शेतक-यांचे
जीवनमान उंचाविण्यासाठी शास्त्रज्ञांनी प्रयत्न करावेत -मुख्यमंत्री चव्हाण
परभणी दिनांक 30 : राज्यात
मोठ्या प्रमाणात शहरीकरण आणि औद्योगिकिकरण वाढले असले तरी आज 57 टक्के लोकांचा
उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. त्यातच राज्यात 80 टक्के जमीन कोरडवाहू शेतीखाली
आहे. कृषि क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा कोरडवाहू शेतक-याला झाला तरच हा
शेतकरी उभा राहील. या शेतक-यांचे आर्थिक, सामाजिक जीवनमान उंचाविण्यासाठी कृषि
शास्त्रज्ञांनी कसोशीने प्रयत्न करावे, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
यांनी केले.
मराठवाडा कृषि
विद्यापीठात महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद व मराठवाडा कृषि विद्यापीठ
यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि संशोधन आणि विकास समितीची बैठक आयोजित करण्यात
आली होती. तिच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
राज्याचे कृषि व पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून
कृषि परिषदेचे उपाध्यक्ष विजयराव कोलते, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार सुरेश
जेथलिया, कृषि विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, कृषि परिषदेचे
महासंचालक डॉ. एम. एच. सावंत, राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे
कुलगुरु डॉ. टी. ए. मोरे, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे
कुलगुरु डॉ. आर. जी. दाणी, दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे
कुलगुरु डॉ. के. ई. लवांदे तर स्वागताध्यक्ष म्हणून मराठवाडा कृषि विद्यापीठाचे
कुलगुरु डॉ. किशनराव गोरे उपस्थित होते.
मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण म्हणाले, राज्यात 80 टक्के असलेला कोरडवाहू शेतकरी समृध्द होण्यासाठी
आधुनिक तंत्रज्ञान शेतक-यांच्या बांधापर्यंत पोहचले पाहिजे. राज्याच्या कृषि
अर्थव्यवस्थेत व शेतक-यांच्या जीवनात कृषि विद्यापीठांमुळे किती बदल झाला, याचा
विचार शास्त्रज्ञांनी करावा. राज्यात टंचाईची स्थिती भीषण आहे. यामुळे
शेतक-यांचे नुकसान झाले आहे. पाण्यासाठी नागरिकांचे स्थलांतर होऊ नये म्हणून
शासनाने राज्यात साडेपाच हजार टँकर सुरु केले असून 11 हजार गावांना पिण्याचे
पाणी उपलब्ध करून दिले आहे. तसेच 9 लक्ष जनावरांसाठी छावण्यांमध्ये चारा व पाणी
उपलब्ध करून दिले आहे. राज्याला आगामी काळात टंचाईमुक्त करण्यासाठी शासन
प्रयत्नशील आहे. पाणलोट विकास, सिमेंट नाला, तलावातून गाळ काढणे आदी कामे
प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. राज्यात आतापर्यंत 150
कोटी रुपये खर्च करून जवळपास 1500 सिमेंट नाल्याचे बांधकाम करण्यात आले आहे.
नागरिकिकरणामुळे जमिनीतील पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे
आगामी काळात पाणी वापराचे व्यवस्थापन हे आव्हान सर्वांसमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे
पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी
केले.
यावेळी कृषि व पणन
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, राज्यात 9 हवामान प्रदेश आहेत. त्यावर
आधारीत कृषि धोरण तयार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. याचा
फायदा राज्यातील कृषि क्षेत्राशी संबंधित सर्वांना होईल. कृषि विद्यापीठ आणि
शेतकरी यांचे अत्यंत जवळचे नाते असून शेतकरी हा केंद्रबिंदू मानून विद्यापीठाने
संशोधनात महत्त्वाची भुमिका बजावल्याचे ते म्हणाले. यावेळी दुष्काळग्रस्त
शेतक-यांसाठी आर्थिक मदत म्हणून मराठवाडा कृषि विद्यापीठातर्फे मुख्यमंत्र्यांना
धनादेश देण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते डॉ. ए. के. शिंदे आणि डॉ. आर.
एन. शेळके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कृषि परिषदेचे उपाध्यक्ष विजयराव
कोलते, कृषि विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.
सुधीरकुमार गोयल यांनीसुध्दा मार्गदर्शन केले.
प्रात्साविकात कुलगुरु
डॉ. के. पी. गोरे यांनी विद्यापीठात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती
दिली. मान्यवरांचे आभार डॉ. गोवर्धन खंडागळे यांनी मानले. कार्यक्रमाला आमदार
जयप्रकाश दांडेगावकर, जिल्हाधिकारी डॉ. शालीग्राम वानखेडे, पोलीस अधीक्षक संदीप
पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री, माजी आमदार सुरेश देशमुख,
माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, मेघना बोर्डीकर, डॉ.यू. व्ही. महाडकर, डॉ. आर.
एस. पाटील, कृषि आयुक्त उमाकांत दांगट यांच्यासह कृषि विद्यापीठाचे संशोधन
संचालक, शास्त्रज्ञ, प्राचार्य आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी मराठवाडा
कृषी विद्यापीठातील विविध उपक्रमांना भेट देऊन पहाणी केली. यामध्ये कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, कृषि अभियांत्रिकी व
तंत्रज्ञान महाविद्यालय, वैज्ञानिक
भवन, पिंगळगड नाला पाणलोट क्षेत्र यांचा समावेश
होता. मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांच्या
हस्ते कृषि औजारे चाचणी, निर्मिती व
प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन झाले.
0000000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा