मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१२



झोपडीमुक्त महाराष्ट्र निर्माण करुन
समतेचे राज्य निर्माण करायचे आहे
– मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

            ठाणे, दि. 23 : समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने जगण्याची संधी मिळाली पाहिजे. झोपडीमुक्त महाराष्ट्र निर्माण करुन आपल्याला समतेचे राज्य आणायचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
          कल्याण डोंबिवली महानगरपालिका व केंद्र शासन पुरस्कृत जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान अभियान अंतर्गत ‘नागरी गरीबांसाठी घरे‘ या योजनेअंतर्गत सदनिका वितरण समारंभ प्रसंगी ते डोंबिवलीच्या  सावित्रीबाई फुले नाटयगृहात  बोलत होते.
          यावेळी विधान परिषेदेचे उपसभापती वसंत डावखरे, पालकमंत्री ना. गणेश नाईक, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित, खा. आनंद परांजपे, खा. सुरेश टावरे, आ. संजय दत्त, आ. निरंजन डावखरे, आ. रामनाथ मोते, आ. एकनाथ शिंदे, आ. रवींद्र चव्हाण, आ. रमेश पाटील, आ. गणपत गायकवाड, आ. प्रकाश भोईर, महापौर वैजयंती गुजर-घोलप, प्रधान सचिव देवाशिष चक्रवर्ती , प्रधान सचिव श्रीकांत सिंह, जिल्हाधिकारी पी. वेलरासू, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुरूंदकर उपस्थित होते.
          मुख्यमंत्री चव्हाण पुढे म्हणाले की, समाजातील प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगता येणं, चांगल्या घरात राहता येणं, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. आपल्याला समतेचे राज्य निर्माण करुन सर्वांगीण विकास करायचा आहे.आज मुंबई शहरावर प्रचंड ताण पडत आहे. नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या परिसराचे झपाट्याने नागरीकरण झाले आहे. येथील वाहतूक, प्रदूषण आणि रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे. तो सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे.बेरोजगारी हटविण्यासाठी खासगी क्षेत्रात नोकऱ्या मिळाला पाहिजेत. खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीला प्राधान्य दिले तरच अनेक उद्योग उभे राहतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल.

          या कार्यक्रमात आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित म्हणाले की, ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून त्याप्रमाणे कार्यवाही करण्याची गरज आहे. ठाणे जिल्हा मोठा आहे. आदिवासी, सागरी, डोंगरी भागांचा विकास करायचा असेल तर जिल्ह्याचे विभाजन झाले पाहिजे.
          विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे म्हणाले की, विकासाच्या कामात कुणीही राजकारण करु नये. राज्य शासनानेही विकासाच्या मुद्दयावर योग्य निर्णय घेऊन न्याय दिला पाहिजे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनीही आपल्या भाषणात सामान्य नागरिकांना घरे दिल्याबद्दल महानगरपालिकेला धन्यवाद दिले. त्यांनी पुढे सांगितले की, ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी विभाजनाशिवाय पर्याय नाही. डोंबिवलीचा प्रदूषण प्रश्न, मोडकळीस आलेल्या घरांचे प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. एमएमआरडीएनेही आता मुंबईच्या आजूबाजूच्या शहरांचा विकास करण्यासाठी पुढे आले पाहिजे.
          या कार्यक्रमात पालकमंत्री नाईक यांनीही मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, 4 लाख 50 हजार घरे तोडण्याचे आदेश मा. न्यायालयाने दिले आहेत. त्यासाठी सरकारने योग्य तो निर्णय घेऊन न्यायालयात बाजू मांडली पाहिजे. याचवेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्न उपस्थित करुन मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.
          प्रारंभी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. महापौर वैजयंती गुजर-घोलप यांनीही आपल्या मनोगतात सर्व पाहुण्यांचे स्वागत करुन मनपाने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते  ताईबाई सुधाकर पानपाटील या महिलेस प्रातिनिधिक स्वरुपात घराची चावी देण्यात आली.
          या समारंभाला लोकप्रतिनिधी, वरिष्ठ शासकीय अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

***********

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा