मंगळवार, १९ मार्च, २०१३

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या मराठी कलाकारांचे अभिनंदन
मराठी चित्रपटांनी आता आंतरराष्ट्रीय भरारी घ्यावी - मुख्यमंत्री
मुंबई दि.19 : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर यंदाही मराठीचा झेंडा फडकल्याने मराठी चित्रपटांचा दर्जा आणि निर्मिती मुल्यांवर शिक्कामोर्तबच झाले आहे. या पुरस्कारांमुळे भविष्यात मराठी चित्रपटांना अधिक चांगले दिवस येतील अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  काल नवी दिल्ली येथे 60 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कांरामध्ये मराठी चित्रपटांनी विविध गटात बाजी मारली आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
पुरस्कार विजेत्या मराठी कलाकारांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या वर्षी देखिल मराठी चित्रपटांनी या पुरस्कारावर ठसा उमटवून आपल्यातील कलागुणांचा दर्जा हा स्पर्धात्मक असून इतर दर्जेदार चित्रपटांपेक्षा कोठेही मागे नाहीत, हे दाखवून दिले होते.  यावर्षी देखिल सर्वच गटांमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेल्या मराठी चित्रपटांनी ही जी भरारी मारली आहे ती कौतुकास्पद असून राज्यातील जनतेच्या वतीने मी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो.
सर्वोत्तम अभिनेता म्हणून पुरस्कार मिळालेले विक्रम गोखले, त्याचप्रमाणे सर्वोत्तम गायिका पुरस्कार मिळालेल्या आरती अंकलीकर-टिकेकर हे त्यांच्या क्षेत्रातील दिग्गज असून यापूर्वी देखिल त्यांनी आपले श्रेष्ठत्व सिध्द केले आहे.  उषा जाधव यांच्यासारखी नवोदित अभिनेत्री आणि शिवाजी लोटन-पाटील यांच्यासारख्या नवख्या दिग्दर्शकाने देखिल आपल्या गुणांची चुणूक दाखवून दिली आहे.  सिनेमॅटोग्राफीसाठी श्री.विक्रांत पवार, कलाविभागासाठी गौरी पटवर्धन आणि संगीतासाठी श्री. शैलेंद्र बर्वे यांना पुरस्कार मिळाल्याने या तांत्रिक गटातही महाराष्ट्राने आपले वर्चस्व सिध्द केले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 
महाराष्ट्राने भारतीय चित्रपट सृष्टी घडविली आहे, असे म्हटले तर मुळीच अतिशोयक्ती होणार नाही.  मधल्या काळात मराठी चित्रपटांना काहींसे पिछाडीवर जावे लागले होते.  मात्र त्यानंतर आशयघनता, निर्मिती तंत्रात सुधारणा आणि उत्तम व्यावसायिक मुल्यांमुळे मराठी चित्रपटांनी स्वत:मध्ये अमुलाग्र बदल घडविले. ज्याची परिणती म्हणून आज राष्ट्रीय पातळीवर या चित्रपटांचा गौरव होत आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी मराठी चित्रपट आता आंतरराष्ट्रीय पातळीवर जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
         -----0-----          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा