मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१२


राजीव गांधी इन्फ़ोटेक पार्कला देशातील
आदर्श उद्योग पार्क बनविणार-मुख्यमंत्री

पुणे दि.16 राजीव गांधी इन्फ़ोटेक पार्क हे देशातील महत्वाचे कुशल रोजगार निर्मिती केंद्र असल्यामुळे शासनाकडून रस्ते, वीज,सुरक्षा आणि दळणवळणासाठीच्या सर्व अत्याधुनिक सुविधा प्राधान्याने पुरविण्यात येतील, हा देशातील एक आदर्श उद्योग पार्क करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
       हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन बरोबर राजीव गांधी इन्फ़ोटेक पार्क मधील पायाभुत सोयसुविधा बध्दल इन्फ़ोसिस येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री नारायण राणे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्यकार्यकारी अधिकारी भुषण गगराणी, जिल्हाधिकारी विकास देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल कवडे, हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मृत्युंजय सिंग, हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनचे इतर पदाधिकारी, शासनाच्या संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
 राजीव गांधी इन्फ़ोटेक पार्क मध्ये आज हजारो लोक काम करत आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्या येथे सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एम.आय.डी.सी) हिंजवडी,मारुंजे, माण या तीन गावांच्या परिसरात पसरलेल्या या पार्कसाठी सर्व पायाभुत सोयसुविधा देण्यासाठी प्राधान्य दिले असून अतिशय उत्तम दर्जाचे रस्ते, रस्ता रुंदीकरण, वाहतुक आणि रहदारीसाठी आंतरराष्ट्रीय सल्लागार संस्थेची नेमणुक करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी दिली.
 राजीव गांधी इन्फ़ोटेक पार्कला येण्यासाठीचे सबवे, नॅशनल हायवे, या भागातील सुरक्षेसाठी अत्याधुनिक पोलिस स्टेशन, सी.सी.टि.व्ही कॅमेरे त्याला लागणारी कंट्रोल रुम, वीज आणि पाणी या महत्वाच्या प्रश्नासाठी लवकरात लवकर मंत्रालयात आपण एक बैठक घेवू आणि त्याची तातडीने अंमलबजावणी कशी करता येईल हे पाहिले जाईल असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
       अग्निशमन यंत्रणेसाठी लागणारे अत्याधुनिक साधने 4 महिन्यात उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, या भागातील घण कचरा व्यवस्थापनावरही लवकरच उपाय काढला जाईल. या भागात वाहतुक व्यवस्थापन अतिशय महत्वाचे असून प्रत्येकाने स्वत:च्या कारने येण्यापेक्षा 4 जणांमध्ये एक गाडी शेर करा असे आवाहन करुन असे केले तर खुप मोठा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आपली मदत होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राजीव गांधी इन्फ़ोटेक पार्क हा देशातील एक आदर्श प्रकल्प करण्याच्या दृष्टिने जे म्हणून आवश्यक आहे ते केले जाईल असे सांगून इंड्स्ट्रीज टाऊनशिप प्लॅनिंग, स्थानिक प्रश्नाबाबतही मुख्यमंत्र्यांनी आपली भुमिका मांडली. बायो-टेक उद्योगांच्या प्रश्नाबाबत वेगळी बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीव गांधी इन्फ़ोटेक पार्क च्या तिन्ही फ़ेजची जवळपास तासभर पाहणी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा