दिल्लीतील
पिडीत तरुणीच्या निधनाबद्दल मुख्यमंत्र्यांना शोक
कठोर
शिक्षेची तरतूद असलेला कायदा आणि त्याची
कडक
अंमलबजावणी हिच खरी श्रध्दांजली : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 29
: बलात्कारासारखा मानवतेला कलंक असलेला गुन्हा करणाऱ्यांना
कठोरात कठोर शिक्षेची तरतूद करणारा कायदा करणे आणि त्याची तातडीने अंमलबजावणी करणे
हिच दिल्लीमधील पिडीत तरुणीला खरी श्रध्दांजली ठरेल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण यांनी म्हटले आहे.
दिल्लीमधील सामुहिक
बलात्कारानंतर गेले 13 दिवस मृत्युशी झुंज देणाऱ्या तरुणीच्या निधनाबद्दल
श्री.चव्हाण यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
शोक संदेशात श्री.चव्हाण यांनी म्हटले आहे की, अलिकडच्या कालावधीत
महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दुर्देवाने वाढले आहे. एकीकडे शिक्षणाचा
सर्वस्तरावर प्रसार होत असताना अशा प्रकारची अमानवी कृत्ये वाढणे हे चिंताजनक आहे.
या प्रकारांना पायबंद घालण्यासाठी कायद्यामध्ये कठोर शिक्षेची तरतूद करणे आवश्यक
आहे. तसेच स्त्रियांवरील अत्याचार आणि बलात्कारासारख्या गुन्ह्यांची सुनावणी विशेष जलदगती न्यायालयांमार्फत कमीत कमी कालावधीत
होणे आणि गुन्हेगारांना शिक्षा होणे आवश्यक आहे.
आपण आपल्या स्तरावर यासंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत. कठोर कायदे, जलद सुनावणी, शिक्षेची तातडीने
अंमलबजावणी याचबरोबर सामाजिक प्रबोधनासारखे उपाय योजूनच अशा प्रकारच्या घटना टाळणे
शक्य आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
नवी दिल्लीतील या
घटनेनंतर देशभरात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन मी राज्याच्या
गृहमंत्र्यांसमवेत वरिष्ठ सनदी व पोलीस अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन अशा
प्रकारच्या राज्यात घडलेल्या घटनांचा सविस्तर आढावा घेतला आहे. सध्याच्या जलदगती न्यायालयांपैकी 25 जलदगती
न्यायालये स्त्रियांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांचे खटले चालविण्यासाठी असावीत अशी
विनंती मुंबई उच्च न्यायालयाला करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात भविष्यकाळात अशा
प्रकारचे गुन्हे घडू नयेत यासाठी गृह विभागाला आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना
देण्यात आल्या आहेत असे श्री.चव्हाण यांनी म्हटले आहे.
दिल्लीतील घटनेमुळे
संपूर्ण देशभरात विशेषत: तरुण वर्गात निषेधाची लाट उसळली आहे आणि ती स्वाभाविक
आहे. अशा प्रकारच्या घटनांचा निषेध करावा
तेवढा थोडाच आहे. मात्र, निषेध वा निदर्शने करताना सामाजिक शांततेला तडा जाऊ न
देता कायदा व सुव्यवस्था पाळून शांततामय मार्गाने करण्याचे भानही निदर्शकानी पाळले
पाहिजे असेही आवाहन श्री.चव्हाण यांनी केले आहे.
-----0-----
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा