक्षेसंदर्भातही अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना राज्य शासनामार्फत
प्रशिक्षण उपलब्ध करुन दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस परिषदेचे संयोजक खासदार श्री. दलवाई यांनी
परिषदेचा उद्देश विशद केला. शिक्षणाची गंगा मुस्लिम
समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी मौलाना आझाद विचार मंचमार्फत भावी काळात
जिल्हास्तरावर परिषदा घेतल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
ही परिषद उद्या (दि. 30 मे) पर्यंत असून उद्या मुस्लिम मुलींचे शिक्षण, वक्फ
निधीचा वापर, व्यावसायीक व तांत्रिक शिक्षण, शैक्षणिक उन्नतीसाठी आर्थिक नियोजन,
मुस्लिम ओबीसींच्या शिक्षणविषयक समस्या आदी विषयांवर तज्ञांमार्फत मार्गदर्शन आणि
व्यापक चर्चा होणार आहे.
00000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा