सहकाराला वेगळी दिशा –
मुख्यमंत्री
मुंबई, दि. 27 : किसन वीर सातारा सहकारी कारखान्याच्या वतीने खंडाळा तालुका सहकारी
साखर कारखान्याची उभारणी भागीदारी तत्वावर करण्यात येत आहे. देशातील हा पहिलाच
प्रकल्प असून आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षात
हा प्रकल्प उभारण्यात येत असल्याने सहकाराला एक वेगळी दिशा मिळणार आहे, असे
प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले आणि खंडाळा तालुका
शेतकरी साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकर गाढवे यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या
केल्या, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, या प्रकल्पात 121 कोटींची गुंतवणूक होणार असून हा अतिशय
नाविन्यपूर्ण असा प्रकल्प आहे. खंडाळा तालुक्यासारख्या दुष्काळी भागात समृद्धीचे
बेट या कारखान्यामुळे निर्माण होणार आहे.
सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, या प्रकल्पामुळे 2500 मेट्रीक टन
उत्पादन होणार असून 9 मेगावॅट सहविजनिर्मिती होणार आहे. येत्या आठ-दहा महिन्यात या
प्रकल्पाची उभारणी होणार असून 2013-14च्या गाळप हंगामात हा कारखाना प्रायोगिक
तत्वावर सुरू होईल. 2014-15 या वर्षात हा कारखाना पूर्ण गाळप घेण्याच्या क्षमतेचा
होईल. 12 वर्षांसाठी ही भागिदारी करण्यात आली आहे.
यावेळी राज्यमंत्री सतेज पाटील, सहकार सचिव राजगोपाल देवरा, साखर आयुक्त विजय
सिंघल, किसन वीर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक विजय वाबळे आणि खंडाळा तालुका
शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक व्ही. जी. पवार, धनाजीराव डेरे, सचिव बी.
बी. ढमाले तसेच संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा