बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१२

महात्मा फुले सामाजिक सुधारणांचे जनक- राज्यपाल
पुणे विद्यापीठात पूर्णाकृती पुतळयाचे अनावरण

पुणे, दि. 28 : महात्मा फुले सामाजिक सुधारणांचे जनक असून त्यांच्या प्रेरणतून महिलांच्या शिक्षणाचा पाया महाराष्ट्रात घालण्यात आला आहे.  स्वयंरोजगार शिक्षणाच्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण होऊ शकेल, असे विचार राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी व्यक्त केले.
            अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने पुणे विद्यापीठास अर्पण करण्यात आलेल्या महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे अनावरण पुणे विद्यापीठात राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते आज करण्यात आले.  तेंव्हा ते बोलत होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अध्यक्षस्थानी होते.  सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री सचिन अहिर, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे व्यासपीठावर उपस्थित होते.
            पुणे शहर महात्मा फुले यांची कर्मभूमी असून येथील विद्यापीठात त्यांचा पुतळा उभारला जात असल्याबद्दल आनंद व्यक्त करून राज्यपाल म्हणाले 'महात्मा फुले त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक सुधारणा करताना अतोनात धारिष्ट्य दाखविले आहे.  महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणांना नवीन दिशा देण्याचे काम महात्मा फुले यांनी केले असून छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या  कर्त्या समाजसुधारकांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेतली आहे.  स्त्रीशिक्षण, प्रौढ शिक्षण, विधवा विवाह आणि बालहत्या प्रतिबंधक क्षेत्रात त्यांनी केलेले काम क्रांतीकारी स्वरूपाचे आहे.  त्यांच्या विचारामुळे आज देशाने स्त्री शिक्षण, महिलांना स्थानिक स्वराज्य संस्था 50 टक्के आरक्षण आदी उल्लेखनीय काम केले आहे.  परंतु भ्रूणहत्या, हुंडाबंदी सारख्या अशा क्रूरप्रथा समाजात सुरू असून ही दुर्देवाची खेदाची बाब आहे.  महात्मा फुले यांचे या संदर्भातील विचार अंमलात आणल्यास या प्रथांना पायबंद बसू शकेल.  शिक्षण आणि स्वयंरोजगारामुळेच स्त्रीयांचे सबलीकरण होऊ शकेल.
            शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान सुधारावे विषय महात्मा फुले यांचा जिव्हाळयाचा विषय होता, असे सांगून राज्यपाल म्हणाले, 'कमी क्षेत्रफळात शेतीचे जास्तीत जास्त उत्पादन वाढविणे हे शेतकऱ्यांपुढील आजचे आव्हान आहे.  कृषीविद्यापीठ, उद्योजक शेतकरी यांच्यात समन्वय घेऊन शेती किफायतशीर कशी होईल या दृष्टीने कार्यवाही होणे गरजेचे आहे.  भारतीय बाजार पेठेत थेट परदेशी गुंतवणूकीमुळे कृषि क्षेत्राला काय लाभ मिळू शकेल या बाबत कृषीविद्यापीठाने जागृती करण्याची गरज आहे.
            समाजातील वंचित घटकांना महिलांना शिक्षण देण्याचे क्रांतीकारी कार्य महात्मा फुले यांनी पुण्यातून सुरू केले आहे.  याच विद्यापीठात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणे ही बाब औचित्याला धरून असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.   ते म्हणाले, महाराष्ट्रात एकोणीसाव्या शतकात जे द्रष्टे महापुरूष होऊन गेले त्यात महात्मा फुले यांचे स्थान अग्रणी आहे.  सामाजिक समता स्थापन करण्यासाठी त्यांनी केलेले सामाजिक कार्य आजच्या परिस्थितीतही प्रेरक आहे.  स्त्रीशिक्षण, विधवाविवाह, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी त्यांनी केलेले कार्य दीपस्तंभासारखे आहे.  ज्योतिराव फुले यांनी 'शेतकऱ्यांचा आसूड' या ग्रंथात व्यक्त केलेले विचार त्यांच्या द्रष्टेपणाची साक्ष आहेत'.
            महात्मा फुले यांनी शिक्षणाची कास धरून खऱ्या अर्थाने समाजातील दीन-दलि स्त्रीया यांच्यापर्यंत ज्ञान नेण्याचे बहुमोल कार्य केले असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.  ते म्हणाले, प्रत्येकाला शिक्षण मिळावे हा त्यांचा आग्रह होता.  त्याला आज व्यापक स्वरूपात प्रतिसाद मिळाला आहे.  सामाजिक कार्याची महात्मा फुल्यांपासून प्रेरणा घेणाऱ्या घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा समता परिषदेतर्फे पुणे विद्यापीठात उभारण्यासाठी देण्यात येईल.
            कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी प्रास्ताविक केले.  महात्मा फुले यांचा पुतळा तयार करणारे शिल्पकार बालकृष्ण पांचाळ यांचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  प्रभारी कुलसचिव डॉ. चंद्रशेखर चितळे यांनी आभार मानले.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा