इंदर
कुमार गुजराल यांच्या निधनाने
देशाने
एक खंबीर नेतृत्व गमावले
--
मुख्यमंत्री
मुंबई, दि. 30 : माजी पंतप्रधान इंदर कुमार गुजराल यांच्या निधनाने
राजकारणातील एक स्वाभिमानी आणि खंबीर नेतृत्व देशाने गमावले आहे, अशा शब्दात
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.
आपल्या
शोक संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, भारतीय राजकारणातील खंबीर आणि दृढनिश्चयी
व्यक्तिमत्वामध्ये गुजराल यांचा समावेश प्रामुख्याने करावा लागेल. देशाचे
पंतप्रधान पद भूषविण्याची संधी त्यांना मिळाली आणि अतिशय कमी कालावधी लाभला असला
तरी त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाची छाप राजकारण आणि प्रशासनावर टाकली. त्यांचे
वैशिष्ट्य म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यापासून ते डॉ.मनमोहन सिंग
यांच्यापर्यंत सत्तेच्या राजकारणातील सर्व चढउतारांना त्यांनी जवळून पाहिले होते.
त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा आणि राजकीय परिपक्वतेचा उपयोग वेळोवेळी सर्वांना होत
होता. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणाचा त्यांचा गाढा अभ्यास तसेच विविध
विषयांवर सखोल विचार करण्याची त्यांची क्षमता पाहता असा कुशल नेता गमावल्याने
देशाचे मोठे नुकसान झाले आहे.
गुजराल
यांना देशातील सर्व पक्षांमध्ये आदराचे स्थान होते. त्यांच्या अभ्यासू व प्रभावी व्यक्तिमत्वामुळे
सर्व राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. मला देखिल
दिल्लीत असतांना त्यांचे काम जवळून पाहण्याची त्याचप्रमाणे देशासमोरील विविध
प्रश्नांवर त्यांचे विचार जाणून घेण्याची संधी मिळाली होती. गुजराल यांच्या रुपाने
एक स्पष्टवक्ता, राष्ट्रप्रेमी आणि भविष्यातील वाटचालीची दृष्टी असलेला प्रभावी
नेता आपल्यातून गेला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा