सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१२




मानखुर्द महिला सुधारगृह प्रकरणी
गुन्हे शाखेमार्फत चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई, दि. 29 : पोलिसांनी ताब्यात घेऊन मानखुर्द येथील नवजीवन महिला सुधारगृहात ठेवलेल्या महिलांचा लैंगिक छळ, त्याचप्रमाणे त्यांच्यावर शस्त्राचा धाक दाखवून बलात्कार करण्याच्या कथित घटनेच्या वृत्ताची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गंभीर दखल घेतली असून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेमार्फत चौकशी करुन तात्काळ अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.
मानखुर्दच्या महिला सुधारगृहातील काही महिला पळून गेल्याबाबतचे वृत्त काही दैनिकात प्रसिध्द झाले आहे.  यापैकी एका महिलेची मुलाखत एका इंग्रजी दैनिकात आज प्रसिध्द झाली आहे.  त्याची  मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेऊन गृह विभागाचे अपर मुख्य सचिव श्री.अमिताभ राजन यांना तात्काळ गुन्हे शाखेतर्फे या सर्व प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ही घटना अत्यंत गंभीर असून तिची सखोल चौकशी करण्यात येईल.  अशा घटना यापुढे घडू नयेत म्हणून महिला व बालकल्याण विभाग, त्याचप्रमाणे पोलिसांना काटेकोर कार्यवाही करण्यास सांगण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
-----0-----





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा