शनिवार, ३ नोव्हेंबर, २०१२


गृहनिर्माण संस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी
लवकरच कालबद्ध कार्यक्रम - मुख्यमंत्री
          मुंबई, दि. 3 : गृहनिर्माण संस्थांच्या समस्या हा मुंबईकरांच्या दैनंदिन जिवनाशी निगडीत ज्वलंत प्रश्न असून तो सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.
          उत्तर मध्य मुंबईतील गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज कांदिवली येथील ठाकूर व्हिलेज येथे खासदार संजय निरुपम यांनी आयोजित केला होता, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार सर्वश्री रमेशसिंह ठाकूर, अस्लम शेख, मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटे, सहकार आयुक्त मधुकर चौधरी, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी संजय देशमुख, स्थानिक नगरसेवक व इतर मान्यवर उपस्थित होते.
          गृहनिर्माण संस्थांच्या नावे जमीन हस्तांतरण करणे, भोगवटा प्रमाणपत्र व पाणी या समस्या भेडसावत असल्याची जाणीव शासनाला असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले जमीन हस्तांतरण प्रकरणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी जिल्हा उपनिबंधकाकडे 1 ते 10 तारखे पर्यंत यासंदर्भातील अर्ज गोळा केले जातील व त्याची एक प्रत भू मापन किंवा दुय्यम निबंधकाकडे पाठविण्यात येईल आणि त्याची छाननी 11 तारखेपर्यंत केली जाईल. कागदपत्रांच्या त्रुटी सूचना फलकावर किंवा वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात येतील. त्यानंतर भू-मापन आणि दुय्यम निबंधकासमोर 20 तारखेपर्यंत सुनावणी होऊन 21 ते 30 तारखेपर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण
केली जाईल आणि त्यांसदर्भातील आदेश जिल्हा उपनिबंधक 31 तारखेपर्यंत निर्गमित करतील. चटई निर्देशांकाचा भंग न झाल्यास भोगवटा प्रमाणपत्र देतांना इतर बाबतीत काही त्रुटी आढळल्यास त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
          यावेळी श्री.थोरात म्हणाले गृहनिर्माण संस्थांच्या नावे जमीन हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्नशील असून ही हस्तांतरण प्रक्रिया अर्ज केल्यापासून चार महिन्यात पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्नशील राहील. जिल्हा उपनिबंधकाच्या कार्यालयीन जागेचा प्रश्न लवकरच सोडविण्यात येईल. त्यामुळे त्या त्या विभागातील गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा वेळ वाचेल.
          गृहनिर्माण संस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी सहकार, महसूल, म्हाडा, मुंबई महानगरपालिका यांची समन्वय समिती गठीत करुन विशिष्ट कालावधीत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले.
          यावेळी श्रीमती जीग्ना जोशी, श्री. कौसंबी, मिलींद सावंत या गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी  मुंबईतील गृहनिर्माण संस्थांच्या विविध समस्या मांडल्या. यावेळी उत्तर मध्य मुंबई विभागातील गृहनिर्माण संस्थाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा