गुरुवार, २६ एप्रिल, २०१२


 डॉ. अनिल काकोडकर यांना
महाराष्ट्र भूषण पूरस्कार जाहीर
मुंबई. दि.26 :  सुप्रसिध्द अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणूउर्जा मंडळाचे अध्यक्ष  डॅा. अनिल काकोडकर यांना महाराष्ट्र शासनाचा 2011 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केल्याची घोषणा मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केली.
निवड समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपाध्यक्ष  उपमुख्यमंत्री अजित पवार, सदस्य सांस्कृतिक कार्यमंत्री  संजय देवतळे, सदस्य श्री. चंदू बोर्डे, श्रीमती स्नेहलता देशमुख, सदस्य सचिव व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव आनंद कुलकर्णी यांनी आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला.
साहित्य, कला, क्रीडा, समाजप्रबोधन, उद्योग, लोकप्रशासन, आरोग्यसेवा विज्ञान या क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या मान्यवर व्यक्तींचा  महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन दरवर्षी गौरव करण्यात येतो.
यापूर्वी पु.ल. देशपांडे, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, सुनिल गावस्कर,           डॉ. विजय भटकर, सचिन तेंडुलकर, पं. भीमसेन जोशी, डॉ. अभय बंग राणी बंग, बाबा आमटे, रघुनाथ माशेलकर, रतन टाटा, रा. कृ. पाटील, मंगेश पाडगांवकर, नानासाहेब धर्माधिकारी, श्रीमती सुलोचना दिदी, डॉ. जयंत नारळीकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
 डॉ. अनिल काकोडकर यांचा जन्म 11 नोव्हेंबर  1943, बारावनी (मध्यप्रदेश) येथे झाला. भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई, राष्ट्रीय तंत्रज्ञान अकादमी  चे अध्यक्ष तर जागतिक अणुउर्जा महामंडळ, जागतिक नवतंत्रज्ञान संस्था यांचे सदस्य, अशी विविध पदे त्यांनी भूषविली आहेत. यापूर्वी सन 1998-पद्मश्री, 1999 -पद्मभूषण आणि 2009 चा पद्मविभूषण  असे राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेली आहेत.
ध्रुव रिक्टरमध्ये पूर्णत: नवीन उच्च तंत्रज्ञान वापरून त्यांनी मोलाची भर टाकली आहे. सन 1974 आणि 1998 मध्ये अणुचाचणीच्या मुख्य पथकाचे ते सदस्य होते. 250 हून अधिक शास्त्रीय संशोधनपर लेख त्यांनी लिहिले आहेत. भारताला उर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी थोरियमसारख्या स्त्रोतापासून उर्जा बनविण्यासंदर्भात त्यांचे संशोधन मोलाचे ठरले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा