गुरुवार, २६ जुलै, २०१२


माजी सैनिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार - मुख्यमंत्री
    मुंबई, दि. 26 : राज्यातील माजी सैनिक, देशाच्या संरक्षणासाठी शहीद झालेल्या जवानांच्या  वीर माता, वीर पिता, वीर पत्नी यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे सांगितले.
    कारगिल युध्दात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी 26 जुलै,  हा कारगील विजय दिवस म्हणून देशभर साजरा करण्यात येतो. 13 वा कारगील विजय दिवसाचा राज्यस्तरीय कार्यक्रम सह्याद्री अतिथी गृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील, माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री भास्कर जाधव, आमदार श्रीमती ॲनी शेखर, मेजर जनरल राजेश बावा, ले.जनरल राजीव चोप्रा आदी उपस्थित होते.
    मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, माजी सैनिक तसेच देशाच्या संरक्षणासाठी विविध मोहिमेत शहीद झालेल्या सैनिकांच्या वीर माता, वीर पिता, वीर पत्नी यांच्या पुनर्वसनासाठी सैनिक कल्याण विभागामार्फत योजना राबविण्यात येत आहेत. माजी सैनिकांच्या अनुदान योजनेत, पेन्शन, तसेच त्यांना देण्यात येणाऱ्या गौरव पुरस्कार रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. माजी सैनिकांना पोलीस दलात भरती होता यावे  यासाठी असणाऱ्या अटी शिथील करण्यात आल्या आहेत. असे असले तरी आजही माजी सैनिकांचे कांही प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी आणि जे दिले त्यापेक्षा अधिक देण्यासाठी शासन प्रयत्न करेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. कारगिल युध्दात देशाच्या सैनिकांनी शर्थीचे प्रयत्न करुन विजय मिळविला. या युध्दात शहीद झालेल्या जवानांचे स्मरण देश नेहमी करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
    याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबाचा त्याग मोठा आहे. माजी सैनिकांच्या कल्याणासाठी शासन तत्परतेने निर्णय घेत आहे. त्याचप्रमाणे माजी सैनिकांना तसेच शहीद जवानांच्या कुटुंबियांना समाधानी ठेवण्यासाठी आवश्यक ते सर्व निर्णय घेण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
    प्रारंभी शहीद जवानांच्या स्मृतींना पुष्पचक्र अर्पण करुन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार,आणि उपस्थितांनी श्रध्दांजली अर्पण केली.   
   याप्रसंगी देशाच्या संरक्षणासाठी राबविण्यात आलेल्या आणि विविध मोहिमेत शौर्य गाजविलेल्या जवानांना, मोहिमेत शहीद झालेल्या जवानांच्या वीर माता, वीर पिता, वीर पत्नी यांचा धनादेश तसेच ताम्रपट देऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कार करण्यात आलेल्याची नावे पुढील प्रमाणे -
    शहीद जवान मेजर अतुल उत्तमराव गर्जे यांच्या वीरपत्नी श्रीमती हर्षला अतुल गर्जे, रुपये 3 लाख व ताम्रपट, वीरपिता श्री. उत्तमराव दामोदर गर्जे, रुपये 1 लाख, वीरमाता सौ. चंद्रभागा उत्तमराव गर्जे, रुपये 1 लाखशहीद जवान लान्स नायक दयानंद नागनाथ पाटोळे यांच्या वीरपत्नी श्रीमती चंचला दयानंद पाटोळे, रुपये 3 लाख व ताम्रपट,  वीरपिता श्री. नागनाथ श्रीपती पाटोळे, रुपये 1 लाख, वीरमाता सौ. भारतबाई नागनाथ पाटोळे, रुपये 1 लाख;  लान्स दफेदार दिपक लक्ष्मण धायगुडे यांना रुपये 3 लाख आणि ताम्रपट;  शिपाई संदीप शामराव मगदूम यांना रुपये 1 लाख व ताम्रपट;  मेजर वरुण विजय गिध, सेना पदक यांना रुपये 5 लाख; मेजर प्रणय पद्माकर पवार, रुपये 5 लाख; शिपाई मनोज शामरावजी राजूरकर यांना रुपये 5 लाख व  ब्रिगेडिअर अरुण बी. हरोलीकर यांच्या पत्नी श्रीमती जया अरुण हरोलीकर यांना निवृत्तीवेतनाचा रुपये 1 लाख 33 हजारांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
    सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल सुहास जतकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, माजी कॅप्टन विद्या रत्नपारखी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
    या कार्यक्रमास सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव सुब्रत रथो, राज्याच्या विविध भागातील माजी सैनिक उपस्थित होते.


0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा