नॉर्डिक
देशांशी असलेले संबंध दृढ करण्याच्या
अनेक संधी
महाराष्ट्रात उपलब्ध – मुख्यमंत्री
मुंबई, दि. 30 : बंदर विकास, उच्च शिक्षण, संशोधन, ऊर्जा, जलवाहतूक, मनोरंजन
उद्योग याचबरोबर पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी महाराष्ट्रात मोठी संधी उपलब्ध
आहे. नॉर्डिक देशांबरोबर महाराष्ट्राचे पूर्वीपासून असलेले परस्पर संबंध या
माध्यमातून अजून दृढ करता येतील, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी
आज व्यक्त केला.
नॉर्डिक प्रदेशातील नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन, फिनलॅण्ड आणि आईसलॅण्ड या पाच
देशांच्या राजदूतांनी आज मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांची भेट घेतली, यावेळी ते
बोलत होते.
या बैठकीला राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेट्टी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
अजितकुमार जैन, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मलिक, उद्योग विभागाचे प्रधान
सचिव डॉ. के. शिवाजी उपस्थित होते.
नॉर्वेच्या राजदूत श्रीमती ॲन ऑलस्टॅड, फिनलॅण्डच्या राजदूत श्रीमती तेही
हकाला, आईसलॅण्डचे राजदूत जी. एरीकसन, स्वीडनचे राजदूत लॉर्स ओलोफ लिंडग्रे,
डेन्मार्कचे राजदूत फ्रेडी स्वेन यांनी श्री. चव्हाण यांच्याशी द्विपक्षीय संबंध,
उद्योग व्यवसायातील देवाण-घेवाण, नॉर्डिक देश आणि महाराष्ट्रातील कला,
संस्कृतीविषयक परस्पर संबंध यांच्याविषयी सविस्तर चर्चा केली.
या पाचही देशांच्या राजदूतांना संबोधित करताना श्री. चव्हाण म्हणाले, नॉर्डिक
प्रदेशांतील पाचही देशांचे भारताशी आणि त्यातही महाराष्ट्राशी सौहार्दाचे आणि
अतिशय जवळचे संबंध आहेत. हे संबंध अधिक वाढविण्यासाठी उभयपक्षी खूप मोठ्या संधी
उपलब्ध आहेत. महाराष्ट्र हे देशातील अतिशय वेगाने विकसित होणारे राष्ट्र आहे.
पायाभूत सुविधांचा विकास, रस्ते बांधणी, नवीन विमानतळांचा विकास, नागपूर येथील
मिहान विशेष आर्थिक क्षेत्र यामुळे महाराष्ट्र ही मोठी बाजारपेठ बनली आहे. या
संधीचा फायदा नॉर्डिक देशांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्राला 720 किलोमीटरची समृद्ध किनारपट्टी लाभली आहे, याचा उल्लेख करून श्री. चव्हाण म्हणाले, या किनारपट्टीचा उपयोग पर्यटन, जलवाहतूक आणि बंदरांचा विकास या पद्धतीने करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे. या प्रयत्नांमध्ये नॉर्डिक देश सहभागी होऊ शकतात. मुंबईमध्ये बॉलिवुड हा एक उद्योगच आहे. बॉलिवुड मधील अनेक चित्रपटांचे चित्रीकरण युरोपमध्ये आणि विशेषत: नॉर्डिक देशांमध्ये होते. या क्षेत्रात काम करण्यासाठी अजूनही मोठी संधी उपलब्ध आहे. इंन्सिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, आयआयटी, इंन्सिट्यूट ऑफ सायन्स, इंजिनिअरिंग ॲण्ड रिसर्च अशा अनेक महत्वपूर्ण उच्च शिक्षणाच्या संस्था संशोधनाचे मोठे कार्य करीत आहेत. उच्च शिक्षण आणि संशोधनाच्या कार्यक्षेत्रातही आपण मिळून मोठे सहकार्य करू शकतो. राज्याचे नवे औद्योगिक धोरण लवकरच जाहिर होणार आहे. या सर्व अनुकुल परिस्थितीचा फायदा घेऊन गुंतवणूकीच्या नवीन योजना व प्रकल्प महाराष्ट्रात आणावेत, असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले.
पाचही राजदूतांनी महाराष्ट्रात सुरू असलेले प्रकल्प, त्यांची प्रगती याची
माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच महाराष्ट्राच्या विकासात सहभागी होण्याचा
मनोदय व्यक्त केला.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा