सरसेनापती
प्रतापराव गुजर स्मारक, नेसरी
छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहा शुर सरदार यांनी आदिलशाही सरदार बहलोलखान याच्याशी दोन हात करून 24 फेब्रुवारी 1674
रोजी हौतात्म्य पत्करले. मराठी इतिहासात हे शिलेदार वेडात दौडले वीर मराठे सात म्हणून प्रसिद्ध आहेत. ही घटना घडली गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी येथे. विधानसभेचे माजी अध्यक्ष श्री. बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नातून नेसरी येथील या वीरभूमीवर एक भव्य स्मारक उभे राहिले आहे. या स्मारकाचे उद् घाटन केंद्रीय कृषीमंत्री श्री. शरद पवार यांच्याहस्ते 25
फेब्रुवारी 2009 रोजी भव्य समारंभात झाले. या स्मारकाचे शिल्पकार श्री. बाबासाहेब कुपेकर यांचे दि. 26 सप्टेंबर
2012 रोजी निधन झाले. यानिमित्ताने या स्मारकाविषयी......
महाराष्ट्राचा इतिहास हा वीरश्रीयुक्त आणि देदिप्यमान आहे. मायभूमीसाठी सर्वोच्च त्याग करणाऱ्या
म्हणजेच हौतात्म्य पत्करणाऱ्या शूरवीरांचा आहे. वेळप्रसंग आल्यास मोडून जाणे पसंत करू, पण कोणासमोरही मान वाकवणार नाही, या जिद्दीने शत्रुशी दोन हात करणाऱ्यांचा आहे. नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांचे स्वामींच्या रक्षणासाठी बलीदान असो किंवा आधी लगीन कोंडाण्याचे असे म्हणत लढाईवर जाणाऱ्या सरदार तानाजी मालुसरे यांचे हौतात्म्य असो, हा इतिहास अंगावर रोमांच उभे करणाऱ्या अक्षरश: शेकडो प्रसंगांनी भरलेला आहे. असाच एक प्रसंग शिवशाहीत कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजजवळच्या नेसरी इथे घडला. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहा शुर सरदार यांनी आदिलशाही सरदार बहलोलखान याच्याशी दोन हात करून हौतात्म्य पत्करले. मराठी इतिहासात ही घटना वेडात दौडले वीर मराठे सात म्हणून प्रसिद्ध आहे.
प्राणांची
आहुती देत स्वराज्याचे हे सात सूर्य ज्याठिकाणी अस्ताला गेले, तेथे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब कुपेकर यांच्या पुढाकाराने नेसरी येथील पावनखिंडीत एक भव्य आणि देखणे स्मारक आकाराला आले आहे. येणाऱ्या पिढ्यांना जाज्वल्य देशभक्तीचे धडे देणारे हे स्मारक कोल्हापूर जिल्ह्यातील एक पावन तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जात आहे.
स्वपराक्रमाच्या जोरावर शिवछत्रपतींच्या सैन्याचे सरसेनापती बनलेले प्रतापराव गुजर यांनी शिवरायांच्या घोडदळातील एक गुप्तहेर म्हणून अपल्या शिलेदारीला प्रारंभ केला. 24 एप्रिल 1660 रोजी संभाजी कावजी या भीमकाय सरदाराचा व्दंव्दयुद्धात वध करून त्यांनी आपल्या शौर्याची चुणूक दाखविली. 1663 मध्ये शाहिस्तेखानाने सिंहगडावर हल्ला केला, तेव्हा प्रतापरावांनी अतुलनीय शौर्य दाखवित शाहिस्तेखानाच्या सैन्याला पळता भुई थोडी केली आणि त्याचा दारूण पराभव केला. त्यांच्या पराक्रमाची कदर करीत शिवरायांनी त्यांना सरनोबत केले. 17 ऑक्टोबर 1670 रोजी सरदार दाऊदखान आणि इखलासखान यांचा पराभव त्यांनी केला. लाडाचे कारंजे लुटून त्यांनी स्वराज्यासाठी एक कोटींची संपत्ती आणली. महकुबसिंग राजपूत या मातब्बर सरदाराशी त्यांनी युद्ध करून त्याचा वध केला. हे युद्ध कर्ण-अर्जुन युद्धाप्रमाणे भयंकर होते, असा उल्लेख शिवदिग्विजय ग्रंथात आढळतो.
1672 साली साल्हेरीच्या युद्धात दिलेरखानाच्या 60 हजार एवढ्या बलाढ्य फौजेचा पराभव त्यांनी केला. या युद्धात पाच हजार कडवे पठाण ठार झाले. मराठे हे खरेतर दऱ्याखोऱ्यातील आणि गनिमी युद्धासाठी प्रसिद्ध होते. पण साल्हेरच्या युद्धात मराठी सैन्याने प्रथमच मैदानी युद्धात शिस्तबद्ध मोंगल सैन्य आणि अकबर-शहाजहान यांच्या शिस्तीत शिकलेल्या योद्ध्यांचा पराभव केला, अशी नोंद सर डेनिस किंकेड या इतिहासकाराने करून ठेवली आहे.
बहलोलखानाला जीवदान
6 मार्च 1673 रोजी शिवाजी महाराजांनी पन्हाळा जिंकला. हा आदिलशाहीच्या वर्मावरील घाव होता. आदिलशाहीतील मातब्बर सरदार अब्दूल करीम बहलोलखान हा त्यावेळी पन्हाळा आणि मिरज सुभ्याचा सुभेदार होता. आपल्या सुभ्यातील पन्हाळा मराठ्यांनी जिंकल्याचे कळताच तो चिडून मराठी मुलुखावर हल्ला करण्यासाठी 12 हजार फौजेसह विजापुरातून बाहेर पडला. तिकोटामार्गे दोन दिवसात तो उमराणीला पोचला. तेथे अधिक फौज जमा करण्यासाठी त्याने तळ टाकला. यावेळी महाराज पन्हाळ्यावर होते. त्यांनी सरनौबत प्रतापराव गुजरांना मोहिमेचा विडा दिला आणि प्रतापराव 15 हजार सैन्यानिशी उमराणीकडे निघाले. गनिमी काव्याने लढून मराठी सैन्याने बहलोलखानाच्या सैन्याची दाणादाण उडविली. अखेर बलाढ्य बहलोलखान 15 एप्रिल 1673 रोजी मराठ्यांसमोर शरण आला.
त्याने आपला वकील पाठवून क्षमायाचना
केली व याउप्पर शिवाजी महाराजांवर हल्ला करणार नाही, मला जीवदान द्यावे, अशी याचना केली. शरणागतास जीवदान देण्याच्या परंपरेप्रमाणे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी त्याला सोडून दिले. महाराजांना ही वार्ता कळताच प्रतापरावांच्या या कृत्याने ते अत्यंत संतप्त झाले. त्यांनी खरमरीत खलिता लिहून प्रतापरावांची कानउघाडणी केली. स्वत:स सरनौबत म्हणविता, तो खानाशी सला काय निमित्य केला, असा सवाल त्यांनी प्रतापरावांना केला. विजयाच्या आनंदात मश्गुल असलेल्या प्रतापरावांना खलिता पोचताच आपल्या कृतीची जाणीव झाली. महाराजांच्या रोषास आपण प्राप्त झालो, या उद्वेगात त्यांनी आदिलशाही मुलुखात स्वाऱ्या सुरू केल्या. हुबळीची पेठ लुटली.
नाहीतर आम्हास पुन्हा तोंड न दाखविणे....
परंतु, जीवदान घेउून पळालेल्या बहलोलखानाने यानंतर लगेचच फेब्रुवारी 1674 मध्ये पुन्हा स्वराज्यावर आक्रमण केले. ही वार्ता कळाली तेव्हा महाराज रायगडावर होते आणि त्यांच्या राज्याभिषेकाची जोरदार तयारी सुरू झालेली होती. प्रतापरावांचा तळ त्यावेळी गडहिंग्लज परगण्याच्या आसपास होता. शिवाजी महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांना खरमरीत खलिता लिहून बहलोलखानाला गर्दीस मेळवून फत्ते करावे, असा आदेश दिला. हा बहलोलखान घडोघडी येतो, तुम्ही लष्कर घेउून जाउून बहलोलखानास बुडवून फते करणे. नाहीतर आम्हास पुन्हा तोंड न दाखविणे, हे महाराजांच्या खलित्यातील वाक्य पाहताच आधीच सैरभैर असलेल्या प्रतापरावांनी उद्विग्न मनस्थितीत आपल्या अवघ्या सहा साथीदारांसमवेत बहलोलखानावर हल्ला केला. माघ वद्य चतुर्दशी म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस. दि. 24 फेब्रुवारी 1674. खलिता पोचला तेव्हा प्रतापराव आपल्या सहा निवडक सरदारांसमवेत छावणीपासून बरेच दूर होते. एवढ्यात बहलोलखान खूप मोठी फौज घेउून नेसरीच्या रोखाने येतो आहे, अशी खबर प्रतापरावांना मिळाली. बहलोलखानाचे नाव आणि महाराजांचे... नाहीतर आम्हास पुन्हा तोंड न दाखविणे... हे शब्द डोळ्यासमोर येताच प्रतापराव देहभान हरपले. महाराजांचे शब्द वर्मी लावून घेउून प्रतापरावांनी दिव्य करायचे ठरविले. बहलोलखानाचा सूड घ्यायचाच, या निश्चयाने ते सारासार विचार न करताच आपल्या सहा साथीदारांसह बहलोलखानावर तुटून पडले. बहलोलखानाचे सैन्य त्यावेळी नेसरीची खिंड ओलांडीत होते. प्रचंड कापाकापी झाली. प्रतापराव आणि त्यांच्या सहा साथीदारांनी शेकडो सैनिकांना कंठस्नान घातले. परंतु, शत्रुसैन्य मोठ्या संख्येने होते. मातब्बर होते. सातांनी शर्थ केली. नेसरीच्या खिंडीत रक्ताचा सडा शिंपला. पण खानाच्या सेनासमुद्रात हे पाच सूर्य बुडून गेले. मराठी मुलुखातील आणखी एक खिंड पावन झाली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी एक नवे तीर्थक्षेत्र उदयास आले. हीच ती नेसरी.
स्मारकाचे उद्घाटन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
यांच्याहस्ते झाले. याच कार्यक्रमात मी लिहिलेल्या वेडात मराठे वीर दौडले सात
या सरसेनापतींच्या चरित्रपर पुस्तकाचेही प्रकाशन श्री. पवारसाहेबांच्या हस्ते झाले.
या प्रकाशनासाठी बाबासाहेबांनी मला जी मदत केली त्याबद्दल मी त्यांचा कृतज्ञ आहे.
कानडेवाडी-नेसरीचे सुपूत्र आणि राज्य
विधानसभेचे तत्कालिन अध्यक्ष श्री.
बाबासाहेब कुपेकर यांनी
सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या स्मारकाचा विकास करून यथोचित स्मारक उभारण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले.
शासनाने दि. 16 एप्रिल 2005
रोजी श्री. बाबासाहेब कुपेकर यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक समिती स्थापन केली.
स्मारक समितीतर्फे नेसरी येथील बसस्थानकावर सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा ब्राँझचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा कोल्हापूर येथील युवा शिल्पकार संजीव संकपाळ आणि अतुल डाके यांनी तयार केला आहे. नेसरी पावनखिंड येथील मूळ समाधीस्थळाच्या ठिकाणी असलेले जुने स्मारक काढून तेथे पूर्णत: नवीन स्मारक उभारण्यात
आले आहे. चारही बाजुंनी किल्ल्यासारखी तटबंदी, स्वागत कमान, यात्री निवास, छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठित भव्य पुतळा, महादेव मंदिर, शक्तीस्थळ आणि कीतिर्स्तंभ अशी या आगळ्यावेगळ्या स्मारकाची रचना आहे. स्मारकाच्या बाजुला असलेल्या ओढ्याकाठी संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे.
स्मारकाचे
काम कलात्मक व दर्जेदार व्हावे, यासाठी स्वत: ना. श्री. कुपेकर आणि स्मारक समितीच्या सर्व सदस्यांनी जातीने लक्ष दिल्यामुळेच हे स्मारक आदर्शवत् उभे राहिले आहे. अशाप्रकारे
श्री. बाबासाहेब कुपेकर यांच्या नेतृत्वाखाली एका प्रेरणादायी आणि राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवणाऱ्या स्मारकाची निर्मिती झाली आहे. सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या हौतात्म्याची, प्रखर स्वामीनिष्ठेची आणि जाज्वल्य देशभक्तीची आठवण हे स्मारक प्रत्येकाला करून देत आहे. हे स्मारक कोल्हापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील एक नवे तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता पावेल, यात शंका नाही.
सतीश लळीत, मुंबई
(94224 13800)
00000000