मंगळवार, ११ सप्टेंबर, २०१२


कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली
मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट

            मुंबई, दि. 11: कॅनडाचे परराष्ट्र मंत्री जॉन बेर्ड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची आज वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
            जॉन बेर्ड  यांचे मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सांस्कृतिक विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव अजित कुमार जैन, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मल्लीक आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
            मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र राज्य औद्योगिक क्षेत्रात देशात  प्रथम क्रमांकावर असून राज्यात 34 टक्के थेट विदेशी गुंतवणूक  झाली आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे.  त्याचबरोबर 'बॉलिवूड' हे चित्रपट निर्मितीचे प्रमुख केंद्रही या शहरात असून या क्षेत्रात गुंतवणूकदारांना विपुल संधी उपलब्ध आहेत.
            महाराष्ट्राला समृद्ध सागरी किनारा लाभला असून विविध प्राचिन मंदिरे आणि पर्यटनस्थळांमुळे राज्यातील पर्यटन व्यवसाय विकसित आहे. राज्यात  नागरी तसेच ग्रामीण विभागात मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध असून शैक्षणिक दर्जा उंचावण्याकडे शासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. असे सांगून शासन कार्यपद्धती विषयक माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिली.
0 0 0 0

1 टिप्पणी: